टिकटॉक या मोबाईल अॅपनं लोकांना का झपाटलं आहे?

Image copyright Getty / Google PlayStore

पहिला सीन

'एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो, रमेश बाबु?'

बॅकग्राउंडला दीपिका पदुकोण हिच्या आवाजात 'ओम शांती ओम' या सिनेमातील हा डायलॉग ऐकू येतो आणि स्क्रीनवर एका सामान्य मुलीचा चेहरा दिसतो. मुलगी आपली बोटं कपाळाकडे नेत अत्यंत इमोशनल होऊन डॉयलॉगनुसार ओठ हलवते.

दुसरा सीन

शाळेचा गणवेश घातलेली दोन मुलं 'दीवार' सिनेमातील डॉयलॉगची नक्कल करायचा प्रयत्न करतात. 'आज मेरे पास बंगला है, गाडी है, बैंक बैलन्स है. तुम्हारे पास क्या है?'

हे सगळं इतकं मजेशीर असतं की हसू येतं.

इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येकानेच असे व्हीडियो बघितले असतील. असे बहुतांशी व्हिडियो एका चीनी अॅपमुळे शक्य झाले आहेत.

Image copyright Tik tok /instagram

'टिकटॉक' आहे तरी काय?

'टिकटॉक' एक सोशल मीडिया अप्लिकेशन आहे. या अॅपवरून युजर छोटे-छोटे (पंधरा सेकंदांपर्यंतचे) व्हिडियो तयार करून शेअर करू शकतात.

या अॅप्लिकेशनचे कॉपी राईट 'बाईट डान्स' या चीनी कंपनीकडे आहे. या कंपनीने सप्टेंबर 2016 मध्ये 'टिकटॉक' अॅप लॉन्च केलं. 2018साली या अॅपची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि ऑक्टोबर 2018 मध्ये अमेरिकेत ते सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप ठरले.

गुगल प्लेस्टोरवर टिकटॉकची ओळख 'Short videos for you' (तुमच्यासाठी छोटे व्हिडियोज) अशी करून देण्यात आलेली आहे.

Image copyright Tik tok./instagram

प्ले स्टोरवर टिकटॉक विषयी लिहिलं आहे:

मोबाईलवर छोटे-छोटे व्हीडियो बनवण्यासाठी टिकटॉक हे काही सामान्य माध्यम नाही. हे बनावट नाही. खरे आहे आणि ते अमर्याद आहे - तुम्ही सकाळी 7.45 वाजता ब्रश करत असाल किंवा नाश्ता बनवत असाल - जे काही करत असाल, जिथेही असाल, टिक-टॉकवर या आणि 15 सेकंदात जगाला तुमचं म्हणणं सांगा.

टिकटॉकच्या साथीने तुमच्या आयुष्यातील मजा वाढेल. तुम्ही आयुष्याचा प्रत्येक क्षण जगता आणि प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन शोधता. तुम्ही तुमच्या व्हीडियोमध्ये स्पेशल इफेक्ट फिल्टर, ब्युटी इफेक्ट, इमोजी स्टिकर आणि म्युजिकने नवीन रंग भरू शकता.

भारतात टिकटॉक

भारतात टिकटॉक 10 कोटींपेक्षा जास्त मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यात आलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार दर महिन्याला जवळपास 2 कोटी भारतीय याचा वापर करतात.

गुगल प्लेस्टोरवर 80 लाख लोकांनी टिकटॉकचा रिव्ह्यू केला आहे. यावरूनच भारतात टिकटॉकच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल.

Image copyright Tik tok instagram

विशेष म्हणजे टिकटॉक वापरणाऱ्यांमध्ये छोटी शहरं आणि गावाखेड्यातील लोकांची संख्या मोठी आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे सात-आठ वर्षांच्या मुलांमध्येही टिकटॉकची क्रेझ आहे.

इतकेच काय आता तर श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ आणि नेहा कक्करसारखे बॉलिवुड कलावंतदेखील टिकटॉकवर आले आहेत.

टिकटॉकची वैशिष्ट्यं

  • टिकटॉकवरून व्हिडियो तयार करताना तुम्ही तुमचा आवाज वापरू शकत नाही. तुम्हाला लिपसिंक करावं लागतं.
  • फेसबुक आणि ट्विटरवर ब्लू टिक मिळवण्यासाठी म्हणजेच आपले अकाउंट व्हेरिफाय करून घेण्यासाठी सामान्य व्यक्तींना बरीच मेहनत घ्यावी लागते. मात्र टिकटॉकवर वेरिफाईड अकाउंट असणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या मोठी आहे. या अॅपवर ब्लू टिक नाही तर ऑरेंज टिक मिळतं.
  • ज्या युजर्सना ऑरेंज टिक मिळते त्यांच्या अकाउंटवर 'पॉप्युलर क्रिएटर' लिहिलेलं असतं. शिवाय अकाउंट बघितल्यावर युजरला किती हार्ट्स मिळाले आहेत, हे देखील कळतं. म्हणजेच किती लोकांना तो व्हीडियो आवडलेला आहे, हे कळतं.
Image copyright Tik tok/ instagram

लोकप्रियता आणि कमाईचे साधन

टिकटॉकचे काही फायदेही आहेत. विशेषतः छोटी शहरं आणि गावातील लोकांसाठी उत्तम व्यासपीठ म्हणून याकडे बघितलं जातं. अनेक जण या अॅपवरून आपले छंद पूर्ण करतात.

