शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग - #5मोठ्याबातम्या

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

शरद पवार

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या:

1) शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हेलिकॉप्टरचे रविवारी (30 डिसेंबर) नगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर पवारांचा सीटबेल्ट दरवाजातच अडकल्याचे लक्षात आले तेव्हा हा प्रसंग ओढवला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

दरवाजा व्यवस्थित लावल्यानंतर हेलिकॉप्टर पुण्याला रवाना झाले.

शरद पवार हे रविवारी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी महोत्सव व शिक्षक विकास मंडळाच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी येथे आले होते.

त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी रेसिडेन्सिअल मैदानावर हेलिपॅड बनविण्यात आले होते. शिक्षक विकास मंडळाच्या कार्यक्रमानंतर पवार माघारी परतले, अशी माहिती या बातमीत दिली आहे.

2) एसटी कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची बालसंगोपन रजा

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्यांची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळून आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही रजा मिळू शकेल.

फोटो स्रोत, Getty Images

एसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती काळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या निर्णयाचा पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

3) लोकसभा निवडणुक स्वतंत्र लढणार : नारायण राणे

आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा स्वतः राणे यांनी केली आहे. रविवारी कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते, अशी माहिती ABP माझाच्या बातमीत दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नारायण राणे

यावेळी नारायण राणे म्हणाले की, जर लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर राजस्थान, मध्यप्रदेशप्रमाणेच लोकसभेत भाजपला मोठा धक्का बसेल.

दरम्यान राणेंचा स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढणार हे मात्र राणेंनी स्पष्ट केले नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आपली कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही राणेंनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढणार की नाही हेदेखील राणेंनी स्पष्ट केले नाही.

4) तीन तलाक विधेयक आज राज्यसभेत

लोकसभेत मंजूर केलेले तीन तलाक विधेयक (The Muslim Women (Protection of Rights on Marriage) Bill, 2018) सोमवारी (31 डिसेंबर) राज्यसभेत मांडले जाणार आहे. दरम्यान राज्यसभेत हे विधेयक मांडण्याआधी ते संसदीय समितीकडे पाठवावं अशी मागणी केली आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

तीन तलाक विधेयक हे मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी नसून मुस्लीम पुरुषांना शिक्षा देण्यासाठी आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

लोकसभेत जरी विधेयक हे विधेयक मंजूर झालं असलं तरी राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्यानं या विधेयकाचं भवितव्य अडचणीत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

5) ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण : 'चौकीदार निकला दागदार'

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनांच लक्ष्य करत 'चौकीदार निकला दगादार' अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. पंजाब केसरीनं अशी दिली आहे. रविवारी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याप्रकरणी काँग्रेसने मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. मोदी सरकारने याची उत्तरे लवकरात लवकर द्यावी, असं सुरजेवाला म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

सुरजेवाल यांनी केंद्र सरकारला ऑगस्टा कंपनीला ब्लॅक लिस्टमधून का हटवले? या कंपनीला मेक इन इंडियामध्ये का सहभागी केले? Foreign Investment Promotion Board गुंतवणुकीची परवानगी देऊन हेलिकाप्टर्सच्या उत्पादनांची परवानगी का दिली? ऑगस्टा वेस्टलँड संदर्भातील आंतरराष्ट्रीय न्यायालयातील खटल्यात मोदी सरकार का हरले? यावर पुन्हा अपील का केले नाही?असे प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)