कुंभमेळा : अघोरी साधूंचं मानवी मांस खाण्याचं, प्रेताशी संभोग करण्याचं अध्यात्म

Aghoris going in a group to take a ritualistic bath Image copyright EPA

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू व्हायला आता केवळ एक दिवस बाकी आहे. गंगेत स्नान करण्यासाठी देशपरदेशातून संगमतीरावर अनेक पंथाचे साधू-महंत एकत्र जमले आहेत.

याच साधूंमध्ये एक वर्ग असाही आहे, ज्याची सामान्य माणसाला काहीशी भीती वाटत असते. साधूंच्या या वर्गाला 'अघोरी संप्रदाय' म्हणतात. हे अघोरी साधू स्मशानात राहतात, जळणाऱ्या मृतदेहांसमोर जेवतात आणि तिथेच झोपतात, असा समज आहे.

अघोरी निर्वस्त्र असतात, माणसाचे मांस खातात, कवटीत जेवतात आणि दिवस-रात्र गांजा ओढतात, अशा गोष्टीही पसरवल्या जातात.

अघोरी कोण असतात?

लंडनमधील स्कूल ऑफ आफ्रिकन अँड ओरिएंटल स्टडिजमध्ये संस्कृत शिकवणारे जेम्स मॅलिन्सन सांगतात, "आध्यात्मिक ज्ञान मिळवायचे असेल आणि ईश्वराला भेटायचे असेल तर शुद्धतेच्या नियमांपलीकडे जावे लागेल, असा अघोर दर्शनाचा सिद्धांत सांगतो."

मॅलिन्सन स्वतः एक महंत आणि गुरू आहेत. मात्र त्यांच्या पंथात अघोरी संप्रदायातील प्रक्रिया वर्ज्य आहेत.

मॅलिन्सन अनेक अघोरी साधूंशी बोलले आहेत. त्या आधारावर ते सांगतात, "सामान्यपणे ज्या गोष्टींची घृणा वाटते त्यांचा सामना करून ती घृणा नष्ट करणे, हा अघोरी साधूंचा सिद्धांत आहे. चांगलं आणि वाईटाविषयीचे सामान्य नियम त्यांना मान्य नसतात. आध्यात्मिक प्रगतीचा त्यांचा मार्ग माणसाचे मांस आणि स्वतःचेच मल भक्षण करण्यासारख्या विचित्र क्रियांमधून जातो. मात्र इतरांनी वर्ज्य केलेल्या या गोष्टींचे भक्षण करून ते परम चेतना प्राप्त करतात, असा त्यांचा विश्वास आहे."

अघोरींचा इतिहास

अघोरी पंथाविषयी सांगायचे तर 18व्या शतकात हा शब्द चर्चेचा विषय बनला. कपालिक पंथ ज्या क्रियांसाठी कुख्यात होता त्या क्रिया या पंथाने स्वीकारल्या आहेत.

Image copyright Empics

कपालिक पंथात मानवी कवटीशी संबंधीत अनेक रूढींसोबतच नरबळी देण्याचीही प्रथा होती. मात्र आता हा पंथ अस्तित्वात नाही.

मात्र अघोरी पंथाने कपालिक पंथातील बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या आहेत.

हिंदू समाजातील बहुतांश पंथांचे निश्चित असे नियम आहेत. पंथाचे अनुयायी संघटनात्मक पद्धतीने नियमांचे पालन करतात आणि सामाजिक पातळीवर विविध टप्प्यांत देवाणघेवाण होत राहते.

मात्र अघोरींबाबत असे होत नाही. या संप्रदायातील साधू आपल्या कुटुंबीयांशी संपर्क पूर्णपणे तोडतात आणि बाहेरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवत नाहीत.

बहुतांश अघोरी खालच्या जातीतील असतात, असा एक समज आहे.

मॅलिंसन सांगतात, "अघोरी संप्रदायात साधूंच्या बौद्धिक कौशल्यात खूप अंतर दिसते. काही अघोरींची बुद्धी इतकी तल्लख होती की ते राजा-महाराजांना सल्ला द्यायचे. एक अघोरी तर नेपाळच्या राजाचे सल्लागार होते."

कुणाविषयीही द्वेषभावना नाही

मनोज ठक्कर यांनी 'अघोरी : अ बायोग्राफिकल नॉवेल' हे पुस्तक लिहिले आहे. ते म्हणतात की लोकांमध्ये या अघोरी साधूंविषयी चुकीची, भ्रमित करणारी माहिती अधिक आहे.

Image copyright EPA

ते सांगतात, "अघोरी खूपच साधी माणसं असतात. त्यांना निसर्गाच्या जवळ राहणे आवडते. त्यांची कुठल्याच प्रकारची मागणी किंवा अपेक्षा नसते."

