नानाजी देशमुख आता भारतरत्न: चित्रकूट प्रकल्पाचे निर्माते कोण होते?

नानाजी देशमुख Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नानाजी देशमुख

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलं आहे.

नानाजी देशमुख यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1916 या दिवशी परभणी जिल्ह्यातील कडोली या गावात झाला. त्यांचे शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झाले. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक झाल्यानंतर नानाजी देशमुख यांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे प्रचारक म्हणून पाठविण्यात आले.

भारतीय जनसंघात सक्रिय झाल्यानंतर उत्तर प्रदेशात चौधरी चरणसिंग यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्यामध्ये नानाजींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता.

आणीबाणी संपल्यावर नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवून ते लोकसभेत गेले होते. (आज हा मतदारसंघ श्रावस्ती नावाने ओळखला जातो.)

देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात समाजकार्य केल्यानंतर शेवटी उत्तर प्रदेशातल्याच चित्रकूट येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना केली. भारतातले पहिले ग्रामीण विद्यापीठ म्हणून ते ओळखले गेले. याचा फायदा मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना होतो.

चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. मध्य प्रदेशातील विविध भागातील शेतकऱ्यांना येथून मार्गदर्शन होते.

Image copyright Getty Images

1999 ते 2005 या कालावधीमध्ये ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना 1999 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

27 फेब्रुवारी 2010 रोजी त्यांचे निधन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नानाजी देशमुख यांच्यावर ट्वीट केले आहे. नानाजी यांचं ग्रामीण विकासासाठी योगदान होतं, खेडी ताकदवान होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पण नानाजी देशमुखांना प्रणब मुखर्जींसोबत भारतरत्न दिल्याबद्दल काँग्रेसने टीका केली आहे. या दोघांची तुलना होऊ शकत नाही, असं वक्तव्य रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केलंय.

नानाजी देशमुख हे संघाचे नेते होते, हजारिका भाजपचे उमेदवार होते आणि प्रणव मुखर्जी हे संघाच्या कार्यक्रमात गेले होते. त्यामुळे संघाच्या शाखेत गेल्यावर भारतरत्न मिळतं, अशी टीका आम आदमी पार्टीने केली आहे.

Image copyright Twitter

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)