मुंबई लोकसभा निवडणूक : मतदान, मतमोजणीच्या सर्व तारखा इथे पाहा

मतदान

निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. देशात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यांतल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी मुंबईसह महाराष्ट्रातल्या 17 मतदारसंघात मतदान होणार आहे.

23 मे रोजी मतमोजणी होईल.

2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं.

लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला केली.

देशभरातल्या सगळ्या मतदान केंद्रांवर VVPAT यंत्र बसवण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी केली.

महाराष्ट्रातल्या मतदानाचे टप्पे

मतदान किती टप्प्यात होणार?

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी निवडणुकांची घोषणा केली. केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार परिषद झाली. पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, 3ऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, 4थ्या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघ, 5व्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, 6व्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि 7 व्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान होईल.

आंध्र, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदीगडमध्ये एकाच टप्प्प्यांत मतदान होणार

फोटो स्रोत, Election commission

या लोकसभेचा कार्यकाल 3 जूनला संपणार आहे. 17 व्या लोकसभेसाठी गेली काही दिवस मोठी तयारी सुरू आहे, असं त्यांनी सांगितली. विविध राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं. रेल्वे, गृहसचिव, विविध राज्यांना भेटी दिल्या आहेत, त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्तांनी माहिती दिली. निवडणुकांच्या तारखा निश्चित करताना मुलांच्या परीक्षा, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी, हवामान असे मुद्दे विचारात घेतले आहेत, असं ते म्हणाले.

लोकसभेत एकूण किती जागा आहेत?

आपल्या राज्यघटनेनुसार लोकसभेच्या कमाल जागांची संख्या 552 इतकी असते. सध्या लोकसभेच्या जागांची संख्या 545 आहे. त्यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या जागांची संख्या 543 इतकी असते.

या व्यतिरिक्त दोन अॅंग्लो इंडियन उमेदवारांना राष्ट्रपती नियुक्त करू शकतात. जर अॅंग्लो इंडियन समुदायाचं पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तरच त्यांची निवड केली जाते.

सर्व जागांपैकी एकूण 131 सीट रिझर्व्ह म्हणजेच आरक्षित असतात. 84 जागा अनुसूचित जातींसाठी तर 47 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असतात.

फोटो स्रोत, Reuters

कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 272 जागा आवश्यक असतात. जर बहुमतासाठी काही जागा कमी पडत असतील तर मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करता येऊ शकतं. राजकीय पक्ष निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकांनंतर एकत्र येऊ शकतात.

लोकसभेत विरोधी पक्षनेता या पदासाठी लोकसभेच्या एकूण जागेच्या किमान 10 टक्के जागा असणं आवश्यक आहे. म्हणजे किमान 55 जागा असतील तरच विरोधी पक्षाचा नेता बनता येतं. 2014च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या होत्या. सर्व विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या होत्या.

भाजपला 2014मध्ये 282 जागा मिळाल्या होत्या. पण सध्या भाजपकडे 268 सदस्य आहेत. काही जागा भाजपनं पोटनिवडणुकांमध्ये गमावल्या.

तसंच पक्षाच्या काही सदस्यांनी उदा. बी.एस येडियुरप्पा आणि बी. श्रीरामुल्लू यांनी विधानसभा निवडणुका लढण्यासाठी राजीनामा दिला होता. असं असलं तरी मित्रपक्षांमुळे भाजपचं केंद्रातलं सरकार स्थिर आहे.

भारतीय निवडणूक प्रक्रिया कोणत्या मॉडेलवर आधारित आहे?

भारतीय निवडणूक प्रक्रिया ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर मॉडेलवर आधारित आहे. तिथं एकाच दिवसात मतदान होतं.

संध्याकाळी एक्झिट पोल येतात आणि रात्री मतमोजणी होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणुकांचे निकाल येतात.

भारतात असं होत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात मतदान काही टप्प्यांमध्ये होतं. प्रत्येक टप्प्यात झालेलं मतदान इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये सुरक्षित असतं आणि मतमोजणीच्या दिवशी सर्व EVM मतांची मोजणी होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार शेवटच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल प्रसारित करता येऊ शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)