लोकसभा 2019 : राजनाथ यांनी कमावलं ते अमित शहा गमावत आहेत?

राजनाथ आणि अमित शहा Image copyright Getty Images

दोन दिवसांचं भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडलं. यात 'अपना बूथ, सबसे मजबूत' असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. पण भाजपवर अनेक मित्रपक्ष नाराज आहेत. एके काळी मित्रपक्षांना सोबत घेण्याचं काम राजनाथ सिंह यांनी पार पाडलं होतं. अमित शहा यांना हे जमेल का, हा सध्या मोठा प्रश्न आहे. शरत प्रधान यांचं विश्लेषण.


भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी NDAची पूनर्बांधणी सुरू केली, तेव्हा हे काम सोपं नव्हतं.

1998ला अटल बिहारी वाजपेयी यांनी NDAची बांधणी केली. हीच NDA 1998 ते 2004 या कालावधीत सत्तेवरही होती.

पण वाजपेयींचे दिवस राहिलेले नव्हते आणि सर्व घटक पक्षांना एकाच छताखाली आणण्याचं काम नक्कीच कठीण होतं. पण राजनाथ सिंह यांनी जुन्या पण बाजूला गेलेल्या मित्रपक्षांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित केला. इतकंच नाही तर विविध लहान पक्षांसाठी त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. हे सर्व श्रेय फक्त राजनाथ सिंह या एकाच व्यक्तीचं होतं.

एक दशकापूर्वी राजकीय गुरू अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्या राजकीय अस्थापनेची स्थापना केली त्याला फार मोठा आकार राजनाथ सिंह यांनी दिला. त्यामुळे अनेकांनी राजनाथ यांचं काहींनी वर्णन 'होऊ घातलेले अटल बिहारी वाजपेयी' असा केला होता.

विशेष म्हणजे जे जुने मित्र होते त्यांतील फक्त शिवसेनेशी भाजपचे वैचारिक सुरू जुळतात. पूर्वी जेव्हा जेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्या मतभेद झाले त्या-त्यावेळी वाजपेयी यांनी पुढाकार घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. 2014ला ही जबाबदारी राजनाथ सिंह यांनी पार पाडली. NDAच्या फेर जुळवणीत येणाऱ्या सगळ्या अडचणींवर त्यांनी मात केली होती.

NDAला तडे

पण आज नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांना 2019मध्ये लढवण्यासाठी हक्काच्या जागा मिळत नाहीत. NDAचा आणखी एक घटक पक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्ष भाजपवर नाराज आहे. या पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, पण ते दररोज स्वतःच्याच सरकारवर टीका करत असतात आणि भाजपपासून दूर जाण्याच्या धमक्या देत असतात. पण आतापर्यंत भाजपच्या नेतृत्वाने त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केलेले नाहीत.

Image copyright Getty Images

राजनाथ सिंह ज्या प्रकारे मनधरणी करायचे तसे न होता भाजपचे आताचे नेतृत्व मित्र पक्षांना धमकावण्याच्या मूडमध्ये असते.

अहंकार की अतिआत्मविश्वास

याला अहंकार म्हणा किंवा अतिआत्मविश्वास, भाजपचे राष्ट्रीय आध्यक्ष अमित शहा कसलीही तडजोड करण्याच्या आणि लहान पक्षांच्या मागण्यांपुढे झुकण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत.

राम विलास पास्वान यांचंच उदाहरण घ्या. NDA सोबत त्यांचे बरेच मतभेद होत आहेत. विशेष म्हणजे हे मतभेद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत.

राजनाथ सिंह यांच्यासारख्या कुशल व्यक्तीने हे जर हाताळलं असतं तर भाजप नेतृत्वाला लाजीरवाण्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं नसतं, अशी प्रतिक्रिया एका भाजपमधील अंतस्थ व्यक्तीने दिली आहे.

राजनाथ सिंह यांचं राजकीय कौशल्य सर्वप्रथम दिसून आलं ते 1998ला. त्यावेळी बहुजन समाज पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने कल्याण सिंग यांचं सरकार अडचणीत आलं होतं. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी एका खासगी विमान कंपनीशी असलेल्या चांगल्या संबंधाचा वापर करून कल्याण सिंह यांच्या समर्थक आमदारांना दुसऱ्या दिवशी दिल्लीत हजर केलं होतं आणि राष्ट्रपतींसमोर उभं केलं होतं. या विमान कंपनीने नियोजित फ्लाईट रद्द करून राजनाथ सिंह यांना विमान उपलब्ध करून दिलं होतं.

पण त्यानंतर कल्याण सिंह आणि वाजपेयी यांच्यातील संबंध जेव्हा बिघडले तेव्हा राजनाथ सिंह वाजपेयी यांच्या बाजूने राहिले, पण त्यांनी कल्याण सिंह यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही.

सहाजिकच वाजपेयी यांच्यानंतर राजनाथ यांच्यासारखे फार कमी नेते आहेत जे सर्वांना - अगदी वैचारिक दृष्ट्या विलग असणाऱ्यांनाही, सोबत घेवू शकतात.

Image copyright Getty Images

पण या प्रकाराचा पोक्तपणा सध्या सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वात सध्या दिसत नाही. ते गृहमंत्री असले तरी पक्षाच्या कारभारात त्यांच्या म्हणण्याला फार महत्त्व नाही, अशी स्थिती आहे.

2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांच्याकडे जाहीरनामा समितीची जबाबदारी दिली आहे. खरंतरं ही त्यांना मर्यादित करण्याचा हा प्रयत्न आहे.

अर्थात राजनाथ सिंह ऋजू स्वभाव आणि राजकीय कौशल्यामुळे ते A man of all seasons and A man for all reasons ठरले आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)