#Metoo : राजकुमार हिरानींनी लैंगिक अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप

राजकुमार हिरानी Image copyright Getty Images

'मुन्नाभाई एमबीबीएस,' 'थ्री इडियट्स,' 'पीके' यांसारख्या चित्रपटांना दिग्दर्शित करणारे नामवंत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर एका महिलेने लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला आहे. हिरानी यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे.

मार्च ते सप्टेंबर 2018 या कालावधीमध्ये हिरानी यांनी अनेकदा लैंगिक गैरवर्तन केले, असे या महिलेचा आरोप असल्याचे हफिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हे कथित गैरवर्तन हिरानी यांनी संजय दत्तवरील संजू चित्रपटाच्या कामाच्यावेळेस केले असे या महिलेने 'संजू' चित्रपटाचे सहनिर्माते विधू विनोद चोप्रा 3 नोव्हेंबर 2018 रोजी लिहिलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले होते.

हा ई-मेल विधू विनोद चोप्रा यांची पत्नी अनुपमा, पटकथा लेखक अभिजात जोशी, विधू विनोद चोप्रा यांची बहिण शेली चोप्रा यांनाही पाठविण्यात आला आहे.

अनुपमा या विधू विनोद चोप्रा फिल्म्स प्रा. लि. आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या संचालिका आहेत. अभिजात जोशी यांनी 'संजू,' 'पीके,' 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटांचे पटकथा लेखन केले आहे. शेली चोप्रा या दिग्दर्शक असून 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे.

राजकुमार हिरानी यांनी त्यांचे वकील आनंद देसाई यांच्यामार्फत सर्व आरोप फेटाळले आहेत.

"माझ्या अशिलावर केलेले आरोप खोटे, खोडसाळ, घृणास्पद, हेतुपुरस्सर, बदनामीकारक," असल्याचं देसाई यांनी 5 डिसेंबर 2018 रोजी हफिंग्टन पोस्टला पाठवलेल्या ईमेलमध्ये स्पष्ट केले आहे.

9 एप्रिल 2018 रोजी हिरानी यांनी 'प्रथम सूचक लैंगिक हावभाव केले आणि त्यानंतर लैंगिक अत्याचार केले,' असे आरोप करणाऱ्या महिलेने 3 नोव्हेंबर 2018 रोजी पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिलं आहे.

प्रतिमा मथळा राजकुमार हिरानी

"सर, हे चुकीचे आहे, हे शब्द माझ्या तोंडी आल्याचं मला साफ आठवतं," असं या महिलेनं म्हटलं आहे. "मी एक केवळ सहाय्यक आहे, मी कोणीच नाही. मी कधीच व्यक्त होऊ शकणार नाही," असं या महिलेनं इ-मेलमध्ये म्हटलं आहे.

"तोपर्यंत मी हिरानी यांच्यांकडे वडिलांप्रमाणे पाहायचे. त्या रात्री आणि नंतर पुढील सहा महिने माझे मन, शरीर हृद्यावर अत्याचार झाले," असेही त्या महिलेनं नमूद केलं आहे.

हफपोस्टने हा इमेल लिहिणाऱ्या महिलेशी संपर्क केला तेव्हा तिने हफपोस्टला इमेल पाठवत आपली बाजू पुन्हा मांडली. हिरानी यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं आपल्याला सांगितल्याचं तिच्या 3 मित्र-मैत्रिणींनीही हफपोस्टला सांगितले आहे.

हफपोस्टला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, "हिरानी हे आपले बॉस असून आपल्यापेक्षा जवळजवळ 30 वर्षांनी मोठे असल्याने आपण घाबरून गेले होतो. हिरानी यांचं वर्तन सहन करून वरकरणी सामान्य राहणं अत्यंत वेदनादायक होतं. त्या काळात वडिलांचा शेवटचा आजार सुरू होता त्यामुळे आपल्याला नोकरीची गरज होती."

"त्यांच्यापुढे नमतं घेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. ते सहन करण्यासारखं नव्हतं. पण माझ्या कामावर प्रश्नचिन्हं उभी केलं जाऊ नयेत तसंच नोकरी जाऊ नये यासाठी मी सर्व सहन केलं," असं या महिलेनं म्हटलं आहे.

Image copyright RAJKUMAR HIRANI
प्रतिमा मथळा हिरानी यांनी पीके चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

"जर मी मध्येच नोकरी सोडली तर माझ्या कामाबद्दल ते वाईटसाईट बोलले असते आणि पुन्हा या क्षेत्रात नोकरी मिळणं कठीण झालं असतं. कारण मी चांगली नाही असं हिरानी यांनी म्हटलं तर ते सगळ्यांनी ऐकलं असतं. माझं भविष्य धोक्यात आलं असतं," असं या महिलेनं हफपोस्टला पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.

हिरानी यांची बाजू

हफपोस्टने हिरानी यांची बाजू 7 आणि 15 डिसेंबर अशी दोनदा भेटून जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्यामध्ये व तक्रार करणाऱ्या मुलीमध्ये सर्व संबंध सामान्य व्यावसायिक संबंध असल्याचे दाखवणारे मेसेज आणि इमेलच्या प्रती त्यांनी दिल्या.

हिरानी यांचे वकील देसाई हफपोस्टला पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हणतात, "आमच्या अशिलावर केलेले आरोप खोटे असल्याचं या संभाषणावरून सिद्ध होतं."

22 नोव्हेंबर रोजी आपण विधू विनोद चोप्रा यांनाही ईमेल पाठविल्याचं हिरानी यांनी म्हटलं आहे. या ईमेलमध्ये आपल्यावरील आरोप खोटे असून कोणत्याही स्वायत्त समितीतर्फे चौकशीस सामोरे जाण्याची तयारी आहे असं लिहिल्याचं ते सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)