सोनिया गांधी ब्रिटनच्या राणीपेक्षा श्रीमंत आहेत का?

सोनिया गांधी Image copyright Getty Images

भाजपच्या नेत्यांनी एका रिपोर्टचा हवाला देत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपपैकी एक असं म्हटलं आहे.

भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी सोमवारी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका जुन्या लेखाची लिंक शेअर केली होती. त्यानंतर या लेखाला सोशल मीडियावर वेगानं शेअर करण्यात येत आहे.

2013मधील या लेखानुसार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याहून अधिक श्रीमंत आहेत, असं म्हटलं आहे.

या लेखाला ट्वीट करताना उपाध्याय यांनी लिहिलं की, "काँग्रेसची एलिझाबेथ ब्रिटनच्या महाराणीपेक्षा आणि काँग्रेसचे सुल्तान ओमानच्या सुल्तानहून अधिक श्रीमंत आहेत. भारत सरकारनं लवकरच कायदा बनवून यांच्या बेकायदा संपत्तीवर टाच आणायला हवी आणि त्यांना आजीवन कारावसाची शिक्षा द्यायला हवी."

या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटलाही टॅग केलं आहे. अडीच हजारांहून अधिक लोकांनी त्यांचं हे ट्वीट लाईक आणि रिट्वीट केलं आहे.

उजव्या विचारांकडे झुकलेल्या फेसबुक ग्रुप्स आणि पेजवरही या लेखाला शेअर करण्यात आलं आहे. इथंही लोक कथितरीत्या सोनिया गांधी यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत.

सोशल मीडिया व्हायरल

दिल्ली भाजपचे सोशल मीडिया आणि आयटी प्रमुख पुनीत अग्रवाल यांनीही हा लेख शेअर केला आहे. त्यांनी या लेखाला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांनी लिहिलंय की, "किती न्यूज चॅनेल आता यावर चर्चासत्र घेतील. भ्रष्टाचाराशिवाय इतकी कमाई करून देणारा दुसरा कोणता मार्ग काँग्रेसकडे असेल?"

पण बीबीसीनं हे सर्व दावे तपासले. ज्या रिपोर्टच्या आधारे टाईम्स ऑफ इंडियानं हा लेख लिहिला होता त्या रिपोर्टमध्ये नंतर वस्तुस्थितीवर आधारीत बदल करण्यात आले होते आणि श्रीमंतांच्या यादीतील सोनिया गांधींचं नाव काढून टाकण्यात आलं होतं, असं दिसून आलं आहे.

लेखात काय म्हटलं होतं?

2 डिसेंबर 2013ला टाईम्स ऑफ इंडियामधील लेखात खालील बाबींचा समावेश होता.

  • हफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, सोनिया गांधी या जगातील 12व्या क्रमांकाच्या श्रीमंत नेत्या आहेत.
  • सोनिया गांधींजवळ जवळपास 2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे.
  • यामुळे असं म्हटलं जाऊ शकतं की सोनिया गांधी या ब्रिटनची महाराणी, ओमानचे सुल्तान आणि सीरियाचे राष्ट्रपती यांच्याहून अधिक श्रीमंत आहेत.
  • 20 नेत्यांच्या या यादीत जगातील इतर सर्वांत श्रीमंत नेते मध्य-पूर्वेतील आहेत.

हफिंग्टन पोस्ट या रिपोर्टमध्ये वरील निष्कर्षावर कसं पोहोचलं, याबाबत काहीच स्पष्ट माहिती दिलेली नाही.

माध्यमंही मागे नाहीत

भाजपचे प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी 2015मध्येही या रिपोर्टला शेअर केलं होतं. पण हफिंग्टनच्या रिपोर्टच्या आधारे लेख लिहिणारी टाइम्स एकमेव संस्था नाही.

2013मध्ये हा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर अनेक भारतीय माध्यम संस्थांनी सोनिया गांधींचं नाव जगातल्या सर्वाधिक श्रीमंत नेत्यांच्या यादीत असल्याच्या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.

2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या लेखाला सोशल मीडियावर खूप शेअर करण्यात आलं होतं आणि लोकांनी सोनिया यांच्यावर भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता, हे सोशल मीडिया सर्चच्या माध्यमातून जाणवतं.

हफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्ये बदल

बीबीसीच्या पडताळणीत समोर आलं की, 29 नोव्हेंबर 2013ला हफिंग्टन पोस्टनं सर्वांत श्रीमंत नेत्यांची एक यादी छापली होती.

तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव त्या यादीत 12व्या क्रमांकावर होतं, त्यानंतर मात्र हे नाव काढून टाकण्यात आलं.

असं का करण्यात आलं, यावर हफिंग्टन पोस्टनं या रिपोर्टखाली एक नोट लिहिली होती.

Image copyright Huffpost

त्यानुसार, "सोनिया गांधी आणि कतारचे शेख हामिद बिन खलीफ़ा अल-थानी यांची नावं यादीतून काढण्यात आली आहे. सोनिया गांधी यांचं नाव या यादीत थर्ड पार्टी साईटच्या आधारे ठेवण्यात आलं होतं. यावर नंतर प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमचे संपादक सोनिया गांधी यांच्या संपत्तीची खातरजमा करू शकले नाहीत. यामुळे लिंक काढून टाकण्यात आली. या चुकीमुळे आम्ही दिलगीर आहोत."

2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी फॉर्म भरला तेव्हा त्यांनी निवडणूक पत्रात 10 कोटी संपत्ती असल्याचं म्हटलं होतं.

काही भारतीय न्यूज साईट्सनी रिपोर्टमधील या बदलालाही छापलं होतं आणि लोकांबाबत ही माहिती पोहोचवली होती.

सोशल मीडियावर असे अनेक फेसबुक पेज आहेत जे दावा करत आहेत की, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला या बातमीत दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)