गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबाबत पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, पण...

पंकजा मुंडे Image copyright Getty Images

ईव्हीएम हँकिंगबद्दल माहिती असल्यामुळेच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंची हत्या झाल्याचा आरोप सय्यद शुजा या हॅकरनं केला होता. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

मात्र गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नव्हते. बुधवारी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूवरून सुरु झालेल्या उलटसुलट चर्चांवर मौन सोडले. 'दिव्य मराठी'नं दिलेल्या वृत्तानुसार या सगळ्या प्रकारामुळे मुंडे कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावं लागत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. 'गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मी स्वतः गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ती चौकशी पूर्ण झाली आहे. देशातील ज्येष्ठ लोक याची दखल घेतील,' असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्याचं दिव्य मराठीच्या वृत्तात म्हटलं आहे.

मुंडेचा मृत्यू अपघाती नव्हताच - धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मात्र बीबीसी मराठीशी बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती.

"अचानक ज्या पद्धतीनं गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाल्याचं दाखवण्यात आलं, ते संशयास्पद होतं. गाडीची गाडीला जशाप्रकारे धडक बसली होती, ते पाहता त्यांचा मृत्यू होईल हे पटत नाही. मी स्वतःही गोपीनाथ मुंडेंची गाडी पाहिली होती. म्हणूनच त्यांच्या अपघाताबद्दल प्रश्नचिन्ह तेव्हाही निर्माण झालं होतं," असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची 'रॉ' मार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही धनंजय मुंडेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती.

पंकजा मुंडेंनी सीबीआय चौकशीबद्दल उल्लेख केला असला, तरी गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूशी संबंधित अनेक प्रश्नांबद्दल त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं. "मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी केवळ त्यांची एक कन्या आहे," असं भावनिक वक्तव्य पंकजा यांनी केलं. मात्र गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात होता की घातपात याबद्दल पंकजा मुंडेंना नेमकं काय वाटतं, हे त्यांच्या वक्तव्यावरून नक्की नाही कळलं.

पंकजा मुंडेंच्या वक्तव्यातला नेमकेपणातला अभाव आणि धनंजय मुंडेंचा दावा यांमुळे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबद्दलच्या चर्चांना इतक्यात पूर्णविराम मिळणार नाही, हे मात्र स्पष्ट झालं.

काय होते सय्यद शुजाचे आरोप?

Image copyright Getty Images

लंडनमध्ये एका कथित हॅकरने 2014च्या लोकसभा आणि 2015च्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (EVM) हॅक केले होते आणि त्यातूनच गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा खळबळजनक आरोप सय्यद शुजा यानं केला. हे आरोप करताना शुजा यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

पण कुणा पत्रकाराला यात अधिक खोलवर तपास करायचा असेल तर सर्व ती कागदपत्रं आणि पुरावे देऊ असं ते म्हणाले. ईव्हीएम हँकिंगसंदर्भातही शुजा यांनी अनेक आरोप केले होते.

कसा झाला मुंडेंचा अपघात?

गोपीनाथ मुंडे यांनी 26 मे 2014 ला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधीनंतर 3 जून 2014 ला सकाळी मुंडे आपल्या 21 लोधी इस्टेट या सरकारी निवासस्थानावरून विमानतळाकडे जायला निघाले होते.

मुंडे सरकारी गाडीतून जात होते आणि त्यांच्या सोबत ड्रायव्हर आणि त्यांचा पीए होते. सकाळी साधारण 6 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड-तुघलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहोचली. इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली.

गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला.

त्यानंतर लगेचच मुंडेंना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ड्रायव्हरनं त्यांना तातडीनं 'एम्स'च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहचल्यावर त्यांचं ह्रदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केलं.

Image copyright Getty Images

मात्र ही सगळी परिस्थिती संशयास्पद होती. या अपघातात मुंडे यांचा पीए तसंच ड्रायव्हरला कोणतीही इजा झाली नाही. मुंडेंच्या शरीरावरही जखमांच्या कोणत्याही खुणा नव्हत्या. त्यांचा मृत्यू हा अंतर्गत रक्तस्त्रावानं झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.

दुसरं म्हणजे अपघात झाला ती वेळ सकाळची होती. यावेळी वाहतूकही फारशी नव्हती. त्यामुळे केवळ इंडिकाच्या धडकेनं मुंडेंचा मृत्यू झाला यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडेंनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता.

मुंडे केंद्रीय मंत्री झाले होते. मग अशावेळी कोणतीही सुरक्षाव्यवस्था न घेता ते बाहेर का प़डले, असंही विचारलं जात होतं.

या सर्व शंकांमुळे मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही पुढे आली. मात्र चौकशीतून काहीही निष्पन्न झालं नाही. मुंडेंचा मृत्यू अपघाती असल्याचंच म्हटलं गेलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)