इस्रो अंतराळात प्राणी न पाठवता रोबो का पाठवणार आहे?

अंतराळवीर Image copyright Getty Images

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने इतर काही देशांप्रमाणे अंतराळात परिक्षणासाठी प्राणी न पाठवता रोबो पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

2021पर्यंत अंतराळात मानव पाठवण्याच्या मोहिमेवर इस्रोचे काम सुरू आहे. त्यासाठीच्या चाचणी प्रक्रियेत इस्रो 'मानवी रोबो'ची मदत घेणार आहे.

इस्रोचे प्रमुख के शिवन यांनी बीबीसीला सांगितलं की, "अंतराळात होणाऱ्या क्लिष्ट चाचणी प्रक्रियेत निरपराध जनावरांची मदत घेण्याचा आमचा विचार नाही."

भारतीय प्रवाशांना अंतराळात पाठवण्यासाठी 'गगनयान मिशन' ही योजना आखल्याची माहिती भारत सरकार आणि इस्रोने दिली आहे.

अमेरिका, रशिया आणि चीन यांनी अंतराळात मानवाच्या आधी जनावरांना पाठवून चाचणी केली होती. तर मग भारताने तसे का केले नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.

इस्रो प्राणी का पाठवणार नाही?

बीबीसीनं इस्रो प्रमुख के. शिवन यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले, "भारत अगदी योग्य पाऊल उचलत आहे."

ते म्हणाले, "अमेरिका आणि रशियाने ज्यावेळी अंतराळात प्राणी पाठवले त्यावेळी आजचे अत्याधुनिक तंत्रज्ञान नव्हते. मानवी रोबोचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळेच मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात टाकावा लागत होता. आता आपल्याकडे चाचणी करणारे सेंसर्स आहेत. तंत्रज्ञान आहे. तर मग त्यांचा आधार का घेऊ नये?"

'गगनयान मिशन' लॉन्च करण्याआधी दोन चाचण्या घेण्याची इस्रोची योजना आहे. यात मानवी प्रकृतीशी मिळत्या जुळत्या रोबोचे प्रयोग केले जातील.

मात्र जिवंत वस्तू आणि रोबोमध्ये काहीतरी फरक तर नक्कीच असतो. त्यामुळे अशा प्रकारची चाचणी धोकादायक ठरू शकते, असे काही जाणकारांचे मत आहे.

विज्ञानविषयक तज्ज्ञ पल्लव बागला सांगतात, "गगनयान अंतर्गत इस्रो थेट मानवालाच अंतराळात पाठवू इच्छित असेल तर त्यांना त्यांच्या पहिल्या दोन चाचण्यांमध्ये लाईफ सपोर्ट सिस्टिमचे परिक्षण करावे लागेल. म्हणजेच कार्बन डायऑक्साईड सेंसर, हीट सेंसर, ह्युमिडिटी सेंसर आणि क्रॅश सेंसर या गोष्टी तर रोबोच्याच वाट्यात येतील. माझ्या मते जोखीम मोठी आहे. कारण भारत अंतराळात थेट मानवाला अशा फ्लाईटमध्ये पाठवू इच्छितो ज्यात पूर्वी कधीच कुठली जिवंत वस्तू गेलेली नाही. जोखीम तर मोठी आहेच."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इस्रो प्रमुख के. शिवन

दुसरीकडे इस्रोच्या म्हणण्यानुसार गगनयान मोहीम वेगाने प्रगतीपथावर आहे आणि या वर्षाच्या शेवटापर्यंत प्रवाशांचा शोधही संपेल.

पंतप्रधान मोदींनी केली होती घोषणा

बीबीसीने इस्रो प्रमुख के. शिवन यांना प्रश्न केला, "अशा पद्धतीने पहिल्यांदा अंतराळात जाणाऱ्या भारतीय आंतराळवीरांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही का?"

शिवन यांनी या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर दिले.

सरकारी आकडेवारीनुसार भारताच्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा खर्च जवळपास 10,000 कोटी रुपये आहे आणि सरकारने या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला आहे.

2018 च्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, "ही मोहीम रुळावर राहो आणि यशस्वी होवो, यासाठी इस्रो आणि मंत्रालयावर थोडा दबाव आहे, हे तर उघडच आहे."

Image copyright TWITTER

इस्रो प्रमुख के. शिवन यांच्या मते, "गगनयानसाठी व्यवस्थापन आणि स्पेसलाईट सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. पहिली मानवरहित मोहीम डिसेंबर 2020पर्यंत आणि अशी दुसरी मोहीम जुलै 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे आणि भारताची पहिली 'रियल ह्युमन स्पेस फ्लाईट' डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे."

ही मोहीम यशस्वी झाली तर भारत अंतराळात मानवाला पाठवणारा चौथा देश ठरेल.

सर्वात आधी रशिया (पूर्वीचे सोव्हियत युनियन) आणि त्यानंतर अमेरिकेने पन्नास वर्षांपूर्वी अंतराळात पाऊल ठेवले होते.

या दोन्ही देशांनी मानव मोहिमेपूर्वी प्राण्यांना पाठवले होते. प्राण्यांची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मानवाला पाठवण्यात आले.

या मोहिमांनंतर अनेक दशकांनी 2003 साली चीनने मानवी अंतराळ मोहीम यशस्वी केली.

पल्लब बागला सांगतात, "बहुतांश देश आपल्या अंतराळात मोहिमांविषयी गुप्तता पाळतात. उदाहरणार्थ 2003 साली चीनचा पहिला अंतराळवीर परतला तेव्हा तो रक्तबंबाळ होता, अशा अनधिकृत बातम्या आल्या होत्या."

इतर काही जाणकारांच्या मते, "अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये जोखीम अधिक असते."

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायंसेसमधून निवृत्त झालेले प्राध्यापक आर. के. सिन्हा यांनी सांगितले, "ब्रिटेन, फ्रान्स, जापान यासारख्या राष्ट्रांना अजूनही यात यश आलेले नाही. भारताने दहा हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. तेव्हा काय होते, हे बघावं लागेल."

पल्लव बागलादेखील याला दुजोरा देत म्हणतात, "आश्वासन तर मोठं आहे आणि जोखीमही. मात्र इस्रो जे म्हणते ते बहुतेकवेळा करतेच."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)