उदाहरणार्थ, कुणी विनोदवीर असेल किंवा कुणाला उत्तम नृत्य करता येत असेल, गाता येत असेल तर अशा लोकांना आपली कला सादर करण्यासाठी टिकटॉक चांगलं माध्यम आहे.

इतकेच नाही तर अनेक जण यातून कमाईदेखील करतात.

हरियाणाचे रहिवासी असलेले राहुल यांचे टिकटॉकवर 3,03,200 फॉलोअर्स आहेत. आपल्या व्हीडियोमधून त्यांना महिन्याला तीन ते पाच हजार रुपये मिळत असल्याचे त्यांनी बीबीसीला सांगितले.

आपलं अकाउंट व्हेरिफाय व्हावं आणि आपले दहा लाख फॉलोअर्स असावे, अशी त्यांची इच्छा आहे.

Image copyright Tik tok/instagram

बिहारचे उमेश आतापर्यंत वीगो अॅपवर आपले कॉमेडी व्हीडियो पोस्ट करायचे. यातून त्यांना महिन्याला पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं.

बीबीसीशी बोलताना उमेश सांगतात, "माझ्यासारख्या गरिबासाठी दहा हजार रुपये मोठी रक्कम आहे. आता टिकटॉक वापरण्याचा माझा विचार सुरू आहे."

Image copyright Tik tok/instagram

पैसे कसे मिळतात?

टेक वेबसाईट असलेल्या 'गॅजेट ब्रिज'चे संपादक सुलभ पुरी सांगतात की एखाद्या देशात अॅप लाँच केल्यानंतर कंपन्या वेगवेगळ्या भागातून काही लोकांची नियुक्ती करतात.

साधारणपणे दिसायला चांगले, चांगले विनोद करणारे, डान्स किंवा गाण्याची आवड असणारे अशा लोकांना हायर केलं जातं. त्यांनी रोज थोडे व्हीडियो टाकायचे आणि याचे त्यांना पैसे मिळतात.

याशिवाय कंपन्या स्ट्रगल करणारे किंवा नवख्या फिल्मस्टार किंवा कलाकारांनाही हायर करतात. अशा कलाकारांना यातून पैसेही मिळतात आणि प्लॅटफॉर्मही. दुसरीकडे कंपनीचा प्रचार-प्रसारही होतो.

सुलभ सांगतात, "या व्यतिरिक्त कंपनी आणि युजर्स यांच्या कमाईचे आणखी एक मॉडेल आहे. उदाहरणार्थ, आपल्या व्हीडियोत कुणी कोका-कोलाची एक बाटली दाखवली किंवा एखादी शॅम्पूची बाटली दाखवली तर ब्रँड प्रमोशन म्हणून दोघांचीही कमाई होते."

टेक वेबसाईट 'गिजबॉट'चे टीम लीड राहुल सचान सांगतात व्ह्यूज, लाईक, कमेंट आणि शेअरच्या प्रमाणात युजर्सना पैसे मिळतात.

राहुल सांगतात, आजकाल बहुतांश सोशल मीडिया अॅप्स व्ह्यूज ऐवजी 'एंगेजमेंट' आणि 'कॉन्व्हर्सेशन' वर जास्त लक्ष केंद्रित करतात. म्हणजे तुमच्या व्हीडियोवर जितके जास्त लोक रिअॅक्ट करतील आणि कमेंट करतील, तुमची कमाई तेवढी जास्त होण्याची शक्यता असते.

केवळ फायदे नाही तर धोकेही

- हे अॅप 13 वर्षांवरील व्यक्तींनीच वापरावे, असे गुगल प्लेस्टोरवर सांगितलं आहे. मात्र या नियमाचे पालन होताना दिसत नाही. भारतासह जगभरात टिकटॉकवर जे व्हीडियो तयार होतात त्यात 13 वर्षांखालील मुलांची मोठी संख्या आहे.

