कुंभमेळा : जगातल्या सर्वांत मोठ्या मेळ्याचं आयोजन असं होतं

कुंभमेळा Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कुंभमेळा

कुंभमेळा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठी यात्रा आहे. 12 कोटी भाविक कुंभमेळ्याला येणार आहेत. इतक्या भाविकांची व्यवस्था करणं एखादं शहर वसवण्यासारखं आहे. सुसज्ज विमानतळ, शेकडो रेल्वे गाड्या, हजारो टन अन्नधान्य, रुग्णालयं अशी अवाढव्य व्यवस्था उभी करणं, हे आव्हान प्रशासन कसं पेलत आहे?

अलाहबाद म्हणजेच आजचे प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि पुराणात उल्लेख असलेल्या सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर यंदा कुंभमेळा भरणार आहे. जानेवारी ते मार्च या काळात तब्बल 12 कोटी भाविक पवित्र स्नान करण्यासाठी येतील, असा अंदाज कुंभमेळा आयोजकांनी व्यक्त केला आहे.

प्रयागराजच्या या संगमावर स्नान केल्याने पापक्षालन होते. म्हणजेच सगळी पापे धुवून निघतात आणि मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते, असे मानले जाते. आत्म्याची जन्म-मरणाच्या चक्रातून सुटका होणे, म्हणजेच मोक्षप्राप्तीला हिंदू धर्मात परम मानले गेले आहे.

अलाहबाद म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो. दर तीन वर्षांनी एका ठिकाणी, अशा प्रकारे बार वर्षांत या चारही ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते.

मंगळवारी अधिकृतपणे कुंभमेळा सुरू होईल. पहिल्याच दिवशी तब्बल दिड ते दोन कोटी भाविक प्रयागराज येथे दाखल होतील, असा अंदाज आहे. 4 फेब्रुवारीला पहिलं पवित्र स्नान आहे. त्यादिवशी तब्बल 3 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. 4 मार्चला कुंभमेळ्याची सांगता होणार आहे. यंदाचा कुंभमेळा हा अर्धकुंभ आहे. दोन कुंभाच्या मधल्या कुंभमेळ्याला अर्धकुंभ म्हणतात. नाव अर्धकुंभ असले तरी भाविकांमधला उत्साह कमी नसतो. उलट 2013 साली झालेल्या पूर्णकुंभपेक्षा यंदाच्या अर्धकुंभला जास्त लोक येतील, असा अंदाज आहे.

कशी केली जाते निवाऱ्याची व्यवस्था?

तीरावर शेकडो तंबू उभारले जात आहेत. आयोजन निर्विघ्न पार पडावे, यासाठी हजारो अधिकारी दिवसरात्र झटत आहेत.

काही दिवसांपूर्वी मी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राजीव राय यांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यावेळी त्यांनी 1 वर्ष तयारी सुरू असल्याचं सांगितलं.

देशपरदेशातून येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तंबू उभारले जातात. हे तंबू उभारण्यासाठी जवळपास 6,000 धार्मिक आणि सांस्कृतिक संस्थांना जमिनीचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

Image copyright Getty Images

आम्ही बोलत असताना त्यांचा फोन सतत वाजत होता. कार्यालयातील कर्मचारी कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी येत होते. तर विविध संघटनांचे अनेक प्रतिनिधी त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे होते.

32 चौरस किलोमीटर म्हणजे एखाद्या मोठ्या शहराएवढ्या जागेवर कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याची, माहिती त्यांनी दिली.

भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था?

शेकडो वर्षांपासून कुंभमेळा भरतो. मात्र मोठ्या संख्येने भाविक येण्याचे प्रमाण गेल्या काही दशकातच वाढले आहे. 2001 साली अलाहबादमध्ये जो कुंभमेळा भरला होता त्यावेळी पहिल्यांदा प्रचंड संख्येने भाविक मेळ्यात सहभागी झाले होते.

