‘ठाकरे’ ट्रेलरमध्ये बाळासाहेबांचं चित्रण किती खरं, किती काल्पनिक?

नवाजुद्दीन सिद्दकी बाळासाहेबांच्या भूमिकेत Image copyright TWITTER/THACKERAYMOVIE

'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. यामध्ये पसंती-नापसंती व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियांसोबत विरोध व्यक्त करणारी मतंही होती.

'द्वेष पसरवण्याचा धंदा बंद करा!' या शब्दांत दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थनं आपली नाराजी ट्विटरवरून व्यक्त केली. 'ठाकरे'च्या ट्रेलरमध्ये बाळासाहेबांच्या भूमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी म्हणतो - 'उठाओ लुंगी, बजाओ पुंगी!'

दक्षिण भारतीयांविरोधात बाळासाहेब ठाकरे किती बेधडकपणे आपली मतं मांडत होते, हे या संवादातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा संवाद मराठी ट्रेलरमध्ये आहे, हिंदीमध्ये नाही.

मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी दाक्षिणात्य विरुद्ध भूमिपुत्र अशी भूमिका घेतली होती हे खरं. पण या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेली प्रत्येक गोष्ट वास्तवात तशीच घडली होती का?

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातल्या काही राजकीय प्रसंगांची झलक पहायला मिळते. पण या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या इतिहासापैकी किती खरं आणि किती काल्पनिक आणि किती नाट्य रूपांतरण?

दक्षिण भारतीयांबद्दल एवढा राग का?

अभिनेता सिद्धार्थने जो मुद्दा उपस्थित केला, त्यापासूनच सुरुवात करू या.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे दक्षिण भारतीयांविरोधात बोलताना दिसतात. खरंच ठाकरेंच्या मनात दक्षिण भारतीयांबद्दल एवढा राग होता का?

Image copyright YOUTUBE/VIACOM

ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंवर पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी ठाकरेंच्या दक्षिण भारतीयांविरुद्धच्या रोषावर प्रकाश टाकला आहे.

1966 मध्ये शिवसेनेची स्थापना करण्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून 'द फ्री प्रेस जर्नल'मध्ये काम करत होते. त्यांच्यासोबत प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण हेसुद्धा काम करायचे.

सुजाता सांगतात की बाळासाहेब ठाकरे जेव्हा संपादकांना त्यांनी काढलेली व्यंगचित्र पाठवायचे तेव्हा त्यांच्या चित्रांऐवजी जास्त प्राधान्य आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांना दिलं जायचं.

सुजाता यांच्या मते, "त्याकाळात पत्रकारितेत दक्षिण भारतीयांचा दबदबा अधिक होता. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरेंना असं वाटू लागलं, की त्यांच्यासोबत भेदभाव होतोय. आर. के. लक्ष्मण यांना दक्षिण भारतीय असल्याचा फायदा मिळतोय, असाही त्यांचा समज झाला होता. त्यानंतर त्यांनी 1960 मध्ये व्यंगचित्रांशी संबंधित स्वतःचं साप्ताहिक 'मार्मिक' सुरू केलं."

कोर्टातील युक्तिवादाचं वास्तव

दाक्षिणात्यांना विरोधाबशिवाय ट्रेलरमध्ये कोर्टातील काही दृश्यं आहेत. यांपैकी एका दृश्यात बाळासाहेब ठाकरे 1992 मध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये आपला हात असल्याचं मान्य करताना दाखवलं आहे.

दुसरा एक प्रसंग आहे, ज्यामध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रश्नावर बाळासाहेब तिथे राम मंदिर असल्याचा दाखला देताना दिसतात.

सुजाता आनंदन यांनी 1992च्या दंगलींची चौकशी करणाऱ्या श्रीकृष्ण आयोगाच्या संपूर्ण कार्यवाहीचं वार्तांकन केलं होतं. त्यांच्या मते बाळासाहेब ठाकरे कधीच कोर्टासमोर हजर झाले नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयात जेव्हा या खटल्याची सुनावणी व्हायची, तेव्हा बाळासाहेब ठाकरे कधीच दिसायचे नाहीत. त्यांच्याऐवजी मधुकर सरपोतदार आणि मनोहर जोशी, हे शिवसेनेचे दोन नेते न्यायालयात दिसायचे, अशी आठवण सुजाता आनंदन यांनी सांगितली.

Image copyright YOUTUBE/VIACOM
प्रतिमा मथळा नवाजुद्दीन सिद्दिकी बाळासाहेबांच्या भूमिकेत कोर्टातल्या एका दृश्यात

बाबरी मशीद प्रकरणाला उजाळा देताना त्या सांगतात, की "त्या खटल्यामुळं बाळासाहेब ठाकरे चांगलेच घाबरले होते. अयोध्या प्रकरणी त्यांना समन्स आलं, तेव्हा या खटल्यात न अडकण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

"अयोध्या प्रकरणी बाळासाहेब ठाकरेंना न्यायालयात कधी पाहिलं नाही. त्यांचे वकीलच त्यांच्यावतीने सर्व कामकाज पहायचे. बाळासाहेब माध्यमांतून किंवा त्यांच्या प्रवक्त्यांमार्फतच भूमिका मांडायचे," असंही सुजाता आनंदन सांगतात.

