८ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांचा आयकर माफ करा - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे Image copyright Twitter

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 8 लाखांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करा अशी मागणी केली आहे.

मुंबईत आयोजित स्थानिक लोकाधिकार समितीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. ८ लाखांपर्यंतचं उत्पन्न असणारे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत तर मग त्यांचा आयकर माफ करा. हे केलं तर मोदीजी तुमची 56 इंची नाही तर 256 इंचांची असेल हे मान्य करेन, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

उद्धव यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. सरकार मजबूर असलं तरी चालेल पण देश मजबूत असला पाहिजे, असं प्रत्युत्तर त्यांनी मोदी यांना दिलं आहे. आघाडीच्या राजकारणावर टीका करताना विरोधकांना मजबूर सरकार पाहिजे असल्याचं मोदींनी म्हटलं होतं.

'शिवसेनेला पटकणारा पैदा झाला नाही'

अमित शहा यांनी लातूरमध्ये मित्रपक्षाबाबत केलेल्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमची वाट ही भगवी वाट आहे, शिवसेनेला पटकनेवाला पैदा हुआ नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. वैशाली येडे यांची उद्धव ठाकरे यांनी या भाषणात स्तुती केली. वैशाली यांचे आडनाव येडे असले तरी त्यांनी शहाणपणा शिकवला आहे, असं उद्धव म्हणाले. योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका

दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या देवाची जात काढली असती तर त्यांनी त्यांचे दात पाडले असते, असा टोला उद्धव यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हाणला आहे.

योगी आदित्यनाथ म्हणाले की ' मंदिर था, है और रहेगा' …फक्त दिखेगा नाही, अशी सुद्धा टीका त्यांनी केली आहे. काँग्रेस राम मंदिराच्या आड येत असल्याच्या भाजपच्याचा दाव्यावर त्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

काँग्रेस राम मंदिराच्या आड कशी येते ते सांगा, काँग्रेसचा विरोधी पक्ष नेताही झालेला नाहीये इथकी जबरदस्त शिक्षा जनतेने त्यांना दिली होती, असं उद्धव म्हणाले. तसंच नितीश कुमार, रामविलास पासवान यांच्यासारखे राम मंदिराला विरोध करणारे सोबती घेऊन राम मंदिर कसं बांधणार, असा सवाल ठाकरे यांनी भाजपला केला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)