साहित्य संमेलन : सहगल यांना निमंत्रण नाकारण्यामागे मुख्यमंत्र्यांचा दबाव - विखे

नयनतारा सहगल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नयनतारा सहगल

"नयनतारा सहगल यांना संमेलनापासून दूर ठेवल्याने राज्य सरकारची नाचक्की झाली आहे. या सरकारला कुणीही आपल्याविरोधात बोललेलं आवडत नाही, सरकारविरोधी बोललं की देशद्रोह होतो असं त्यांचं मत झालंय. त्यामुळे नयनतारा यांना प्रतिबंध घालणं म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा आहे. आणि याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे" अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी साहित्य संमेलनाच्या वादाला राज्य सरकारला जबाबदार धरलंय.

नयनतारा यांना संमेलनापासून दूर ठेवल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील राजूरच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.

यावेळी वैशाली येडे, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी समर्पक शब्दात नयनतारा यांना रोखणाऱ्या राजकारणी, आयोजक आणि साहित्य महामंडळाचे कान टोचले.

दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना वादात ओढल्यामुळे हा वाद आणखी तापण्याची चिन्हं आहेत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
साहित्य संमेलनाच्या आयोजकांना धमकी देऊन कुटिल कारस्थान रचलं - श्रीपाद जोशी

साहित्य संमेलनाच्या वादावर बोलताना विखे यांनी म्हटलं की "बीबीसीशी बोलताना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी गंभीर आरोप केला, की नयनतारा यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता. आता जी माहिती येते आहे, की मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच खरं सहगल यांना निमंत्रण नाकारण्यात आलं. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आयोजकांना दम दिला, की तुम्हाला आयोजकांना मुकावं लागेल. पण तिकडे तावडे सारवासारव करतात. म्हणजे या राज्यातील मंत्र्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का?" असा सवाल त्यांनी केला आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचं आणि कोणाला नाही याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेतात. त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते. तथापि यवतमाळ मध्ये आयोजित अ.भा. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरून वाद उभे केले जात आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मा.मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणात अरुणा ढेरे यांनी नयनतारा यांना रोखणाऱ्यांचे कान टोचले. "सहगल यांची राजकीय भूमिका याच्याशी सहमत असणं अथवा नसणं यावर चर्चा करता येऊ शकते पण सध्याच्या राजकीय वातावरणात ही कठीण गोष्ट आहे. विशिष्ट जाती धर्मापाठी उभं राहणं याचा विरोध केला आहे. धर्माच्या नावाखाली झुंडीनं कुणी काही करत असेल तर त्यावेळी आपण आपली भूमिका जाणली पाहिजे. झुंडीचं राजकारण केव्हाही त्याज्यच"

त्यापुढे जाऊन नयनतारा यांनी संयोजकांनाही खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या, "नयनतारा भारतीय पातळीवरच्या महत्वाच्या लेखिका आहेत ताठ कण्याच्या आहेत. पण अत्यंत अनुचित पद्धतीने आपण त्यांना पाठवलेलं निमंत्रण रद्द केलं. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, यात शंका नाही. साहित्यात बाहेरील व्यक्ती शिरकाव करत आहेत, ही बाब ओळखणं संयोजकांना जमलं नाही. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी असा निर्णय घेतला. पण याहून मोठा निर्णय अपेक्षित होता

नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मागे घेतल्याचा साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही निषेध केला आहे.

'नयनतारांचं निमंत्रण रद्द करण्याचा निषेध करतो'

देशमुख म्हणाले, "माझी सगळी शब्दसंपदा वापरून मी निषेध व्यक्त करतो. सहगल प्रकरणात महामंडळ कमी पडलं. सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं चुकीचं होतं. सहगल यांना येऊ न देणं महामंडळाला न शोभणारं आहे," असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी यांनी मात्र नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यासाठी श्रीपाद जोशी यांना जबाबदार धरलं आहे. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "श्रीपाद जोशी यांनी त्यांची एकारलेपणाची भूमिका सोडायला हवी होती. नयनतारा यांना निमंत्रण देताना जसं आम्हाला विचारलं तसं रद्द करतानाही सांगायला हवं होतं. मी स्वत: एका साहित्य संघाचा अध्यक्ष आहे. पण मला निमंत्रण रद्द झाल्याचं माध्यमांकडून समजलं."

प्रतिमा मथळा संमेलनाचं बोधचिन्ह

त्यापुढे जाऊन मिलिंद जोशी यांनी "आयोजक आणि महामंडळात वाद होत असतात. पण श्रीपाद जोशी यांनी ते आमच्यापर्यंत येऊ दिले नाहीत. नाहीतर आम्ही आयोजकांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता. जोशींच्या एकांगी भूमिकेमुळेच नयनतारांचं निमंत्रण रद्द झालं. यामुळे मराठी साहित्य महामंडळाची प्रतिमाही मलिन झाली" असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावतानाच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सरकारची बाजू मांडत आपला त्यात हात नसल्याचं म्हटलं आहे. तावडे म्हणाले, "सहगल ताईंना निमंत्रण देऊन रद्द करणं शासनालासुद्धा आवडलं नाही. अमुकाला बोलवा, तमुकाचं भाषण ठेवा, असं आम्ही कधीच म्हणत नाही. असं असतानाही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून निमंत्रण रद्द केलं, असं का म्हणावं? यात सरकारला गोवायचं कारण नाही. या प्रकारातून महाराष्ट्राचं नाक कापलं गेलं आहे."

त्यामुळे सरकार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, साहित्य महामंडळ, आयोजक या सगळ्यांनीच नयनतारांना बोलावण्यासाठी कुणाचाही विरोध नव्हता असं म्हणत हात झटकलेत. त्यामुळे नयनतारांना कुणी रोखलं हा प्रश्न कायम आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)