प्रियंका गांधी दुसऱ्या इंदिरा गांधी होऊ शकतात का?

इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी Image copyright Getty Images

साल १९९९. स्थळ रायबरेली. निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. काँग्रेसकडून कॅप्टन सतीश शर्मा रिंगणात होते, तर भाजपकडून अरुण नेहरु. हो अरुण नेहरु. राजीव गांधी यांचे चुलतभाऊ. त्यावेळी २७ वर्षाची एक तरुणी काँग्रेसचा प्रचार करत होती.

तिला बघायला प्रचंड गर्दी उसळायची. अर्थात अरुण नेहरु रायबरेलीतून आधीही निवडून आले होते. त्यामुळे भाजपची हवा होती. पण २७ वर्षाच्या त्या तरुणीनं भर सभेत सवाल केला, "मेरे पिताजी से दगाबाजी करनेवालो को आपने यहाँ पर घुसने कैसे दिया?'' सभा प्रचंड गाजली. तिच्या वक्तव्याची चर्चा दिल्लीपर्यंत आली.

दुसऱ्या दिवशी अरुण नेहरुंच्या प्रचारासाठी वाजपेयी आले. त्यांनी भाषणात त्या २७ वर्षाच्या तरुण मुलीच्या वक्तव्यावर अतिशय खेळीमेळीत कोपरखळ्या हाणल्या. ते म्हणाले, "हमने सुना यह किसी का इलाका है, आपने इस आदमी को घुसने कैसे दिया'' अर्थात निवडणूक प्रचार अटीतटीचा झाला. पण निकाल आला आणि सगळेच अवाक् झाले. कारण भाजपचे अरुण नेहरु चक्क चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. आणि त्यांना आव्हान देणारी ही तरुणी म्हणजे प्रियंका राजीव गांधी.

काल प्रियंका गांधी यांचा काँग्रेसच्या सक्रीय राजकारणात औपचारीक प्रवेश झाला. त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. आणि नरेंद्र मोदी आणि भाजपचा गढ असलेल्या पूर्व उत्तर प्रदेशची अर्थात पूर्वांचलची जबाबदारीही देण्यात आली.

Image copyright Getty Images

त्यानंतर दिवसभर माध्यमांमध्ये पुन्हा एकदा प्रियंका आणि इंदिरा यांच्यातील साम्यस्थळांची चर्चा सुरु झाली. त्यांचा पेहराव, त्यांचं दिसणं, लोकांमध्ये मिसळणं, संयत आक्रमकता आणि जाता-जाता कोपरखळ्या हाणण्याची पद्धत यामुळे त्या दुसऱ्या प्रियदर्शिनी आहेत का? त्या इंदिरा गांधींप्रमाणेच करारीपणा दाखवतील का? जे इंदिरा गांधींना साधलं ते प्रियंका गांधींना साधेल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

इंदिरा गांधींशी तुलना योग्य?

अर्थात इंदिरा गांधींचा काळ, त्यावेळचं राजकारण आणि आव्हानं वेगळी होती. त्यामुळेच आताच्या काळात प्रियंका गांधींची तुलना इंदिरा गांधींशी करता येईल का, या प्रश्नावर काँग्रेसचं राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक राशीद किडवाई सांगतात की, "कुठल्याही दोन लोकांचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी दोघांची कामाची, राजकारणाची आणि लोकांमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी होती. तीच गोष्ट इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याबाबत होती. तीच राजीव गांधी आणि सोनिया गांधींबद्दल आहे आणि त्याचप्रमाणे इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रकृती, राजकारण आणि स्टाईल वेगळी असेल.''

Image copyright AFP

पण असं म्हणतानाच राशीद किडवाई म्हणतात की, "इंदिराजी आणि प्रियंका यांच्या पेहरावाची पद्धत एकच आहे. त्यांच्यात बरीच साम्यस्थळंही आहेत. जसं की इंदिरा गांधी लोकांना आपल्या वाटायच्या. त्या लोकांमध्ये सहज मिसळायच्या. त्यांच्या चेहऱ्यात करारीपणा होता, पण लोकांमध्ये जाताना मार्दवही होतं. प्रियंका गांधी काही बाबतीत तशा आहेत. त्या लोकांमध्ये सहज मिसळतात. सहजपणे संवाद साधण्याची त्यांच्यात हातोटी आहे.

