पश्चिम बंगालमधल्या मुस्लीमांच्या हिंसक व्हीडिओची खरी गोष्ट

बांगलादेश Image copyright Parth Pandya

सोशल मीडियावर एक अतिशय हिंसक व्हीडिओ पश्चिम बंगालमध्ये इस्लामिक दहशतवादाची झलक नावाने व्हायरल होत आहे.

सव्वा दोन मिनिटांच्या या व्हीडिओत फेरफार झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. व्हीडिओत दिसणाऱ्या लोकांनी कुर्ता पायजमा आणि टोपी घातली आहे आणि ते एका गल्लीत तोडफोड करताना दिसत आहेत.

ज्या फेसबुक पेजवर हा व्हीडिओ शेअर झाला आहे त्यावर अनेकांनी लिहिलं आहे की हा व्हीडिओ त्यांना व्हॉट्स अॅपवर मिळाला आहे.

मात्र ज्यांनी हा व्हीडिओ सार्वजनिकरित्या शेअर केला आहे त्यांनी हा व्हीडिओ पश्चिम बंगालचा असल्याचं सांगितलं आहे.

त्यातच एका ट्विटर युजर ने लिहिलं, "2019 मध्ये ज्यांना भाजपाला निवडून देण्यात अडचण वाटत असेल त्यांनी हे भविष्य निवडावं. बंगालमधील इस्लामिक दहशतवादाची एक छोटीशी झलक बघा. इतर लोकांनाही दाखवा म्हणजे लोक जागरूक होतील."

याच संदेशाबरोबर हा व्हीडिओ रिसर्जंट धर्माच्या नावावर तथाकथित धार्मिक ग्रुपमध्ये पोस्ट केला आहे. हा व्हीडिओ 46,000 वेळा पाहिला गेला आहे आणि 1800 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

शुक्रवारीसुद्धा नव्याने सुरू झालेल्या काही फेसबुक पेजेसवर मोबाईलने तयार केलेला हा व्हीडिओ पोस्ट झाला आहे.

मात्र या व्हीडिओबाबत जे दावे केले आहेत ते खोटे आहेत. हा व्हीडिओ मुस्लीमांतर्फे मुस्लीम भागात केलेल्या दंगलीचा नक्कीच आहे. मात्र त्यामागची कहाणी वेगळी आहे.

व्हीडिओ कुठला आहे?

रिव्हर्स सर्च केल्यास असं लक्षात येतं की फेसबुकवर हा व्हीडिओ डिसेंबर 2018 पासून शेअर केला जात आहे. मात्र व्हीडिओच्या सुरुवातीला एक वेगळीच गोष्ट लिहिली होती.

बांगलादेशातील ढाका शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीने 1 डिसेंबर 2018 ला हा व्हीडिओ शेअर करताना लिहिलं होतं, "तबलिगी जमातीतल्या दोन गटात तणाव निर्माण झाला. मौलाना साद यांचे समर्थक एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांचे विरोधक आहेत. या हिंसाचारात 200 पेक्षा अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत."

Image copyright Parth Pandya

बांगलादेशच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी सुद्धा या घटनेला दुजोरा दिला आहे. या बातम्यांनुसार ही घटना तुराग नदीच्या घाटाला लागून असलेल्या टोंगी भागातील बिस्व इज्तेमा ग्राऊंडजवळची आहे.

बांगलादेशी प्रसारमाध्यमांनुसार या हिंसाचारात 55 वर्षीय बिलाल हुसैनचा मृत्यू झाला आहे आणि 200 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

जाणकारांच्या मते बांगलादेशात होणारी बिस्ब इज्तेमा ही मुस्लिमांची दुसरी मोठी मैफिल आहे. त्याचं आयोजन तबलिगी जमात करतं.

टोंगीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे काही व्हीडिओ यूट्यूबवर पोस्ट केले गेले होते. त्यात हा व्हीडिओसुद्धा सामील आहे जो पश्चिम बंगालचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

आमच्या पडताळणीत आम्हाला असंही लक्षात आलं की हा काही पहिला बांगलादेशातला व्हीडिओ नाही जो पश्चिम बंगालचा असल्याचं सांगत पोस्ट केला जात आहे.

भाषा जवळपास सारखीच असल्यामुळे आणि लोकांचे रंगरुपही सारखेच असल्यामुळे बांगलादेशातले व्हीडिओ पश्चिम बंगालमधल्या मुस्लीमांचे असल्याचे सांगत शेअर केले जात आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)