प्रियंका रॉबर्ट वाड्रा : राहुल गांधींच्या कारकिर्दीला संजीवनी मिळवून देणार?

प्रियंका गांधी यांचा राजकारणातला प्रवेश ही काँग्रेसची चतुर खेळी आहे.
2009 मध्ये पत्रकार बरखा दत्त यांनी प्रियंका गांधी यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी प्रियंका म्हणाल्या होत्या, खरं सांगायचं तर मी का नाही याचं कारण माझ्याकडे नाही. पण राजकारणात असू नये हे माझं ठाम मत आहे. माझं जे आयुष्य आहे त्यामध्ये मी आनंदी आहे. राजकारणाचे अनेक पैलू आहेत. त्या मुद्यांकरता मी योग्य व्यक्ती नाही असं मला वाटतं.
प्रियंका आपल्या बोलण्यावर ठाम राहतील याविषयी काँग्रेस नेत्यांना खात्री नव्हती. बुधवारी काँग्रेसने प्रियंका यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. त्यावेळी समस्त काँग्रेसजन मनातल्या मनात हसले असतील.
प्रियंका गांधी यांची राजकारणातली एंट्री केवळ उत्तर प्रदेशपुरती मर्यादित नाही याची जाणीव युपीसीसी ऑफिस, नेहरू भवन, मॉल अव्हेन्यू, लखनऊ 24 तसंच 24 अकबर रोड आणि नवी दिल्लीतल्या काँग्रेसकर्मींना आहे.
- प्रियंका गांधींना 'भय्याजी' का म्हणतात?
- प्रियंका गांधी दुसऱ्या इंदिरा गांधी होऊ शकतात का?
- प्रियंका गांधींना रॉबर्ट वाड्रा म्हणतात... मैं तुम्हारे साथ हूँ
लोकसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना, प्रियंका यांच्या नियुक्तीची खेळी भाजप-एनडीए सत्ताधारी पक्षांना दणका देणारी आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, तिसऱ्या आघाडीच्या हालचालींनी वेग धरला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपला चीतपट करण्याची मोहीम आखणाऱ्या तिसऱ्या आघाडीसाठी प्रियंका यांची नियुक्ती मानसिकदृष्ट्या बळ देणारी आहे.
उत्तर प्रदेशात मनोधैर्य खचलेल्या आणि थंडगार पडलेल्या काँग्रेसमध्ये जीव ओतण्याची मुख्य जबाबदारी प्रियंका यांच्यावर आहे. मे 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली झाली तर नरेंद्र मोदीप्रणित सरकारच्या पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता दुरावू शकते.
नेहरू-गांधी कुटुंबीयांनी एकत्र येऊन राजकीय मोहिमा फत्ते करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. प्रियंका यांचा सक्रिय राजकारणातला प्रवेश ही गांधी-नेहरू कुटुंबीयांनी उच्च पद भूषवण्याची पहिलीच वेळ नाही.
1959 मध्ये जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना इंदिरा गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्या होत्या. इंदिरा गांधी यांना राजकारणात पुढे आणण्यासाठी नेहरूंनी ही चाल रचली असा आरोप त्यांच्या विरोधकांनी केला.
मात्र इंदिराजींनी स्वत:च्या कर्तृत्वावर हे पद मिळवल्याचं अनेक काँग्रेसजनांना वाटत होतं. त्यांना असं वाटण्याची काही ठोस कारणं होती.
अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा म्हणून इंदिरा यांनी केरळमधील संकट हाताळलं. इंदिरा यांनीच भाषिक विद्वेष पसरत असताना महाराष्ट्र आणि गुजरातच्या निर्मितीची सूचना केली होती.
1960 मध्ये काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने त्यांना पुन्हा हे पद स्वीकारण्याची विनंती आणि आग्रह केला. मात्र इंदिरा आपल्या मतावर ठाम राहिल्या.
संजय गांधी यांनी 1974 ते 1980 या कालावधीत काँग्रेसमधलं कोणतंही औपचारिक पद भूषवलं नाही. (अपवाद- अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे ते सरचिटणीस होते. मात्र संघटनात्मक आणि प्रशासकीय पातळीवर संजय आणि इंदिरा समान पातळीवर असल्याचं अनेकांचं मत होतं)
जून 1980 मध्ये अपघातात संजय यांचा मृत्यू झाला. याआधी काही आठवडे संजय यांचे उप रामचंद्र रथ यांना संजय पक्षाध्यक्ष होतील असं वाटत होतं.