जावेद मियांदादला काय म्हणाले होते बाळासाहेब?

ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांची भेट दाखवली आहे. त्या सीनमध्ये बाळासाहेब मियांदादच्या बॅटिंगची स्तुती करतात आणि त्याचबरोबर सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांच्या बलिदानाबद्दलही बोलताना दिसतात.

जावेद मियांदाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं जे दृश्य चित्रित करण्यात आलं आहे, ते सार्वजनिक भेटीचं दृश्य आहे. मियांदाद आणि ठाकरे यांची ही भेट माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर झाली होती. मात्र त्यावेळी ते एकदाही पाकिस्तानविरुद्ध काही बोलले नाहीत किंवा भारतीय जवानांवर कोणती टिप्पणीही केली नाही.

Image copyright YOUTUBE/VIACOM

"2004 साली बाळासाहेबांनी जावेद मियांदाद यांना आपल्या घरी आमंत्रित केलं होतं. त्यावेळेस त्यांच्या मुलानं जावेद मियांदादचा ऑटोग्राफ घेतला होता. ठाकरेंनी मियांदादच्या खेळाची स्तुतीही केली होती. बाळासाहेबांचा दोन्ही देशांमधल्या खेळांवर काही राग नव्हता. पाकिस्तानी लोकांनाही शांतता हवी आहे, मात्र राजकारणामुळं सर्व खराब झालं आहे, असंच ठाकरेंचं मत होतं.

चित्रपटातील काही दृश्यात बाळासाहेबांना जावेद मियांदादसोबत बंद खोलीत चर्चा करताना दाखवलं आहे. बंद खोलीत दोघांमध्ये हे बोलणं झालं होतं की नाही हे सांगता येणं अवघड आहे. मात्र ठाकरे-मियांदाद यांचा जो संवाद माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर झाला, त्यात असं कोणतंच बोलणं झालं नसल्याचं सुजाता यांनी स्पष्ट केलं.

कसे होते मुसलमानांसोबतचे संबंध?

सुजाता आनंदन सांगतात, "बाळासाहेब ठाकरे हे मुस्लीमविरोधी आहेत, असा एक मतप्रवाह होता. मात्र 1995 नंतर त्यांनी हे स्पष्ट केलं होतं, की ते भारतीय मुसलमानांच्या विरुद्ध नाहीत तर पाकिस्तानी मुसलमानांविरोधात आहेत."

"1995च्या विधानसभा निवडणुकीत अनेक मुसलमानांनी शिवसेनेला मतं दिली होती. अनेकांसाठी ही गोष्ट हैराण करणारी होती. बाबरी मशीद पडल्यापासून मुसलमान स्वतःला असुरक्षित समजत होते. काँग्रेसवर मुस्लीम मतदार नाराज होता. त्यामुळे सुरक्षेसाठी आपल्याविरुद्ध असलेल्या शिवसेनेच्या आश्रयाला जाण्याचा निर्णय मुसलमानांनी घेतला. ऐकताना ही गोष्ट थोडी विचित्र वाटत असली तरी त्यावेळेस मुसलमानांची भूमिका अशीच होती," असं सुजाता आनंदन सांगतात.

सोंगाड्यासाठी उतरवलं देवानंदाच्या चित्रपटाचं पोस्टर

ट्रेलमधल्या एका दृश्यात बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात मराठी भाषकांचा मुद्दा लावून धरताना देवानंदचा चित्रपट 'तेरे मेरे सपने'चं पोस्टर उतरवतात. त्याऐवजी 'सोंगाड्या' या दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटाचं पोस्टर लावलं जातं.

सुजाता आनंदन यांनी हे दृश्यं खरं असल्याचं सांगितलं आहे.

Image copyright YOUTUBE/VIACOM

1971 साली कोहिनूर थिएटरमधून देवानंदचा चित्रपट 'तेरे मेरे सपने'चं पोस्टर उतरवण्यात आलं. शिवसेनेचं वय तेव्हा अवघं पाच वर्षं होतं. मात्र या कृतीनं शिवसेनाला पक्ष म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी एक मुद्दा मिळाला, असं आनंदन यांनी म्हटलं. 'तेरे मेरे सपने'ऐवजी लावण्यात आलेला 'सोंगाड्या' सुपरहिट ठरला होता.

विशेष म्हणजे देवानंद आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री खूप जुनी होती. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून काम करायचे, तेव्हापासून देव आनंद आणि बाळासाहेब एकमेकांना ओळखायचे. दोघंही अनेकदा सोबत जेवायला जायचे. एकमेकांच्या घरीही त्यांचं जाणंयेणं होतं.

पण तरीही मराठीच्या मुद्द्यासाठी बाळासाहेबांनी 'सोंगाड्या'ला प्राधान्य दिल्याचं सुजाता आनंदन यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)