व्हीडिओकॉनचे वेणूगोपाल धूत, चंदा कोचर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल #5मोठ्याबातम्या

चंदा कोचर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा चंदा कोचर

आज वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या विविध बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूयात.

1) वेणूगोपाल धूत, चंदा कोचर यांच्यावर गुन्हा दाखल

पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती, त्यांच्या सहकारी व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनीट आणि कोचर यांच्या न्यूपॉवर रेनेवेबल्स तसेच सुप्रीम ऊनर्जी या कंपन्यांचाही यामध्ये समावेश आहे.

गुरुवारी सकाळी CBIने मुंबईतील दोन तर औरंगाबादच्या एका कार्यालयावर छापे टाकल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

2009मध्ये चंदा कोचर यांनी ICICI बँकेचा व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसंच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला 300 कोटींचे कर्ज दिलं होतं. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात 64 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. त्यानंतर 2009 ते 2011 या काळात चंदा कोचर यांनी वेगवेगळी कारणं दाखवत 1,575 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.

कर्ज घेताच व्हिडीओकॉन उद्योग समूहाने 30 जून 2017ला कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केलं, असं या बातमीत म्हटलं आहे.

2. केंद्रात युतीचं सरकार आलं तर अर्थव्यवस्था मंदावेल - रघुराम राजन

येत्या लोकसभा निवडणुकीनंतर युतीचं सरकार आलं तर अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल, असं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलं आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

स्वित्झरलँडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनमिक फोरमच्या (WEF) संमेलनादरम्यान एका मुलाखतीत ते बोलत होते.

काँग्रेसचं सरकार आलं तर अर्थमंत्रिपद दिलं जाईल अशा चर्चेवर ते म्हणाले, "मी काही राजकारणी नाहीये. या सगळ्या अफवा आहेत."

GST हे सरकारचं योग्य पाऊल होतं तर नोटाबंदी हे अर्थव्यवस्थेला दिलेला झटका होता, असं मत राजन यांनी व्यक्त केलं.

सध्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर देशात अनेक विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आले आहेत. नुकतंच पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात एक होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध आघाडी, असं चित्र तयार होताना दिसत आहे.

3) कट्टरवाद सोडून लष्करी सेवेत मरण पावलेल्या जवानाला 'अशोकचक्र'

काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 6 कट्टरवाद्यांना ठार करणाऱ्या लान्सनायक नजीर वाणी या जवानाच्या नावाची घोषणा 'अशोकचक्र'साठी करण्यात आली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

लष्कराच्या सेवेत येण्यापूर्वी नजीर वाणी यांचा कट्टरवादी कारवायांमध्ये सहभाग होता. मात्र लष्करात आल्यानंतर त्यांनी देशसेवा केली. त्यांच्या या कार्याचा गौरव 'अशोक चक्र' देऊन केला जाणार आहे.

Image copyright Getty Images

लान्सनायक नजीर वाणी लष्करातील 34 राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते. मागील वर्षी शोपियाँ जिल्ह्यात लष्कराने केलेल्या कारवाईत त्यांनी 6 कट्टरवाद्यांना ठार केले होते.

कट्टरवाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या कारवाईची दखल घेत त्यांना यापूर्वी दोनदा लष्कराकडून सन्मान करण्यात आलं असून, लष्कराचे पदकही मिळाले आहे.

नजीर यांचे कुटुंब काश्मीर खोऱ्याच्या कुलगाम जिल्ह्यातील चेकी अश्मुजी गावात राहत आहे. त्यांच्यामागे त्यांची पत्नी आणि दोन मुले आहेत.

4) पुन्हा मतपत्रिका नाहीच : मुख्य निवडणूक आयुक्त

हँकिंगसंदर्भातील चर्चेमुळे आम्ही मुळीच घाबरणार नसून, आता देशात मतपत्रिकेचा काळ पुन्हा आणणार नाही, अशा शब्दात मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी EVM हँकिंगचा वाद बाजूला सारत, मतपत्रिकेच्या वापराची शक्यता फेटाळून लावली.

"भारतात आता पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जाणार नाही. यापुढेही आम्ही EVM आणि VVPATचा वापर सुरूच ठेवू," असं अरोरा यांनी दिल्लीतील कार्यक्रमात जाहीर केले आहे.

याबाबत राजकीय पक्ष किंवा इतर कुणीही केलेल्या तक्रारींचे, तसेच सूचनांचे आम्ही स्वागत करू, असंही अरोरा पुढे म्हणाल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

Image copyright Getty Images

भारतात वापरात असेलेल्या EVM हॅक केल्या जाऊ शकतात, असा दावा लंडनमधील एका कथित सायबर तज्ज्ञाने दावा केला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीत EVM हॅक झाल्याचा दावाही कथित सायबर तज्ज्ञ सय्यद सुजा याने केला होता.

यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे पत्राद्वारे केली होती. संसद मार्ग पोलीस ठाण्यात तशी तक्रारही दाखल करण्यात आली.

त्यानंतर यापुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घेण्यात याव्यात, या विरोधी पक्षांच्या मागणीने पुन्हा जोर धरला होता.

5) विदर्भात गारपिटीचा इशारा

पावसाला पोषक हवामान होत असल्याने रविवारपर्यंत (27जानेवारी) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

किमान तापमानात घट होऊन थंडी पुन्हा वाढणार आहे, अशी बातमी अॅग्रोवननं दिली आहे.

पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्लीसह परिसरात पाऊस पडला असून, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. वायव्य राजस्थानपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पश्‍चिमी चक्रवात आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये परस्पर विरोधी क्रिया होणार आहे.

तर उत्तर भारतात असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये येत्या दोन दिवसात पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे, असंही या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)