यंदाच्या मेळ्याचे बजेट 28 कोटी रुपये आहे. 49 दिवस चालणाऱ्या या मेळ्यात ब्रिटन आणि स्पेन यांच्या एकत्रित लोकसंख्येएवढे भाविक मेळ्याला भेट देण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात शहरातील पायाभूत सुविधांचा चेहरामोहराच बदलला आहे. नवीन विमानतळ उभारण्यात आले आहे. दिल्लीहून तासाभराच्या आत या विमानतळावर पोहोचता येते.

संपूर्ण शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. नवीन उड्डाण पूल उभारण्यात आले आहेत. मेळा भरतो त्या मैदानावर जवळपास तीनशे किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आले आहेत.

पाच लाख गाड्या उभ्या करता येतील, एवढी पार्किंगची व्यवस्था शहराभोवती करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी रेल्वे मंत्रालयानेही शेकडो नवीन रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे.

रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ते अमित मालवीय सांगतात, "उत्सवादरम्यान जवळपास साडे तीन कोटी लोकं रेल्वेने येतील, असा आमचा अंदाज आहे. शहारातील सर्व आठ रेल्वे स्थानकांचा विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे."

Image copyright Getty Images

गेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 40 भाविकांचा मृत्यू झाला होता. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेतली गेली आहे, हे दाखवण्यासाठी ते मला मुख्य स्टेशनवरही घेऊन गेले होते.

स्थानकावर एक नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. एका प्लॅटफॉर्मवरून दुसरीकडे जाण्यासाठी नवीन पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. तर प्रवेश आणि प्रस्थान गेटवर गोंधळ उडू नये, यासाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.

रेल्वे स्थानकातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी शहराबाहेरून पाच हजार अतिरिक्त कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आल्याची माहिती मालवीय यांनी दिली आहे.

अतिविशाल मेळ्याची सुरक्षा व्यवस्था

वाहतूक आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि निमलष्करी दलाचे तीस हजार जवान तैनात असतील. शिवाय चेक पोस्ट आणि बॅरिकेड्स कुठे लावायचे, याची अतिशय दक्षतेने योजना आखण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी कविंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.

ते म्हणतात, "कुठेही चेंगराचेंगरी किंवा अप्रिय घटना घडू नये, ही आमची प्राथमिकता आहे. कुठेच चूक होऊ नये आणि हे आव्हान पेलता यावे, यासाठी आम्ही दिवसरात्र झटतोय."

गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

Image copyright Ankit Srinivas

"गर्दीच्या आकाराचा अंदाज यावा, यासाठी एक हजार CCTV बसवण्यात आले आहेत. त्यामुळे जिथे जास्त गर्दी होईल तिथली गर्दी पांगवण्यासाठी लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवले जाईल," अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे.


कुंभमेळा

  • गंगा, यमुना आणि पुराणात उल्लेख असलेल्या सरस्वती नदीच्या संगमावर यंदा कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  • यावर्षीच्या कुंभमेळ्यात सात आठवड्यात एक अब्ज वीस कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या हज यात्रेपेक्षा ही संख्या खूप मोठी असणार आहे. गेल्या वर्षी 2.4 दशलक्ष भाविक हज यात्रेत सहभागी झाले होते.
  • ज्योतिषशास्त्रानुसार कुंभमेळ्याची तारीख, कालावधी आणि स्थान निश्चित केले जाते.
  • 2013 साली याच अलाहबादमध्ये महाकुंभमेळा भरला होता. 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर म्हणजेच तब्बल 144 वर्षांनंतर महाकुंभमेळा भरतो. त्यावेळी उत्सवात एक अब्ज भाविकांनी हजेरी लावली होती.
  • 1946 साली हरवलेल्या व्यक्तींसाठी विशेष विभागाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून कुंभमेळ्यात हरवलेल्या अगणित लोकांना या विभागाने आपल्या कुटुंबीयांची भेट घालून दिली आहे.

