प्रणब मुखर्जींना भारतरत्न हा काँग्रेससाठी गौरवाचा क्षण - राहुल गांधी

प्रणब मुखर्जी Image copyright Getty Images

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार जाहीर होताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून प्रणब मुखर्जी यांच अभिनंदन केलं आहे. तसंच हा काँग्रेसचा गौरव असल्याचं म्हटलं आहे.

तर प्रणब मुखर्जी यांनी या पुरस्कारासाठी भारतीय जनतेचे आभार मानले आहेत.

"भारतीय लोकांप्रती आभार मानत मी हा भारतरत्न पुरस्कार स्वीकारत आहे. मी लोकांना जितकं दिलं त्याहून अधिक मला या देशातल्या लोकांनी दिलं आहे, असं मी नेहमीच म्हणत आलोय," असं मुखर्जी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

Image copyright Twitter

प्रणब मुखर्जी यांनी देशाची अविरतपणे आणि निस्वार्थी हेतूनं सेवा केली आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानं मला आनंद झाला आहे, असं मोदींनी ट्वीट केलं आहे.

'पश्चिम बंगालसाठीची खेळी'

"प्रणब मुखर्जींना भारतरत्न म्हणजे पश्चिम बंगालसाठीची खेळी आहे. भारतरत्न पुरस्कारांची प्रतिष्ठा इतकी कमी करण्यात आली आहे," असं पत्रकार शिवम वीज यांनी म्हटलं आहे.

Image copyright Twitter

जून 2018मध्ये प्रणब मुखर्जी यांनी संघाच्या वार्षिक कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं आणि यामुळे वादाला तोंड फुटलं होतं.

Image copyright TWITTER

इतकं की त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं की, "प्रणब मुखर्जी यांचं भाषण विसरलं जाईल आणि त्यातील फोटो तेवढे वापरले जातील."

आरएसएस आपली स्वीकार्हता वाढवण्यासाठी प्रणब मुखर्जी यांचा वापर करत आहे, असं अनेक काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं.

पंतप्रधानपदाचं अपूरं स्वप्न

1984मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर मुखर्जी पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होते. पण काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना बाजूला करत राजीव गांधी यांना पंतप्रधानपदी बसवलं.

खरंतर इंदिरा गांधी यांची हत्या झाली तेव्हा प्रणब मुखर्जी आणि राजीव गांधी बंगालच्या दौऱ्यावर होते.

"कॅबिनेटमधील वरिष्ठ सदस्य असल्यामुळे काळजीवाहू पंतप्रधानपद मिळेल, असं मुखर्जी यांना वाटत होतं," असं पत्रकार राशीद किदवई सांगतात.

राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात मुखर्जी यांना स्थान दिलं नाही. यानंतर त्यांनी नवीन पक्ष काढला होता. पण हा पक्ष अपयशी ठरला, किदवई सांगतात.

"काँग्रेसमध्ये परतल्यानंतर मुखर्जी यांना त्यांच्या नवीन पक्षाबाबत विचारलं जायचं तेव्हा ते म्हणायचे की, मला तर आता माझ्या नव्या पक्षाचं नावंही आठवत नाही," किदवई सांगतात.

Image copyright PRAKASH SINGH/AFP/GETTY IMAGES

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यावेळेस मुखर्जी यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं.

याच काळात मुखर्जी यांची राजकारणात वापसी सुरू झाली. राव यांनी 1990 मध्ये मुखर्जी यांना नियोजन आयोगाचं उपाध्यक्ष बनवलं. 5 वर्षं मुखर्जी याच पदावर होते.

राव यांच्यासमोर अर्जुन सिंह यांचं आव्हान उभं राहिल्यानंतर त्याचा सामना करण्यासाठी राव यांनी मुखर्जी यांना 1995मध्ये परराष्ट्र मंत्री बनवलं.

'सोनिया पंतप्रधान करतील असं वाटलं होतं'

2004ला काँग्रेस सत्तेत आली. अशातच मी पंतप्रधान बनणार नाही, असं सोनिया गांधींनी जाहीर केलं.

यानंतर त्यांनी मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदी बसवलं आणि पुन्हा एकदा प्रणब मुखर्जी यांना पंतप्रधान पदानं हुलकावणी दिली.

Image copyright PHOTODIVISION.GOV.IN

ज्या व्यक्तीला प्रणब मुखर्जी यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनवलं होतं तिच व्यक्ती पंतप्रधान बनली आणि मुखर्जींना त्या व्यक्तीच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदावर समाधान मानावं लागलं.

"पंतप्रधान न बनवण्यात आल्यामुळे मुखर्जी यांचं नाराज होणं साहजिक होतं, कारण ते या पदासाठी योग्य होते," असं मनमोहन सिंह यांनीसुद्धा मान्य केलं होतं.

मनमोहन सिंह यांनी प्रणब मुखर्जी यांचं आत्मकथनपर पुस्तक 'द कोलिएशन ईयर्स: 1996-2012' च्या प्रकाशन समारंभात हे म्हटलं होतं.

"सोनिया गांधी यांनी पद नाकारल्यानंतर मला पंतप्रधानपद मिळेल, असं सर्वांना वाटलं होतं," असं मुखर्जी यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

कोण आहेत प्रणब मुखर्जी

प्रणब मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935ला पश्चिम बंगालमधील मिराती गावात झाला. त्यांनी 2012 ते 2017 या कालावधीत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

जवळपास 5 दशक ते भारतीय राजकारणात आहेत.

1969 मध्ये इंदिरा गांधी यांच्या मदतीनं ते पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर राज्यसभेवर निवडून गेले.

त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत.

मुखर्जी यांची राजकीय कारकीर्द

1982 ते 1984 - अर्थमंत्री

1980 ते 1985 - राज्यसभेचे नेते

1991 - नियोजन आयोगाचे अध्यक्ष

1995 - परराष्ट्र मंत्री

2004 - लोकसभा निवडणुकीत विजय

2004 ते 2006 - संरक्षण मंत्री

2006 ते 2009 - परराष्ट्र मंत्री

2009 ते 2012 - अर्थमंत्री

2012 ते 2017 - राष्ट्रपती

25 जुलै 2017ला प्रणब मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यभार संपुष्टात आला.

जून 2018 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित करणारे मुखर्जी पहिले माजी राष्ट्रपती ठरले होते. संघाचं निमंत्रण स्वीकारल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती.

"प्रणब मुखर्जी यांच्या प्रचंड जनसंपर्कामुळे आडवाणी, खंडूरी, हरीश रावत, अजित जोगी, डॉक्टर मनमोहन सिंह आणि त्यांचं कुटुंब, जयराम रमेश, उमा भारती यांच्या मदतीनं गंगा नदीला राष्ट्रीय नदीचा दर्जा मिळाला," असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रचारक केएन गोविंदाचार्य यांनी बीबीसीला लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)