रथ यांच्या मते जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी अगदी लहान वयातच काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं. पक्षाने एखाद्या व्यक्तीची अध्यक्षपदी निवड केली तर ही लोकशाही प्रक्रिया आहे. व्यक्तीचं वय किंवा अनुभव हा मुद्दा नाही.
1983 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, संजय यांचे भाऊ राजीव काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी झाले. 24, अकबर रोडवरील कार्यालयात इंदिरा यांच्याबरोबरीने त्यांना एक कचेरी देण्यात आली. राजीव यांचं बोलणं इंदिरा यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांसाठी प्रमाण असे. त्यावेळी अनेक मंत्री त्यांच्या कचेरीच्या बाहेर उभे असल्याचं दिसत.
2006-2014 कालावधीत सोनिया आणि राहुल यांच्यातील कार्यपद्धतीत स्पष्ट सीमारेखा होत्या. टीम राहुलचे सदस्य (अजय माकन, आरपीएन सिंग, मिलिंद देवरा, सचिन पायलट) सोडले तर इतर कुठले मंत्री त्यांच्याकडे जास्त मागेपुढे करत नव्हते.
प्रियंका यांच्यासाठी भविष्यात काय भूमिका असेल?
2004-14 या दहा वर्षांच्या कालावधीत युपीए सत्ताधारी असताना राहुल यांचं राजकारणातलं वजन वाढलं नाही. होतकरू राजकारणी अशी प्रतिमा निर्माण होण्याऐवजी गोंधळलेला, गांभीर्य नसलेला आणि राजकारणात स्वारस्य नसलेला व्यक्ती अशी प्रतिमा तयार झाली.
स्वत:बद्दल विश्वासार्हता निर्माण करणं, 24 तास 7 दिवस राजकारणात असलेला, पक्षातील अन्य सदस्यांकडून सन्मान मिळवणं हे राहुल यांच्यापुढचं आव्हान आहे. भाजपला चीतपट करण्यासाठी ते सक्षम आहेत हे त्यांना सिद्ध करायचं आहे.
11 डिसेंबर 2008 रोजी राहुल यांना तशी संधी मिळाली. काँग्रेसने छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये भाजपला पिछाडीवर टाकत बाजी मारली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 72 वर्षांमध्ये 59 वर्षं काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. काँग्रेस पक्षातील सगळ्या पातळ्यांवरचे नेते गांधी कुटुंबीयांचा शब्द अंतिम मानतात.
कोणत्याही निर्णयासाठी गांधी कुटुंबीय हाच आधार असतो. या निष्ठेच्या मोबदल्यात सत्ता मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.
जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी, राजीव आणि सोनिया या गांधी घराण्यातील कुणीही राजकारणाशी नाळ तोडलेली नाही किंवा राजकारणातून सर्वस्वी बाजूला झालेले नाहीत.
म्हणूनच काँग्रेसचे नेते गांधी घराण्यातील व्यक्तींना मनोभावे मानतात. त्यांच्यासाठी पक्षनिष्ठेचा अर्थ गांधीघराण्याशी असलेली जवळीक एवढाच असतो. राहुल आणि आता प्रियंका यांना काँग्रेसजनांच्या मनातील तारणहार प्रतिमा सार्थ ठरवावी लागेल.
प्रियंका सातत्याने म्हणत असतात, भावाला मदत करण्यासाठी मी काहीही करू शकते. त्याच्यासाठी मला एवढं करावंच लागेल.
राहुल यांना राजकारणात यशस्वी करणं हे त्यांच्या राजकीय अस्तित्वामागची प्रेरणा आहे. राजकारणात औपचारिक प्रवेशासह काँग्रेसच्या कोअर कार्यकारिणीत त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. बरखा दत्त यांच्याशी दहा वर्षांपूर्वी बोलताना आपण काय बोललो हे त्या आता विसरल्या असतील.
हे वाचलंत का?
- रॉबर्ट वाड्रांवरील अटकेची तलवार प्रियंका गांधींसाठी अडचणीची ठरणार?
- प्रियंका गांधींना 'भय्याजी' का म्हणतात?
- प्रियंका गांधींना रॉबर्ट वाड्रा म्हणतात... मैं तुम्हारे साथ हूँ
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)