- प्रायव्हसीबद्दल सांगायचं तर टिकटॉकवर प्रायव्हसी राखली जातेच, असं नाही. कारण यात केवळ दोनच प्रायव्हसी सेटिंग्ज आहेत - 'पब्लिक' आणि 'ओनली मी'. म्हणजे तुमचा व्हीडियो फक्त तुम्ही बघू शकता किंवा इंटरनेट वापरणारा प्रत्येक जण तो बघू शकतो.

- कुणाला स्वतःचं टिकटॉक अकाउंट बंद करायचं असेल तर ती व्यक्ती स्वतः हे अकाउंट डिलीट करू शकत नाही. यासाठी तिला टिकटॉकला रिक्वेस्ट पाठवावी लागते.

- टिकटॉक पूर्णपणे सार्वजनिक असल्याने कुणीही कुणालाही फॉलो करू शकतं, मेसेज करू शकतं. अशा परिस्थितीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी व्यक्ती किंवा असामाजिक तत्त्व किशोरवयीन मुलांना नादी लावू शकतो.

- अनेक टिकटॉक अकाउंटवर अडल्ट काँटेंट आहे. टिकटॉकला कुठलेच फिल्टर नसल्याने कुणीलाही अगदी लहान मुलांनादेखील हा काँटेंट बघता येतो.

सुलभ पुरी सांगतात की टिकटॉकवरची सर्वांत मोठी अडचण म्हणजे यावरच्या कुठल्याच काँटेंटला 'रिपोर्ट' किंवा 'फ्लॅग' करता येत नाही.

त्यामुळे 16 वर्षांखालील मुलांनी हे अॅप वापरू नये, असे नियम कंपनीने तयार करायला हवे, असे त्यांना वाटते.

टिकटॉकची दुसरी मोठी समस्या सायबर बुलींग असल्याचं ते सांगतात. सायबर बुलींग म्हणजे इंटरनेटवर लोकांची टर उडवणे, त्यांचा अवमान करणे, त्यांना वाईट-साईट बोलणे, ट्रोल करणे.

ते सांगतात, "'हेलो फ्रेंन्ड्स, चाय पी लो'चे व्हिडियो बनवणाऱ्या स्त्रीचेच उदाहरण घ्या. तिला प्रसिद्धी हवी होती किंवा व्हायरल व्हायचं होतं, असं तुम्ही म्हणू शकता. मात्र कुणालाच ट्रोल झालेलं आवडत नाही. टिकटॉक सारख्या अॅपवर एखाद्याची टर उडवणे किंवा एखाद्याला ट्रोल करणं खूप सोपं आहे."

टिकटॉक सारखे सोशल मीडिया आपले पूर्वग्रह आणि मानसिकता यांचा पर्दाफाश करत असल्याचे व्यवसायाने थेरपिस्ट आणि काउंसिलर असणाऱ्या स्मिता बरुआ यांना वाटतं.

त्या म्हणतात, "अशा व्हिडियोमध्ये बरेचदा गावाखेड्यातील आणि लहान शहरातील लोकांची टर उडवली जात असल्याचे मी बघितलं आहे. सोशल मीडियावर विशिष्ट पद्धतीने आचरण न करणाऱ्यांचीही टर उडवली जाते. अशावेळी 'डिजीटल डिव्हाईड' स्पष्ट दिसतो."

टिकटॉकसारख्या अॅप्सवर थोडंफार का होईना मात्र नियंत्रण असायला हवं, असं राहुल सचान यांचंही मत आहे.

Image copyright Tik tok/ instagram

ते सांगतात, "इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर किशोरवयीन मुलं पॉर्न काँटेंट अपलोड आणि शेअर करण्यासाठी टिकटॉकचा वापर करत असल्याने तिथे जुलै 2018 मध्ये या अॅपवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर काही बदल आणि अटींसह अॅपला पुन्हा परवानगी मिळाली."

राहुल यांच्या मते भारतात फेक न्यूजचा जो वारेमाप प्रसार होत आहे, ते बघता या अॅपवर बंधनं घालण्याची गरज आहे. ते म्हणतात, "एखादं अॅप डाउनलोड करताना आपण त्यातील प्रायव्हसीच्या अटींकडे फार लक्ष देत नाही. आपण केवळ 'येस' आणि 'अलाउ'वर टिक करतो. आपण आपली फोटो गॅलरी, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर या सर्वांचा एक्सेस देत असतो. यानंतर आपली माहिती कुठे जाते, त्याचा कसा वापर होतो, हे आपल्याला कळतही नाही."

राहुल सांगतात की आजकाल बहुतांश अॅप्स 'कृत्रिम बुद्धीमत्ता' म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाचा वापर करतात. अशावेळी तुम्ही एकदा जरी याचा वापर केला तर तुमच्याशी संबंधित बरीच माहिती त्यांच्याकडे साठवली जाते. म्हणूनच असे अॅप्स वापरताना फार सजग राहण्याची गरज आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)