डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण: लातूरच्या डॉक्टरचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान

डॉ. अशोक कुकडे Image copyright VIVEKANAND HOSPITAL
प्रतिमा मथळा डॉ. अशोक कुकडे

लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे संस्थापक डॉ. अशोक कुकडे यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

मूळचे पुण्याचे असलेले डॉ. कुकडे यांनी 50 वर्षांहून अधिक काळ लातूरमधील विवेकानंद रुग्णालयाच्या रूपाने समाजसेवा क्षेत्रासाठी दिला आहे.

डॉ. कुकडे आणि डॉ. बाबा अलूरकर यांनी 4 जानेवारी 1966 रोजी हे रुग्णालय स्थापन केलं. किल्लारीमध्ये झालेल्या भूकंपात जखमी झालेल्या रुग्णांवर या रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले होते.

त्याचप्रमाणे गुजरात भूकंपावेळेसही रुग्णालयाच्या टीमने गुजरातमध्ये 15 दिवस मदतकार्य केलं होतं. त्यांच्या प्रेरणेतून औरंगाबादमध्ये डॉ. हेडगेवार आणि नाशिकमध्ये गुरुजी ही रुग्णालयं स्थापन झाली.

श्रेयस आणि प्रेयस दोन्ही मिळालं

पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. अशोक कुकडे यांनी हा सर्व लातूरकरांचा सामूहिक सन्मान असल्याचं मत व्यक्त केलं.

ते म्हणाले, "पुणे सोडून या शहरात स्थायिक झाल्यावर मी पक्का लातूरकर झालो. लातूर शहरात मला काम केल्यानंतर समाधान, श्रेयस आणि प्रेयस दोन्ही मिळालं.

"शिक्षण क्षेत्र, वैद्यक क्षेत्र आणि आर्थिक क्षेत्रात काम करण्याची संधी या शहरात मिळाली. किल्लारीच्या भूकंपानंतर आमचं कार्यक्षेत्र विस्तारलं. आता लातूर जिल्ह्यात कोठेही मदतीची गरज असल्यास आम्ही सेवेसाठी तयार असतो."

डॉ. अलूरकरांची आठवण प्रकर्षानं येते

विवेकानंद रुग्णालयाच्या कार्याबद्दल बोलताना डॉ. कुकडे म्हणाले, "विवेकानंद रुग्णालयाने नेहमीच पारदर्शी व्यवहार ठेवल्याने पक्ष, जाती-धर्म विसरून लोक जवळ आले. अन्य विचारधारेतही चांगल्या विचारांचे लोक असतात, असा विचार केल्यामुळे आम्हाला सर्वांचा पाठिंबा मिळाला. रुग्णालयाची संकल्पना आणि निर्मितीमध्ये डॉ. अलूरकरांचा सहभाग अत्यंत मोठा होता. आज जरी रुग्णालयरूपी संस्थेचा विस्तार झाला असला तरी सर्व पायाभरणी अलूरकरांमुळेच झाली होती. आज त्यांची मला अत्यंत आठवण येते."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)