काश्मिरला बर्फवृष्टी पाहण्यासाठी जात आहात? थोडं थांबा...

बर्फ Image copyright Getty Images

थंडीचं वातावरण आणि काश्मीरमध्ये पडणाऱ्या बर्फाचं वर्णन ऐकून तुम्ही काश्मिरमध्ये जाण्याच्या तयारीत तर नाहीत ना? जर काश्मीरला जायचं असेल तर थोडं थांबा आधी हे वाचा. मगच तुमचा निर्णय घ्या.

काश्मिरमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे. तुम्हाला जाणून घ्यायचंय सध्या तिथं कसं वातावरण आहे.

बर्फ पडतोय आणि महामार्गावर ट्रकांच्या लांबचलांब रांगा आहेत. ट्रकच्या बोनेटवर ठेवलेल्या स्टोव्हवर ड्रायव्हर राम सिंह जेवण बनवत आहेत. तितक्यात काही लागलं म्हणून ते उठले आणि त्यांच्यासोबत असलेले लोक त्या संधीचा फायदा घेत त्या आचेवर आपले हात गरम करू लागले. तर ही सध्याची काश्मिरची स्थिती आहे.

Image copyright Majid jahangir/bbc

जम्मू-श्रीनगर हायवेवर दोन दिवसांपासून ट्राफिक जाम आहे. या गाड्यांचे ड्रायव्हर आणि क्लिनर हे बर्फात बसले नाहीत तर त्यांचाच बर्फ झाला आहे. थंडीमुळे त्या लोकांचा दोन रात्रींपासून डोळा लागला नाही. या गोष्टीचा ते सातत्याने पुनरुच्चार करत आहेत.

40 वर्षांचे राम सिंह बीबीसीला सांगतात, "गेल्या दोन दिवसात आम्हाला काय त्रास झाला ते तुम्हाला कसं सांगावं साहेब?"

Image copyright Majidjahangir

राम सिंह हे अंबालातले आहेत. बर्फवृष्टीमुळे ते अनंतनाग संगम इथं फसले आहेत. गेल्याच आठवड्यात ते दिल्लीहून मालाने भरलेला ट्रक घेऊन काश्मीरमध्ये आले. रस्ते बंद झाल्यामुळे त्यांच्यासारखे शेकडो ड्रायव्हर एका जागी अडकले आहेत. पोलिसांनी हिरवा कंदील दिल्याशिवाय त्यांना तिथून हालणं शक्य नाही.

आपल्या ट्रकच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून राम सिंह सांगतात, "माहीत नाही हा बर्फ पडणं कधी थांबेन आणि मी माझ्या घरी कधी परत जाईन."

Image copyright Majidjahangir

बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर हायवेवरील वाहतूक प्रशासनानं बंद केली आहे. त्यामुळेच हायवेवर मोठी रांग लागली आहे. या हायवेला काश्मिरची लाइफ लाइन म्हटलं जातं. हा हायवे काश्मीरला उर्वरित भारतासोबत जोडतो.

याच हायवेवर अडकलेले संतोष सांगतात, "माझं आत्ताच माझ्या मुलाशी बोलणं झालं. मी घरी कधी येणार असं तो विचारत होता. त्याला मी काय उत्तर देऊ. आम्हाला याचा बिल्कुल अंदाज नाही की हा रस्ता कधी सुरू होईल? आणि आम्ही जम्मूला जाऊ शकू. ट्रकमध्ये बसून राहणं किंवा झोपणं ही सोपी गोष्ट नाही. तापमान मायनसमध्ये आहे. थंडीशी आम्ही तर झगडतोय पण त्याचबरोबर जेवण आणि पैशांची चणचण आम्हाला जाणवू लागली आहे."

Image copyright Majidjahangir

जम्मू-श्रीनगर हायवे 300 किमी लांब आहे. जवाहर टनेलमध्ये बर्फ जमा झाल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. रविवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे भूस्खलन झालं आहे. त्यामुळे ट्रकच नाही तर इतर गाड्यादेखील हायवेवर अडकल्या आहेत.

बर्फवृष्टी कधी थांबेल?

हवामान खात्याचा अंदाज आहे की 23 जानेवारीपर्यंत जोरदार बर्फवृष्टी होईल. तसंच पाऊसही पडेल. काजीगुंड येथे देखील शेकडो ट्रक रस्ता उघडण्याची वाट पाहत आहेत.

याच भागात अडकलेले ट्रक ड्रायव्हर मोहम्मद आरिफ सांगतात, "रात्री झोप येत नाही. आणि झोप आली तरी ट्रकची बॅटरी चार्ज ठेवण्यासाठी आम्हाला ट्रक सुरू ठेवावा लागतो. जर बॅटरी डिस्चार्ज झाली तर ट्रक सुरू होणं कठीण होऊन जाईल. ट्रक इतके जास्त आहेत की जेवणाचं सामान आणायला जाणं देखील कठीण झालं आहे.

Image copyright Majidjahangir

ज्या ट्रकमध्ये जेवायचं सामान आहे ते जवाहर टनेलमध्ये अडकले आहेत. दुकानातलं खाण्याचं सामान संपत आलं आहे. या गोष्टीवरूनच तुम्हाला आमच्या परिस्थितीचा अंदाज आला असेल."

आरिफ यांच्यासारखेच एक ड्रायव्हर आहेत. मोहम्मद रमजान असं त्यांचं नाव आहे. ते सांगतात, "आम्हाला खूप त्रास होतोय. पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाहीये. स्थानिक लोकच आम्हाला पाणी देत आहेत. जेवण आणि पाण्यासाठी खूप दूर जावं लागत आहे."

हिमस्खलनमुळे रामबनमध्ये दोन लोकांचा जीव गेला आणि दोन जण बेपत्ता झाले आहेत.

हिमस्खलनाने याआधी केलंलं नुकसान

1995 मध्ये जवाहर टनलजवळ हिमस्खलन झालं होतं. त्यामुळे अनेकांचा जीव गेला होता. तेव्हा देखील रस्ते बंद करण्यात आले होते.

Image copyright Majidjahangir

पण हिमस्खलनामुळे सर्वांत मोठी आपत्ती 2005 साली आली होती. त्यावेळी 200 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यावेळी ज्या लोकांचं नुकसान झालं होतं त्यातले अद्याप बरेच लोक नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

हिमस्खलनाची शक्यता पाहून प्रशासनाने पुढच्या 24 तासांसाठी हाय अलर्ट दिला आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (वाहतूक) आलोक सिंह सांगतात "हायवेवर 350 ट्रक आहेत तर उधमपूरमध्ये 1400 ट्रक ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले आहेत."

"हवामान खात्याकडून येणाऱ्या माहितीच्या आधारावर आम्ही ट्रक थांबवले आहेत. आम्हाला सर्वांच्या सुरक्षेची चिंता आहे. वेगवेगळ्या भागात आम्ही एकूण 1400 ट्रक थांबवले आहेत. अंदाजे 70 किमी रस्ता बर्फाखाली झाकला गेला आहे. वातावरण चांगलं झालं तर आम्ही वाहतूक देखील सुरू करू," असं आलोक सिंह म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)