हार्दिक पंड्या आणि केएल राहुल भारतीय संघातून निलंबित

हार्दिक आणि केएल Image copyright TWITTER/@HARDIKPANDYA

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि केएल राहुल या दोघांना भारतीय संघातून निलंबित करण्यात आलंय. एका टीव्ही शोदरम्यान महिलांबद्दल आपत्तीजनक टिपण्णी केल्यानं कमिटी ऑफ अडमिनिस्ट्रेशनने हा निर्णय घेतलाय. चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांना भारतीय संघाकडून खेळता येणार नाही.

कमिटी ऑफ अडमिनिस्ट्रेशनच्या (COA) निर्णयामुळे शनिवारी ऑस्ट्रेलियाविरोधातील वन डे सीरिजमधूनही दोघांची गच्छंती झाली आहे.

जोवर या दोघांची चौकशी पूर्ण होत नाही तोवर दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे, असं कमिटी ऑफ अडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष विनोद राय यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

टॉक शो 'कॉफ़ी विथ करण'मध्ये हार्दिक पंड्या आणि के.एल.राहुल यांनी महिलाविरोधी आणि सेक्सिस्ट टिपण्णी केल्याने दोघांवर सर्व स्तरातून जोरदार टीका झाली. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) हार्दिक आणि राहुलला बुधवारी कारणे दाखवा नोटीस पाठवली.

यानंतर दोघांनीही क्रिकेट नियामक मंडळाची माफी मागितली. तसंच वादग्रस्त टिपण्णीवर हार्दिक पंड्याने सोशल मीडियावरही जाहीर माफी मागितली आहे.

पंड्याने आपले महिलांशी असलेले लैंगिक संबंध यावर जाहीरपणे भाष्य केलं. तसंच आपल्या आई-वडिलांशी यावर खुलेपणाने बोलत असल्याचंही तो म्हणाला.

कमिटी ऑफ अडमिनिस्ट्रेशनच्या (COA) सदस्या डायना एडुलजी यांनी शुक्रवारीच हार्दिक आणि राहुलवर निलंबनाची शिफारस केली होती. मात्र दुसरीकडे बीसीसीआयच्या कायदेशीर सल्लागारांच्या समितीने क्रिकेटपटूंची वादग्रस्त टिपण्णी हा आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही, असं म्हटलं होतं.

दोन्ही क्रिकेटपटू शनिवारी कांगारुंविरोधात सुरु होणाऱ्या तीन दिवसीय वन डे टीमचा भाग होते. आता चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मैदानापासून दूर राहावं लागेल.

'कॉफी विथ करण'मध्ये काय झालं होतं?

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल तसंच महिलांबद्दल मतं व्यक्त केली. अभिनेता, दिग्दर्शक करण जोहर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. हार्दिक आणि भारतीय संघातील त्याचा चांगला मित्र लोकेश राहुल हे दोघे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Image copyright TWITTER/HARDIK PANDYA

अनेक महिलांशी संबंध असल्याचा दावा हार्दिकने या कार्यक्रमादरम्यान केला. माझ्या घरचे पुढारलेल्या विचारांचे आहेत. स्वत:च्या व्हर्जिनिटीबद्दलही आईवडिलांना सांगितलं आहे, असा खुलासा हार्दिकने केला.

क्लबमध्ये एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिचं नाव का विचारत नाही असं हार्दिकला विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, मला मुलींना बघायला आवडतं. त्या कशा पद्धतीने वावरतात हे मी पाहतो. एक मेसेज अनेक मुलींना करण्यात गैर काय? असं विचारत रिलेशनशिपसाठी महिलेचा होकार आहे का हे मी स्पष्टपणे विचारतो. अनेक महिलांशी माझे संबंध आहेत, असं तो म्हणाला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)