कॅबरे डान्स आजकाल सिनेमात का दिसत नाही?

हेलन आणि धर्मेंद्र एका कॅबरेमध्ये Image copyright Twitter @BombayBasanti
प्रतिमा मथळा हेलन आणि धर्मेंद्र एका कॅबरेमध्ये

"लेडिज अँड जेंटलमॅन, जिस प्रोग्राम का आपको इंतजार था, वो अब शुरू होता है. दिल थामकर बैठिए, पेश-ऐ-खिदमत है हिंदुस्तान की मशहूर डान्सर, वन अँड द ओनली वन... मोनिका."

हिंदी सिनेमांमध्ये हेलन आणि तिच्या कॅबेरे डान्सची सुरुवात किती शाही पद्धतीने व्हायची, याचा अंदाज 1971 साली आलेल्या 'कारवाँ' सिनेमातील या डायलॉगवरून येतो. या उद्घोषणेनंतर पडद्यावर हेलन अवतरते आणि सादर करते प्रचंड गाजलेला आणि आजही पार्ट्यांची शान असणारा कॅबरे - पिया तू..... अब तो आ जा...

रिचा चढ्ढा आणि क्रिकेटर श्रीसंत यांचा एक सिनेमा येत आहे. यात रिचा एक कॅबेरे डान्सर आहे. 50 आणि 60च्या दशकात हिंदी सिनेमांमध्ये कॅबेरे डान्स हमखास असायचा.

Image copyright ZEE5

हेलन, जयश्री टी, बिंदू, अरुणा इराणी, पद्मा खन्ना - या सर्व कलावंत सिनेमांमध्ये कॅबेरे करून प्रसिद्ध झाल्या आहेत.

हिंदी सिनेमांमध्ये कॅबरेचा इतिहास सांगायचा झाला तर, हेलनच्याही आधी 40 आणि 50च्या दशकात अँग्लो-इंडियन वंशाची कुकू या डान्ससाठी प्रसिद्ध होती. राज कपूरच्या 'आवारा', 'बरसात', महबूब खान यांच्या 'आन'मधील तिचे डान्स फार गाजले.

म्युझिक वेबसाईट साँगपीडियाच्या संस्थापक दीपा एका गाण्याचा उल्लेख करतात - गीता दत्त यांचा आवाज आणि ओपी नय्यर यांचं संगीत असलेल्या 'मिस्टर अँड मिसेस 55' सिनेमातील नीले आसमानी, बुझो तो ये नैना बाबू किसके लिए है.

या गाण्यात मधुबाला आहे, मात्र गाण्यात कॅबेरे करणारी कुकू सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.

कॅबेरे क्वीन हेलन

कुकूनेच हेलनला सिनेसृष्टीत आणलं. त्यावेळी हेलन केवळ 12-13 वर्षांची होती. हेलन कुकूच्या मागे कोरसमध्ये डान्स करायची.

Image copyright Twitter @BombayBasanti
प्रतिमा मथळा हेलन एका कॅबरेमध्ये

कुकूच्या तालमीत हेलन सर्वांत लोकप्रिय कॅबेरे डान्सर म्हणून चमकली. ती 1969 मध्ये 'करले प्यार करले की दिन है ये ही' असं म्हणणारी क्लब डान्सर रीटा झाली तर 1978 साली 'डॉन'मध्ये अमिताभ बच्चनचं लक्ष विचलित करायला 'ये मेरा दिल...' गाणारी कामिनी झाली. कधी ती 'पिया तू अब तो आ जा'च्या तालावर थिरकली तर कधी 'अनामिका'मध्ये व्हॅम्पच्या भूमिकेत 'आज की रात कोई आने को है...' गाताना दिसली.

कमालीची लवचिकता, झगमगणारे कपडे, भडक मेकअप, जाळीदार स्टॉकिंग्स आणि त्यात कॅबरे, हे हेलनचं वैशिष्ट्य बनलं.

