'मणिकर्णिका'वर राणी लक्ष्मीबाईंच्या वंशजांना का आहे आक्षेप? - बीबीसी मराठी राउंडअप

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा मनकर्णिका चित्रपटात राणी लक्ष्माबाई यांच्या जन्मतारखेवरून न्यायालयीन लढाई सुरू झाली आहे.

'मणिकर्णिका'वर लक्ष्मीबाईंच्या वंशजांना आक्षेप

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित 'मणिकर्णिका' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. पण त्यापूर्वीच लक्ष्माबाईंच्या पाचव्या पिढीचे वंशज असलेले विवेक तांबे यांनी काही आक्षेप नोंदवत निर्मात्यांना कोर्टात खेचलं आहे. 'मणिकर्णिका'मध्ये कंगना रणावत मुख्य भूमिकेत आहे.

काय आहेत तांबेंचे आक्षेप, हे आम्ही त्यांच्याकडूनच जाणून घेतले. वाचा सविस्तर वृत्त इथे.

प्रियंका गांधी दुसऱ्या इंदिरा गांधी?

प्रियंका गांधी यांनी सक्रीय राजकारणात बुधवारी औपचारिक प्रवेश केला. त्यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली, आणि नरेंद्र मोदी आणि भाजपचा गढ असलेल्या पूर्व उत्तर प्रदेशची अर्थात पूर्वांचलची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा प्रियंका गांधी वाड्रा यांची अनेकदा इंदिरा गांधी यांच्याशी तुलना केली जाते

त्यानंतर दिवसभर माध्यमांमध्ये पुन्हा एकदा प्रियंका आणि इंदिरा यांच्यातील साम्यस्थळांची चर्चा सुरु झाली. त्यांचा पेहराव, त्यांचं दिसणं, लोकांमध्ये मिसळणं, संयत आक्रमकता आणि जाता-जाता कोपरखळ्या हाणण्याची पद्धत यामुळे त्या दुसऱ्या प्रियदर्शिनी आहेत का? त्या इंदिरा गांधींप्रमाणेच करारीपणा दाखवतील का? जे इंदिरा गांधींना साधलं ते प्रियंका गांधींना साधेल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.

विश्लेषक काय म्हणतात? वाचा इथे

शबरीमलात प्रवेश केला म्हणून घरच्यांनी बाहेर काढले

शेकडो वर्षांची परंपरा मोडित काढत शबरीमला मंदिरात प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गा यांच्यासाठी स्वतःच्या घराचे दरवाजे मात्र बंद झाले आहेत. कनकदुर्गा यांना त्यांच्या पतीने घराबाहेर काढले असून आता आपल्या हक्कांसाठी न्यायालयीन लढाई हाच त्यांच्यासमोरचा एकमेव पर्याय आहे.

Image copyright Getty Images

मॅजिस्ट्रेट तीन दिवसांच्या सुटीवर असल्यामुळे कनकदुर्गा यांचं प्रकरण न्यायालयासमोर येऊ शकलं नाही. त्यामुळे सध्यातरी त्यांना वन-स्टॉप शेल्टर होम या या महिलांसाठीच्या सरकारी आश्रयस्थळी रहावं लागत आहे. वाचा बीबीसी प्रतिनिधी इमरान कुरेशी यांचा रिपोर्ट

हार्दिक पांड्या, KL राहुल पुन्हा खेळणार

कॉफी विथ करण कार्यक्रमात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी बंदीची कारवाई करण्यात आलेले हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल या दोघांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयातर्फे नेमण्यात आलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने अर्थात CoAने निलंबन तात्काळ प्रभावाने हटवलं आहे. मात्र त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार अद्यापही बाकी आहे.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा 'कॉफी विथ करण'मध्ये हार्दिक पंड्या आणि KL राहुल

त्यामुळे आता हार्दिक न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबरोबर खेळेत तर राहुलला इंडिया A संघाबरोबर इंग्लंड लॉयन्स संघाविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळायला मिळू शकतात. वाचा सविस्तर बातमी इथे

व्हेनेझुएलात दोन राष्ट्राध्यक्ष

व्हेनेझुएलामध्ये गेले अनेक महिने आर्थिक अस्थैर्य आणि राजकीय उलथापालथ सुरू आहे. अशातच विरोधी पक्षनेते खुआन ग्वाइडो यांनी माडुरो सरकारला आव्हान देत सरळ हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

अमेरिका, कॅनडासह सात लॅटिन अमेरिकन देशांनी त्यांना मान्यता दिली आहे. पण माडुरो यांनी अमेरिकेला खडे बोल सुनावत त्यांच्या डिप्लोमॅट्सना शुक्रवारपर्यंत देश सोडून जाण्याचा इशारा दिला आहे.

सरकारच्या सर्वोच्च पातळीवर सुरू असलेल्या या नाट्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या देशात आणखी अस्थिरता निर्माण झाली आहे. पाहा हा व्हीडिओ रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)