नरेंद्र मोदी : काँग्रेस असती तर 4.5 लाख कोटी 'गायब' झाले असते #5मोठ्याबातम्या

Image copyright Getty Images

1. काँग्रेस असती तर 4.5 लाख कोटी 'गायब' झाले असते- मोदी

रफाल करारावरून सत्ताधारी भाजपवर झालेल्या आरोपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसची व्यवस्था सुरू असती तर किमान 4.5 लाख कोटी रुपये हे त्या व्यवस्थेतच गायब झाले असते, असा आरोप मोदी यांनी केल्याचं वृत्त न्यूज18नं दिलं आहे. ही व्यवस्था आपण गेल्या 4.5 वर्षांत बदलल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी अनिवासी भारतीय संमेलनात केला.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकदा म्हटलं होतं की केवळ 15 टक्के निधी हा जनतेपर्यंत पोहोचतो. या वाक्याचा आधार घेत आणि राजीव गांधी यांचे थेट नाव न घेता मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या सरकारनं तंत्रज्ञानाचे साहाय्य घेतल्याचे ते म्हणाले. ॉ

2. अमित शहा यांची प्रकृती पुन्हा बिघडली

भाजप अध्यक्ष अमित शहा यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते पश्चिम बंगालमधून मंगळवारी दिल्लीत परतले. त्यांची झारगाम येथे सभा होणार होती. त्या सभेला ते उपस्थित राहू शकणार नाहीत अशी माहिती पश्चिम बंगालच्या भाजप नेत्यांनी दिली. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे

Image copyright AMIT SHAH/TWITTER
प्रतिमा मथळा अमित शहा

अमित शहा हे खूप आजारी आहेत. त्यांना ताप होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना स्वाइन फ्लू झाला होता. असं भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलं. दिल्लीला परतण्यापूर्वी अमित शहा यांनी मालदा येथे सभेला संबोधित केलं होतं.

3. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार सुभाष चंद्र बोस संग्रहालयाचे उद्घाटन

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 122 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींच्या स्मरणार्थ संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. लाल किल्ल्यात हे संग्रहालय खुलं होणार असून हे संग्रहालय डिजिटल स्वरूपाचे असेल अशी बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे. नेताजींच्या जन्मापासून ते आझाद हिंद फौजेच्या लढ्यापर्यंत त्यांचा प्रवास यातून उलगडून दाखवला जाणार आहे असं एक्सप्रेसनं म्हटलं आहे.

4. ईव्हीएम हॅकिंगचा आरोप करणाऱ्या शुजाविरोधात पोलिसांत तक्रार

गेल्या निवडणुकीत ईव्हीएम हॅक झालं होतं असा आरोप करणाऱ्या सय्यद शुजा यांनी आमच्यासोबत कधीही काम केलं नव्हतं असं इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडनं म्हटलं आहे. ECIL ही कंपनी ईव्हीएम बनवते. देशातील दोन कंपन्या ईव्हीएम बनवण्यात त्यापैकी एक ECIL आहे. त्यांनी सुजांचे दावे फेटाळले आहेत.

सय्यद शुजांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी बातमी टाइम्स नाऊने दिली आहे.

5. भारत आर्थिक बाबतीत चीनच्या पुढे निघून जाईल- रघुराम राजन

आर्थिक आकारमानामध्ये भारत चीनला मागे टाकून पुढे निघून जाईल. असं वक्तव्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दावोस येथे केलं. अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

दक्षिण आशियात पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीतही भारत चांगल्या स्थितीमध्ये असेल असंही ते म्हणाले. दावोस येथे दक्षिण आशिया विषयीच्या सत्रामध्ये ते बोलत होते. चीनचा विकास दर मंदावत असताना भारताची अर्थव्यवस्था वाढतच जाणार आहे असे ते म्हणाले. चीनचा वेग मंदावणार असून भारताची प्रगती सुरुच रहाणार आहे. त्यामुळे दक्षिण आशियात पायाभूत सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीत भारत चांगल्या स्थितीमध्ये असेल. आज हेच काम चीन करत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)