कथानकाला पुढे न्यायचे कॅबेरे

50-60च्या दशकातील सिनेमातील कथानकातच कॅबेरे असायचा. आजच्या आयटम नंबर आणि त्या काळातील कॅबरेमध्ये हाच फरक असल्याचं द सॉन्गपीडियाच्या दीपा सांगतात.

Image copyright SAWAN KUMAR

उदाहरणार्थ, 1971 साली आलेल्या 'कटी पतंग' सिनेमातील बिंदूचा तो हिट कॅबरे - 'मेरा नाम है शबनम, प्यार से लोग मुझे कहते है शब्बो.' बिंदू जिथे कॅबरे करत असते, तिथे आशा पारेख आणि राजेश खन्नाही तो कॅबरे बघायला येतात आणि बिंदू कॅबरेच्या माध्यमातूनच खाणाखुणात आशा पारेखला तिला तिच्या आयुष्यातील कटू सत्य माहिती असल्याचं सांगते.

बिंदू, जयश्री टी आणि अरुणा इराणीचे कॅबरे

बिंदूने देखील कॅबरेमध्ये नाव कमावलं आहे. 1973 साली आलेल्या 'अनहोनी' सिनेमातील 'मैंने होठों से लगाई तो हंगामा हो गया' असो किंवा 'जंजीर'मधील अमिताभ बच्चनसमोर 'दिलजलों का दिल जला के' गाणारी मोना डार्लिंग.

जयश्री तळपदे जयश्री टी नावाने प्रसिद्ध झाली. 1971 साली आलेल्या 'शर्मिली' सिनेमात आशा भोसलेच्या आवाजातील 'रेश्मी उजाला है, मखमली अंधेरा' या गाण्यात जयश्री टी दिसते.

Image copyright GULSHAN RAI

कॅबेरे म्हटलं की अरुणा इराणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. नंतर तिने कॅरेक्टर रोल केले. मात्र सत्तरच्या दशकात ती कॅबेरेच्या माध्यमातून बरीच लोकप्रिय झाली. 'कारवाँ' सिनेमातील 'दिलबर दिल से प्यारे'मधील अरुणा इराणीला कोण विसरू शकेल.

आर डी आणि नय्यर

संगीततज्ज्ञ पवन झा यांच्या मते हेलन कॅबरेच्या सर्वश्रेष्ठ अँबेसेडर आहे आणि आशा भोसले आणि गीता दत्त सर्वांत मस्त कॅबरे गायच्या. एस. डी. आणि आर. डी. बर्मन यांच्यानंतर ओ. पी. नय्यर यांनी कॅबेरेला सर्वोत्तम संगीत दिल्याचं ते सांगतात.

'अपना देश' सिनेमातील कॅबेरे 'दुनिया में लोगों को, धोका कहीं हो जाता है...' या गाण्यात आर. डीं. बर्मननी संगीत तर दिलं आहेच, शिवाय आशा भोसलेसोबत गाणं गायलंही आहे.

लता मंगेशकर यांनी खूप कमी कॅबरे गायले आहेत. 'इंतकाम' सिनेमातील हेलनवर चित्रित 'आ जाने जा' हा कॅबरे लता मंगेशकर यांनी गायला आहे.

कॅबेरे आणि व्हॅम्पचे नाते

शर्मिला टागोरपासून अनेक हिरोईन्सने कॅबेरे केला आहे. 1967 साली आलेल्या 'An Evening in Paris' या सिनेमात शर्मिला टागोर यांनी कॅबेरे केला आहे.

मात्र त्या काळात कॅबेरे सहसा सिनेमातील व्हॅम्प किंवा खलनायिकेच्या वाट्यात यायचे. किंवा मग जिथे स्त्रीला वाईट किंवा वेस्टर्न दाखवायचे असेल तिथे. उदाहरणार्थ, पद्मा खन्नावर चित्रित 'हुस्न के लाखों रंग' गाणं.