"त्या कुणालाही पटकन आपलसं करु शकतात. उत्तर प्रदेश आणि एकूण भारतात जसं इंदिराजींना अपील होतं, तसंच अपील प्रियंका गांधींनाही आहे. उत्तर प्रदेशात तर त्याचा बराच फरक पडेल. कारण इथं अजूनही इंदिरा गांधींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे प्रियंकांचा चेहरा, त्यांची स्टाईल, पेहराव आणि दिसणं या लोकांना पुन्हा एकदा इंदिरा गांधी आपल्यात आल्याची आठवण करुन देईल.''

इंदिरा गांधींसारखं दिसणं काँग्रेसला पुरेल?

अर्थात एवढी एक गोष्ट पूर्व उत्तर प्रदेशचं गणित बदलू शकेल का? भाजप आणि नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी पुरेसं ठरेल का? मायावती आणि बहुजन समाज पक्षाचं सोशल इंजिनीयरिंगला पर्याय ठरेल का? त्यांचं इंदिरा गांधींसारखं दिसणं काँग्रेसला पुरेल का?

या आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणाबद्दलच्या प्रश्नावर प्रकाश टाकताना गांधी परिवाराशी निकटचे संबंध असलेले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सांगतात की, "प्रियंका गांधी जरी इंदिरा गांधींसारख्या दिसत असल्या, त्यांची केशभूषा, वेशभूषा सारखी असली तरी राजकारणात हे फार काळ चालत नाही. त्यामुळे मी तशी तुलना करणार नाही. यापेक्षाही महत्वाचा भाग म्हणजे प्रियंका गांधी मृदु वाटतात. त्या लोकांना आपल्या कुटुंबाचा भाग वाटतात. त्यांच्याशी कुणीही कनेक्ट करु शकतो. शिवाय त्यांनी राजकारणात यावं ही कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची गेल्या अनेक वर्षांची इच्छा होती. पण कौटुंबिक कारणामुळे त्यांनी ते टाळलं. पण आता त्या पक्षात सक्रीय झाल्याने कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा उत्साह वाढला आहे.''

Image copyright Getty Images

पण त्याचवेळी ते उत्तर प्रदेशच्या राजकारणाबद्दल बोलताना ते सांगतात की, "प्रियंका गांधींनी अतिशय अवघड चॅलेंज शिरावर घेतलं आहे. उत्तर प्रदेशात भाजपनं हातपाय पसरले आहेत. मायावती आणि अखिलेश यांनी युती करुन काँग्रेसला दूर ठेवलं आहे. पण प्रियंकांच्या येण्यानं १०० टक्के भाजप चिंताग्रस्त झाली आहे. काँग्रेसची उत्तर प्रदेशातील पारंपरिक व्होटबँक त्यांच्यामुळे पुन्हा काँग्रेसकडे येईल.''

अर्थातच गुजरातमधील पक्षाची कामगिरी, कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलेलं यश आणि राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विजय पाहता आता प्रियंकांना धोनीप्रमाणे फिनिशर म्हणून प्रमोट केलं जाणार का? या प्रश्नावर मात्र पृथ्वीराज यांनी सावध उत्तर दिलंय. ते म्हणाले, "मी याला क्रिकेटसारखी उपमा देणार नाही, पण विजय मिळाला तर पक्षाला आनंदच होणार. पण ज्यावेळी नेता पराभूत होतो, तेव्हा मात्र त्याचं हार्ड क्रिटिसिझम केलं जातं. प्रश्न उपस्थित होतात."

Image copyright Getty Images

प्रियंकांना दिलेली जबाबदारी अत्यंत संवेदनशील आहे. कारण पूर्वांचलचे २४ जिल्हे म्हणजे भाजपचा गढ आहे. वाराणसीतून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून येतात. योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जाणारा गोरखपूर जिल्हा पूर्वांचलमध्ये आहे.