भोजनाची व्यवस्था कशी केली जाते?

एक-दोन दिवसांसाठी येणारे भाविक स्वतःच जेवण घेऊन येतात.

मात्र महिनाभरासाठी कुंभमेळ्यात येणाऱ्या धार्मिक संघटना किंवा भाविकांच्या भोजनाची व्यवस्था प्रशासनाला करावी लागते.

Image copyright Ankit Srinivas

स्वस्त दरात कणिक, तांदूळ, साखर आणि केरोसीन उपलब्ध करून देण्यासाठी पाच मोठे गोदाम आणि 160 स्वस्त धान्य दुकानं उभारण्यात आली आहेत.

धार्मिक शिबिरांना या सर्व वस्तू मोफत दिल्या जातात. तर भाविकांना अतिशय स्वस्त दरात विक्री केली जाते, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी अप्रिता उपाध्याय यांनी दिली.

स्वस्त धान्यासाठी आवेदन करणाऱ्या दिड लाख भाविकांना कार्डवाटप करण्यात आले आहे. त्यांना दोन रुपये किलो दराने तांदुळ, तीन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ, साडेसात रुपये किलो दराने साखर देण्यात येईल.

यंदाच्या कुंभमेळ्यासाठी 5,384 टन तांदुळ, 7,834 टन कणीक, 3,174 टन साखर आणि 767 किलोलीटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे.

संपूर्ण मैदानावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वैद्यकीय व्यवस्था

मेळ्याच्या ठिकाणी 100 बेडचे मध्यवर्ती हॉस्पिटल आणि 10 छोटे हॉस्पिटल उभारण्यात आले आहेत. 1 डिसेंबरपासून त्यांनी कामही सुरू केले आहे.

कुंभमेळ्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण पथकाचे नेतृत्व करणारे डॉ. अशोक कुमार पालिवाल सांगतात, "आमच्या हॉस्पिटलमध्ये रोज जवळपास तीन हजार रुग्ण येतात. 15 जानेवारीला मोठी गर्दी असेल. त्यामुळे त्यादिवशी जवळपास 10,000 रुग्ण दाखल होण्याची शक्यता आहे."

डॉ. पालिवाल 193 डॉक्टर आणि नर्स, फार्मसिस्ट यासारख्या दिड हजारांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व करतात. इतकेच नाही तर 80 आयुर्वेदिक डॉक्टरांचे पथकही तैनात आहे.

Image copyright Ankit Srinivas

या हॉस्पिटल्समध्ये सर्जरी, एक्स-रे, अल्ट्रासाउंड आणि पॅथोलॉजी लॅबजी व्यवस्था आहे.

डॉ. पालिवाल सांगतात, "आमच्याकडे 86 अॅम्ब्युलन्स, 9 नदीतील अॅम्ब्युलन्स आणि एक हवाई अॅम्ब्युलन्स आहे. मोठ्यात मोठ्या इमरजेन्सीसाठीसुद्धा आम्ही सज्ज आहोत."

स्वच्छतागृहांचा प्रश्न

मेळ्यातील स्वच्छतेवरही डॉ. पालिवाल आणि त्यांच्या चमूची देखरेख असेल.

मेळ्यात येणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक लाख बावीस हजार स्वच्छतागृह बांधले आहेत. तर वीस हजार कचराकुंड्याही ठेवल्या आहेत.

22,000 हजार स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनासाठीही योजना तयार आहे. प्रत्येक टॉयलेटला जिओटॅग केलेले आहे.

मात्र या स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याची तक्रार आतापासूनच सुरू झाली असली तरी उत्सव सुरू होण्याआधीच ही समस्या सोडवली जाईल, असं आश्वासन डॉ. पालिवाल यांनी दिले.

"हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लोकं अहोरात्र काम करत आहेत. पाईपलाईन टाकणे, नळ जोडणे, स्वच्छतागृह उभारणे, अशी कामे सुरू आहेत." असं डॉ. पालिवाल म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)