Image copyright FILM QURBAANI

80चं दशक उजाडेपर्यंत कॅबरे बदलू लागला. 50 आणि 60च्या दशकात आदर्श स्त्रीची जी प्रतिमा होती, परवीन बाबी आणि झीनत अमान त्या प्रतिमेपेक्षा फार वेगळ्या होत्या. एव्हाना व्हॅम्प नव्हे तर स्वतः हिरोइनच कॅबेरे करू लागल्या होत्या.

पवन झा सांगतात नंतरच्या काळात हिरोईन असूनदेखील परवीन बाबी यांना 'जवानी जानेमन' (नमक हराम) किंवा 'सनम तुम जहाँ मेरा दिल वहाँ' (कालिया) या गाण्यांवर कॅबरे करताना बघणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागलं. तसंच 'द ग्रेट गॅम्बलर' सिनेमातील झीनत अमान यांनी 'रक्कासा मेरा नाम' या गाण्यावर केलेला कॅबेरेही लोकांच्या लक्षात राहिला.

आयटम साँग विरुद्ध कॅबेरे

संगीत बदलत गेलं आणि नव्वदीचं दशक येईपर्यंत कॅबरे गायब होऊ लागले. 1992 साली आलेल्या राम गोपाल वर्मा यांच्या 'द्रोही' सिनेमात सिल्क स्मिताने एक कॅबरे केला होता, अशी आठवण पवन झा काढतात. आर.डी. बर्मन यांच्यासोबत आशा भोसलेंचा तो कदाचित शेवटचा कॅबेरे असावा.

2000 सालानंतर आला आयटम साँगचा काळ आणि कॅबरे पूर्णपणे बाद झाले. सिनेमाचे कथानक असो किंवा संगीत, कुठेच कॅबरेची गरज उरली नाही.

Image copyright SHEEMAROO

आयटम नंबरने कॅबरेचं स्थान बळकावलं होतं. ही अशी गाणी होती, ज्यांचा कॅबेरेमध्ये असायचा तसा सिनेमाच्या कथानकाशी काहीच संबंध नव्हता.

कधी कधी काही तुरळक कॅबरे दिसायचे. उदाहरणार्थ, 'परिणिता' सिनेमातील रेखावर चित्रित करण्यात आलेलं 'कैसी पहेली है ये ज़िंदगानी' गाणं किंवा 'गुंडे'मध्ये प्रियंका चोप्राचा कॅबरे.

कॅबेरेचा काळ

कॅबेरेला बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्याचा विश्वासार्ह मार्ग मानलं जायचं, यात शंका नाही. या गाण्यांमध्ये सेक्स अपील आणि सेंशुअॅलिटी असायची.

मात्र त्यासोबतच संगीत आणि नृत्याचा एक फॉर्म म्हणून हिंदी सिनेमांमध्ये कॅबरे एक कला मानली गेली, हेही तितकेच खरे.

Image copyright GUL ANAND

कॅबरेच्या सीमेत राहूनदेखील अनेक भावना व्यक्त केल्या जाऊ शकत होत्या. पवन झा उदाहरण देतात 'बॉन्ड 303' सिनेमातील हेलनच्या कॅबेऱ्याचं. यात हेलन गुप्तहेर असलेल्या जितेंद्रला गुगलप्रमाणे त्याला हव्या असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण नकाशा कॅबेरेच्या माध्यमातून सांगते - 'माहिम से आगे वो पुल है, उसके बाएँ तू मूड जाना, आगे फिर थोडी उँचाईं है, कोने में है मैखाना'.

किंवा मग 1978 साली आलेला सिनेमा 'हिरालाल पन्नालाल'. यात एक वडील अनेक वर्षांपूर्वी हरवलेल्या आपल्या मुलीला, म्हणजेच झीनत अमानला भेटतात. त्यावेळी जझीनत अमान एक उदास कॅबेरे करत असते.

शेवटी एक उल्लेख करायलाच हवा. तो म्हणजे 1973 साली आलेला 'धर्मा'चा. या सिनेमात त्या काळच्या गाजलेल्या पाच कॅबेरे डान्सर एकत्र दिसल्या होत्या - हेलन, जयश्री, बिंदू, सोनिया आणि फरयाल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)