2014ला उत्तर प्रदेशात भाजपनं ८० पैकी ७१ जागा जिंकल्या आहेत. शिवाय २०१९ साठी मायावती आणि अखिलेश यांनी हातमिळवणी केली आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशात एकटी पडल्याचं चित्र आहे.

काँग्रेसचं हुकुमाचं पान?

त्यामुळेच काँग्रेसनं हुकुमाचं पान बाहेर काढलं आहे का? प्रथमदर्शनी इंदिरा गांधीसारखी प्रतिमा असल्याचा फायदा प्रियंका आणि काँग्रेसला होईल का? या प्रश्नाचं अतिशय सखोल उत्तर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अंबरीश मिश्र यांनी दिलंय. ते म्हणतात की "प्रियंका गांधींचं बाह्य रुप बघून म्हणजे केशरचना, वेशभूषा बघून इंदिरा गांधींची आठवण होते. नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इंदिरा गांधी आठवतात. याचा अर्थ काँग्रेस कार्यकर्त्यांना इंदिरा गांधी यांच्यासारखा कणखर चेहरा,नेता हवा आहे. पण त्या इंदिरा गांधीसारख्या आहेत का? हे काळ ठरवेल."

Image copyright Getty Images

प्रियंका यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या राजकीय वाटचालीवर बोलताना अंबरीश मिश्र सोनियांचंही उदाहरण देतात. ते म्हणतात की, "राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर सोनिया ६ ते ७ वर्ष राजकारणापासून दूर राहिल्या. त्या कुणाशीच बोलायच्या नाहीत. प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. याचा अर्थ लोकांनी असा घेतला की त्या फार हुशार, धोरणी आणि गूढ आहेत. पण तसं झालं नाही. नाहीतर काँग्रेसची अवस्था आज अशी झाली नसती. त्याचप्रमाणे प्रियंका हे 'अनटेस्टेड मिसाईल' आहे. त्यांची अग्निपरीक्षा व्हायची आहे. त्यामुळे कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्याआधी आपल्याला त्यांची राजकीय हुशारी, विचारशक्ती, निर्णयशक्ती आणि राजकारण कसं आहे, हे बघावं लागेल."

अर्थात प्रियंका गांधींना राजकारणात उतरवून काँग्रेसनं शेवटचं हुकुमाचं पान काढल्याचं राजकीय जाणकार म्हणतायत. इतकंच नाही तर इंदिरा गांधींशी त्यांच्या तुलनेनं पक्षाला फायदा होईलही पण काँग्रेसमध्ये दोन सत्ताकेंद्रं उभी राहतील, अशी शक्यताही बोलून दाखवतात.

इंदिरा गांधींशी मिळतीजुळती प्रतिमा भाजपसाठी अडचण?

त्यामुळेच इंदिरा गांधींशी त्यांची मिळतीजुळती प्रतिमा भाजपसाठी अडचण ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार राजगोपालन सांगतात की, "त्यांची इंदिरा गांधींशी तुलना चुकीची आहे. You can not compair Apple and Orange. इंदिरा गांधींचा करिश्मा होता, पण तो काळ आता निघून गेला. त्या मोदींना टक्कर देणार आहेत का? मग तसं असेल तर त्यांना वाराणसीतून निवडणूक लढवावी लागेल. खरंतर हे मोदींनी सवर्णांना १० टक्के आरक्षण दिल्याने काँग्रेसने केलेली ही खेळी आहे. कारण उत्तर प्रदेशात ब्राह्मण मतांचा टक्का निर्णायक आहे. तसंच प्रियंकांची एन्ट्री ही मायावती आणि अखिलेश यांच्या विरोधात आहे. कारण त्यांनी काँग्रेसला दूर ठेवलं. हे मायावतींना काँग्रेसनं दिलेलं उत्तर आहे. इंदिरा गांधींना वाजपेयींनी दुर्गा म्हटलं होतं. त्या खूप भक्कम होत्या. इंदिरा गांधींशी त्यांची तुलना अशक्य आहे.''

