मेघालयच्या खाणीत 17 दिवसांपासून अडकून पडलेल्या 15 मजुरांचा शोध अजूनही सुरूच

मेघालयमधील लुथमरी कोळसा खाणीमध्ये 13 डिसेंबरपासून अडकून पडलेल्या 15 मजुरांना बाहेर काढण्यासाठी नौदलाच्या विशेष पाणबुड्यांच्या गटाने 15 दिवसांनंतर प्रयत्न सुरू केले आहेत.

नव्या उपकरणांची वाट पाहणाऱ्या नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (NDRF) गटांनी 29 डिसेंबर रोजी मोहीम सुरू करण्याची योजना आखली होती. मात्र खाणीच्या परिस्थितीची पाहाणी करून ते परत गेले.

त्यानंतर रविवारी नौदलाच्या दोन पाणबुड्यांनी खाणीमध्ये 70 फूट खोलीपर्यंत जाऊन तपास केला, मात्र मजुरांचा काही ठावठिकाणा त्यांना लागला नाही.

संध्याकाळी सहाच्या सुमारास नौदलाचे दोन पाणबुडे आणि NDRF ची टीम परतली.

NDRFचे सहाय्यक कमांडंट संतोष कुमार सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, खाणीमध्ये 100 फुटांपर्यंत पाणी भरलं असल्यामुळे त्यांना खाणीच्या तळापर्यंत पोहोचणं अशक्य झालं आहे. ते केवळ 70 फुटांपर्यंतच जाऊ शकले आहेत.

सोमवारपासून बचाव कार्य पुन्हा सुरू झाले आहेत.

Image copyright DILIP SHARMA/BBC

मजुरांना बाहेर काढण्यासाठी ओडिशातील चक्रीवादळाचा तडाखा बसणाऱ्या भागातील विशेष फायरब्रिगेड टीमलाही बोलावण्यात आलं आहे.

शनिवारपर्यंत नौदलाच्या पाणबुड्यांना काहीतरी माहिती मिळेल, अशी आशा मजुरांच्या नातेवाईकांना होती, मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्ट दिसत होती.

बचावकार्यासाठी आलेल्या विविध एजन्सीमध्ये ताळमेळ नसणे, ही या मोहिमेतील सर्वांत मोठी त्रूटी दिसून येते.

Image copyright DILIP SHARMA/BBC

मेघालयच्या इस्ट जैंतिया हिल्स जिल्ह्यामधील सायपुंग क्षेत्रातील खाणीत ही घटना घडली आहे. तिथे पोहोचणं सोपं नाही.

रस्तेमार्गापासून हा परिसर दूर आहे. मेघालयाच्या जुवाई-बदरपूर राष्ट्रीय महामार्गावरून गेल्यावर खलिरियाटपर्यंत जाता येतं. खलिरियाटपासून 35 किमी गाडीने गेल्यावर 4 किमी अंतर चालत पार करावं लागतं.

डोंगराळ प्रदेश, जंगलांमधून अर्धवट कच्च्या रस्त्यांवरून, तीन नद्या पार केल्यावर कोळसा खाणीपर्यंत जाता येतं. येथे वीज, रस्ते अशी कोणतीच सोय नाही.

आपापल्या तयारीनिशी बचावमोहिमेतील विविध संस्था इथे पोहोचल्या आहेत. मात्र इथे पोहोचल्यावर काहीना काही तरी कमतरता असल्याचं दिसत आहे.

Image copyright DILIP SHARMA/BBC

स्थानिक प्रशासकीय अधिकारी आतापर्यंत दोऱ्या, नटबोल्टसारख्या वस्तू मिळवण्याच्या प्रयत्नात होते. नियोजन नसल्यामुळे बचावकार्यावर परिणाम होत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)