वर्ल्ड कप 2019मध्ये धोनीनं खेळणं का आवश्यक आहे?

Image copyright Reuters

लोक म्हणाले,'तो संपला आहे.'

लोक म्हणाले,'तो आता म्हातारा झाला आहे.'

लोक म्हणाले,'तो आता संघावर ओझं झाला आहे.'

लोक म्हणाले,'त्याने आता तरुण खेळाडूंना जागा करून दिली पाहिजे.'

पण भारतीय क्रिकेट संघाला 3 आयसीसी स्पर्धा जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने याही वेळी पुन्हा एकदा टीकाकारांना बॅटनं उत्तर दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऑस्ट्रेलियाचा वनडे मालिकेत पराभूत करण्यात धोनीची भूमिका महत्त्वाची ठरली. धोनीने 3 सामन्यांत अर्धशतकं झळकवली. तर दोन वनडेमध्ये तोच फिनिशर धोनी दिसला ज्यासाठी क्रिकेटप्रेमी वेडे आहेत.

उत्तम कामगिरीसाठी धोनीला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कारही मिळाला. या तीन सामन्यांत त्याने एकूण 193 धावा केल्या. दोन वेळा सामना जिंकूनच तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

भारतासाठी धोनीचं महत्त्व काय आहे हे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उत्तमरीत्या सांगितलं आहे. टेलेग्राफला त्यांनी इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांना मुलाखत दिली आहे. त्यात ते म्हणतात, "धोनीची जागा दुसरा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही. असे खेळाडू 30-40 वर्षांत एकदाच होत असतात. मी भारतीयांनाही हेच सांगतो, तो जोवर खेळत आहे, तोवर त्याच्या खेळाचा आनंद घ्या. तो जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला एक पोकळी दिसेल ती कधीही भरून येणार नाही."

Image copyright Reuters

37 वर्षांचा धोनी संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू आहे. मैदानावर कर्णधार विराट कोहलीला सल्ला देताना तो नेहमी दिसतो. फिल्डिंगचं नियोजन आणि डीआरएसबद्दल विराट, धोनीशी सल्लामसलत करताना दिसतो. यावर शास्त्री सांगतात, "ज्या ठिकाणी धोनी असतो तेथून तो खेळ उत्तमरीत्या पाहू शकतो. संघातील खेळाडूंशी त्याचे संबंध उत्तम आहेत. आताचा संघ त्यानेच उभा केला आहे आणि या संघाचं त्याने 10 वर्ष नेतृत्व केलं आहे. ड्रेसिंगरूममध्ये त्याला जो मान मिळतो तसा मिळणं फार आवश्यक आहे."

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर मे महिन्यात इंग्लंडमध्ये होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रमुख दावेदार म्हणून पुढं आला आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने उत्तम बॅटिंग, बॉलिंगच्या जोडीने फिल्डिंगचं ही प्रदर्शन केलं आहे. अर्थात इंग्लंडमधील विराट आणि त्याच्या संघाची कामगिरी समाधानकारक नव्हती. मधल्या फळीतील बॅटिंगवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे धोनी वर्ल्ड कपच्या संघात असला पाहिजे का, असे प्रश्न उपस्थित होत होते. क्रिकेट समीक्षक अयाज मेमन यांनीही धोनीवर टीका केली होती.

अर्थात धोनीच्या सुवर्ण काळात त्याच्या फलंदाजीची जी धार होती ती आता राहिलेली नाही, हे मान्य केलं तरी त्याच्यासाठी संघात जागा नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल.

Image copyright Getty Images

335 वनडेंचा अनुभव असलेल्या धोनीने 10 हजारांवर धावा केल्या आहेत. जेव्हा जेव्हा टीकाकारांना उत्तर द्यायची वेळ येते तेव्हा त्याची बॅट बोलते. चांगल्या आणि वाईट फॉर्ममध्ये फक्त एका उत्तम खेळीचं अंतर असतं हे त्याला माहिती आहे. ऑस्ट्रेलियात त्याने केलेल्या खेळीने पुन्हा एकदा समीक्षक त्याच्या प्रतिभेचं कौतुक करत आहेत.

ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत उत्तम खेळी केली आहे. पण वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत जेव्हा धोनी की पंत असा प्रश्न निवड समिती समोर असेल तेव्हा निवड समिती धोनीचीच निवड करेल. मेलबर्नमधील विजयानंतर कोहली म्हणाला होता, "भारतीय संघात समर्पित भावनेने खेळणारा धोनीसारखा दुसरा खेळाडू नाही. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो आदर्श खेळाडू आहे."

वर्ल्ड कप 2019च महत्त्व विराट आणि रवी शास्त्री यांना माहिती आहे. ते टीकाकारांनाही लवकरच समजावे, अशी अपेक्षा आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)