Image copyright Reuters

पण त्याचवेळी ते काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी याचा फायदा होईल असंही राजगोपालन म्हणतात. मात्र प्रियंकांच्या एन्ट्रीनं प्रादेशिक पक्ष आपली भूमिका बदलणार आहेत का? आंध्र प्रदेशात चंद्राबाबू काँग्रेसला केवळ ५ जागा द्यायला तयार आहेत. ममतांच्या तृणमूलनंही या राजकीय खेळीचं स्वागत केलं नाही. त्या देशभर प्रादेशिक पक्षांना मतं मिळवून देऊ शकतात का? त्यामुळेच त्या फक्त पूर्वांचलपुरत्या मर्यादीत आहेत असं राजगोपालन यांना वाटतं.

पण राजगोपालन यांच्या वक्तव्याच्या अगदी वेगळं मत राशीद किडवाई यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणतात "त्यांच्यात राजकीय हुशारी आहेच. काँग्रेसच्या बॅकरुमला राहून त्या आधीच काम करत होत्या. राजस्थान आणि मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा पेच त्यांनी कौशल्याने हाताळला. त्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. कुणीही दुखावलं जाणार नाही, यासाठी त्यांनी बरीच उर्जा खर्च केली.''

मोदींच्या भाषणकौशल्याचं देशभर कौतुक होतं. त्यांना उत्तर देणं राहुल गांधींना जमलं नाही, अशी टीका होते. अशावेळी प्रियंका कामाला येतील असं किडवाईंना वाटतं. यासाठी ते २०१४ च्या निवडणुकीचं उदाहरण देतात.

Image copyright Reuters

"गेल्या निवडणुकीत मोदींनी 'काँग्रेस अब बुढी हो गई है' अशी कोपरखळी हाणली, त्याला प्रियंकांनी तातडीनं सभेतून उत्तर देत म्हटलं की 'क्या मै आप को बुढी दिखती हूँ' त्यामुळे या निवडणुकीत असा सवाल-जबाबाचा कार्यक्रम नक्की रंगणार आहे. जो इंदिरा गांधींच्या काळातही बघायला मिळायचा."

इंदिरा गांधींशी प्रियंकांची तुलना सुरु झाल्यावर त्यांच्या अनुभवाबद्दलही राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेत. त्याचं उत्तर अंबरीश मिश्र यांनी दिलं आहे. ते म्हणतात की, "इंदिरा गांधींही जेव्हा पदावर आल्या, तेव्हा त्या नव्या होत्या. सुरुवातीला त्या असहज वाटत. बोलत नसत. पण सत्तरीच्या दशकात त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. त्यांची लोकप्रियता अचाट होती. त्यांचं गारुड होतं. जादू होती. त्या तुलनेत मोदींची लोकप्रियता काहीच नाही. इंदिरा गांधींसमोर राममनोहर लोहियांसारखे नेते होते. पण त्यांनी यशस्वी राजकारण करुन दाखवलं. आत्ता काँग्रेससमोर करो या मरोची लढाई आहे. आणि अजूनही लोकांच्या मनात इंदिरा गांधींची प्रतिमा कायम आहे. त्यामुळे काँग्रेसने इंदिरा गांधींची छबी पुन्हा जागी होईल असा विचार प्रियंकांना २०१९ च्या रणसंग्रामात उतरवताना केला असणार असं वाटतं''

अर्थात प्रियंका गांधी इंदिरा होऊ शकतात का? त्यांच्यात ते नेतृत्वगुण आहेत का? मोदींसमोर काँग्रेस गलितगात्र झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं, तीच काँग्रेस इंदिरांसारख्या दिसणाऱ्या प्रियंका तगड्या अवस्थेत नेतील का? याचा निकाल केवळ १०० दिवसात लागेल. कारण देश आता निवडणुकीच्या उंबरठ्यावरच उभा आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)