"ते प्रत्येक वस्तूला ईश्वराचा अंश मानतात. ते कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि कुठल्याच वस्तूला नकारत नाहीत. त्यामुळे ते प्राणी आणि माणसाच्या मांसातही भेद करत नाहीत. प्राण्यांचा बळी देणे, त्यांच्या पूजा पद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे."

"ते गांजा ओढतात. मात्र नशेतसुद्धा त्यांना स्वतःविषयी संपूर्ण जाण असते."

अघोरी संप्रदाय मानणाऱ्यांची संख्या कमी

अघोरी रीतीचे योग्य पद्धतीने पालन करणारे खूपच कमी लोक असल्याचे मॅलिंसन आणि ठक्कर दोघेही सांगतात.

त्यांच्या मते कुंभमेळ्यात येणारे साधू हे नेहमीच स्वयंघोषित अघोरी असतात आणि त्यांनी कधीच कुठल्याच प्रकारची दिक्षा घेतलेली नसते. तसंच काही जण तर अघोरी साधूंप्रमाणे वेश घेऊन पर्यटकांचं मनोरंजन करतात.

Image copyright Getty Images

संगमात स्नान करण्यासाठी आलेले भाविक त्यांना अन्न आणि पैसे देतात.

मात्र, "अघोरी कुणाकडूनही पैसे घेत नाहीत आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. कुणी संतती प्राप्तीसाठी आशीर्वाद मागतोय की घर बांधण्यासाठी, याची ते पर्वा करत नाहीत," असे ठक्कर मानतात.

अघोरी कोणत्या देवाची पूजा करतात?

अघोरी सामान्यपणे महादेवाची पूजा करतात. त्यासोबतच ते महादेवाची पत्नी शक्तीचीही उपासना करतात.

उत्तर भारतात स्त्रिया अघोरी संप्रदायाच्या सदस्य बनू शकतात. पश्चिम बंगालमध्ये स्त्रिया स्मशानभूमीतही दिसतात. मात्र अघोरी संप्रदायातील स्त्रियांना कपडे परिधान करावे लागतात.

ठक्कर म्हणतात, "बहुतांश माणसं मृत्यूला घाबरतात. स्मशानभूमी मृत्यूचे प्रतीक आहे. मात्र अघोरी इथूनच सुरुवात करतात. ते सामान्य समाजाची मूल्यं आणि नैतिकतेला आव्हान देऊ इच्छितात."

समाजसेवेतही सहभागी

अघोरी साधूंचा समाजात सहज स्वीकार केले जात नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या संप्रदायाने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक भागात अघोरींनी कुष्ठरोगींसाठी हॉस्पिटल उभारली आहेत.

Image copyright Getty Images

मिनिसोटा येथील मेडिकल कल्चरल अँड अँथ्रोपोलॉजिस्ट रॉन बारेट यांनी इमोरी रिपोर्टला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, "अघोरी त्या माणसांसोबत काम करत आहेत, ज्यांना समाजाने अस्पृश्य मानले आहे अशा कुष्ठरोगाच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल्सने एकप्रकारे स्मशानभूमींची जागा घेतली आहे आणि अघोरी या रोगाच्या भीतीवर विजय मिळवत आहेत."

Image copyright Getty Images

अघोरी समाजापासून वेगळे राहतात, असा साधारण समज आहे.

मात्र काही अघोरी साधू फोन आणि सार्वजनिक वाहतुकीचाही वापर करतात.

याशिवाय काही अघोरी साधू सार्वजनिक स्थळी जाताना कपडेही घालतात.

गे सेक्स अमान्य

जगभरात एक अब्जाहून जास्त लोक हिंदू धर्माचे पालन करतात. मात्र त्यांचा एकाच प्रकारच्या मान्यतांवर विश्वास नाही.

एकच ग्रंथ किंवा एका पैगंबर अशी परंपरा हिंदू धर्मात नाही.

Image copyright EPA

त्यामुळे अघोरींच्या संख्येचा अंदाज बांधणे अवघड आहे. मात्र अघोरी हजारोंच्या संख्येने असतील, असे तज्ज्ञांना वाटते.

काही अघोरी साधूंनी आपण मृत शरीरासोबत संभोग केल्याचे, सार्वजनिक स्वरूपात मान्य केले आहे. मात्र ते गे सेक्सला मान्यता देत नाहीत.

एक खूपच विशेष बाब अशी की जेव्हा एखाद्या अघोरीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मांसाचे भक्षण इतर अघोरी करत नाहीत. त्यांच्या मृतदेहाचं विधिपूर्वक अंत्यसंस्कार केले जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)