शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक #पाचमोठ्याबातम्या

शिवस्मारकाचे संकल्पित चित्र Image copyright MAHARASHTRA DGIPR
प्रतिमा मथळा शिवस्मारकाचे संकल्पित चित्र

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवरील झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :

1. शिवस्मारकाच्या कामाला सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक

सुमारे तीन हजार ६०० कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचे काम सर्वोच्च न्यायालयाने रोखल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे. हे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 'वर्क ऑर्डर' काढली असली तरीही सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश मिळेपर्यंत हे काम सुरू न करण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत.

शिवस्मारक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने सन २०११च्या सीआरझेड नियमावलीत दुरुस्ती केली होती. या दुरुस्तीला 'द कन्झर्वेशन अॅक्शन ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाने नोव्हेंबरला अंतरिम आदेश देताना प्रकल्पाच्या कामाला अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्या आदेशाविरोधात संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आहे. या अपीलावर सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एस के कौल यांच्या खंडपीठासमोर ही प्राथमिक सुनावणी झाली आणि या खंडपीठाने काम रोखण्याचे तोंडी आदेश काढले.

2. दहा टक्के आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी

केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या 10 टक्के आरक्षणाची महाराष्ट्रात तातडीने अंमलबजावणी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताला सांगितलं. ही अंमलबजावणी कशी करायची याचे कायदेशीर पैलू तपासण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला दिला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Image copyright Getty Images

राज्य सरकारची महाभरतीची प्रकिया सुरू असून त्यातही हे आरक्षण करण्याचा सरकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही महाभरती काही दिवस पुढे ढकलण्याचीही शक्यता आहे. त्याचप्रमाणे राज्यात हे आरक्षण लागू करण्यासाठी केंद्राच्या धर्तीवर राज्य विधिमंडळात हे विधेयक सादर करावयाचे की अधिसुचना काढून ते लागू करावयाचे याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना विधी व न्याय विभागाला देण्यात आल्याचंही या बातमीत पुढे म्हटलं आहे.

3. अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आगामी निवडणूक लढणार नसल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी दिली आहे. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी येथून निवडणूक लढवली होती.

Image copyright Getty Images

केजरीवाल निवडणुकीला उभे राहिले नाहीत तरी आम आदमी पार्टी वाराणसी येथून एक तगडा उमेदवार उभा करणार असल्याचीही माहिती सिंह यांनी दिली आहे. आप येत्या निवडणुकीत दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगडच्या सर्व जागांवर लढणार आहे. त्यात उत्तर प्रदेशच्याही काही जागांचा समावेश आहे.

4.मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल आता आणखी अपग्रेड होणार आहे. गर्दीच्या वेळी गाडी पकडण्याच्या नादात तोल जाऊन आतापर्यंत अनेकांना हकनाक प्राण गमवावे लागले आहेत. हे अपघात टाळण्यासाठी मंत्रालयाने लोकल डब्ब्यांच्या दरवाजांवर 'सेफ्टी' सेन्सर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे रेल्वे चालू होण्याचा सिग्नल प्रवाशांना मिळेल. त्यामुळे ते गाडी पकडण्याची घाई करणार नाहीत. लोकमतने ही बातमी दिली आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यामध्ये त्यांनी या सेफ्टी सेन्सरची माहिती दिली आहे. ते म्हणाले, मुंबई लोकलच्या डब्यांवर निळ्या रंगाचा लाईट लावण्यात येणार आहे. हा लाईट प्रवाशांना ट्रेन सुरू होणार असल्याचे सिग्नल देणार आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढताना होणाऱ्या दुर्घटना कमी होतील.''

5. न्या. सिक्री यांचा सरकारच्या ऑफरला नकार

CBIचे माजी संचालक यांच्याविरोधात निर्णायक मत देणारे न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी लंडनमध्ये असलेल्या राष्ट्रकुल सचिवालय लवाद प्राधिकरणावर नियुक्तीची ऑफर नाकारली आहे. द हिंदूने यासंदर्भात बातमी दिली आहे. सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात न्या. सिक्री यांना CSAT चे अध्यक्ष किंवा सदस्य होण्याची तोंडी ऑफर दिली होती. सिक्री सर्वोच्च न्यायालयातून 6 मार्च 2019ला निवृत्त होणार असून या प्रस्तावासंदर्भात सरकारकडून कोणतीही पुढील सूचना मिळालेली नाही.

अलोक वर्मा यांच्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सिक्री यांची या समितीवर नियुक्ती केली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)