नितीन गडकरींचे संमेलन वादावर भाष्य, ‘विरोधकांचा सन्मान करता यायला हवा’

नितीन गडकरी Image copyright Getty Images

साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात नितीन गडकरी यांनी नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मागे घेण्यावरून झालेल्या वादावर अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे.

मतभिन्नता असली तरी मनभेद नसावा. विरोधकांचा सन्मान करता यायला हवा, असं त्यांनी म्हटलं आहे.

राजकारणाला मर्यादा असतात. राजकारणी लोकांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये. साहित्य, संगीत, कला, शिक्षण संस्थांना त्याचं काम करू द्यावं. आणि या संस्थानीही राजकारणात हस्तक्षेप करू नये. याचा अर्थ त्यांच्यात संवाद नसावा, असा मुळीच नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

पु. लं. देशपांडे, दुर्गा भागवत यांनी आणिबाणीचा निषेध केला. त्यावेळी त्यांच्या सभांना नेत्यांच्या सभांपेक्षा अधिक गर्दी व्हायची. मात्र आणीबाणी मागे घेतल्यानंतर ते परत आपल्या लिखाणाकडे वळले. आम्ही राजकारणी नाही, हे त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना समजावून सांगितलं. यालाच समन्वय म्हणतात, असं नितीन गडकरी पुढे म्हणाले.

जिथे संवाद होत नाही तिथं विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद होतो. त्यामुळं आपापल्या मर्यादा सांभाळून विचारमंथन महत्त्वाचं आहे, अस सुद्धा ते म्हणाले.

माणूस गुणानं श्रेष्ठ आहे हे समजून वागण्याची गरज आहे. तरीही समाजात सांप्रदायिकता, जातीयवाद या समस्या आहेत. वाईट गोष्टी हळूहळू दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. समाजाला घडवायचं असेल, तर प्रत्येकानं स्वत:पासून सुरुवात करायला हवी, असंही ते म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांनी पतीनं आत्महत्या केल्यानंतरही खंबीरपणे उभं राहणाऱ्या वैशाली येडेकरांच्या धैर्याचं कौतुक सुद्धा केलं. वैशाली ताईंना इथं उद्घाटक म्हणून बोलावलं हे खूप उत्तम केलं. त्यांनी पुस्तकं लिहिली नसतील, पण जगण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे तो कौतुकास्पद आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)