नानाजी देशमुख : परभणीच्या मराठमोळ्या माणसाला भारतरत्न - बीबीसी मराठी राउंडअप

नानाजी देशमुख Image copyright Getty Images

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलं आहे. थोडक्यात वाचा बीबीसी मराठीचा राउंडअप

नानाजी देशमुख: परभणीच्या मराठमोळ्या माणसाला भारतरत्न

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलं आहे.

नानाजी देशमुख यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1916 या दिवशी परभणी जिल्ह्यातील कडोली या गावात झाला. त्यांचे शिक्षण राजस्थानातील सिकर येथे झाले. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक झाल्यानंतर नानाजी देशमुख यांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे प्रचारक म्हणून पाठविण्यात आले.

भारतीय जनसंघात सक्रिय झाल्यानंतर उत्तर प्रदेशात चौधरी चरणसिंग यांच्याबरोबर सरकार स्थापन करण्यामध्ये नानाजींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता.

आणीबाणी संपल्यावर नानाजी देशमुख यांनी उत्तर प्रदेशातील बलरामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवून ते लोकसभेत गेले होते. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा

अमरावती जिल्ह्यात का पेटला आहे वनविभाग आणि आदिवासींमध्ये संघर्ष?

मेळघाटातलं केलपाणी हे गाव काही दिवसांपूर्वी आदिवासी आणि वनाधिकाऱ्यांमधल्या संघर्षामुळे बातम्यांमध्ये आलं होतं. 14 जानेवारीला आठ गावातले जवळपास 400 ते 500 आदिवासी त्यांच्या मूळ गावी गेले.

व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित (कोअर) भागात त्यांनी प्रवेश केला होता. आठ दिवसांपासून गोठवणाऱ्या थंडीत जंगलात तंबू टाकून ते राहात होते.

Image copyright BBC/NITESHRAUT

त्यांना जंगलाच्या हद्दीतून बाहेर काढण्यासाठी वनविभाग, पोलीस दल आणि CRPFचे लोक पोहोचले असता त्यांच्यात संघर्ष पेटला.

आदिवासी ग्रामस्थांनी सुरक्षा दलावर मिरची पूड फेकली आणि दगडफेक करण्यास सुरवात केली. त्यानंतर धनुष्यबाण, गोफण, काठ्या, कुऱ्हाड यांच्या मदतीने हल्ला चढवला. यात 30 कर्मचारी जखमी झालेत. आदिवासींचा हल्ला पूर्वनियोजित होता. त्यामुळं परिसरात जमाव बंदी लागू करण्यात आल्याचं वन विभागाने म्हटलं आहे.

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

ठाकरे सिनेमात टाळल्या 7 वादग्रस्त गोष्टी आणि दिली 5 स्पष्टीकरणं

लोकसभा निवडणुकांच्या दोन महिने आधी ठाकरे सिनेमा रिलीज झालाय. याचे निर्माते शिवसेनेचे खासदारच असल्यामुळे ठाकरेंचं चरित्र तटस्थपणे पाहायला मिळण्याची कुणाची फारशी अपेक्षा नसेल.

Image copyright TWITTER/THACKERAYMOVIE

पण हा सिनेमा बाळासाहेबांच्या राजकीय आयुष्यातल्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचताच संपतो. त्यामुळे नंतरच्या काळात झालेल्या अनेक अप्रिय घटना दाखवणं टाळता येतं. पण जो काळ दाखवला आहे, त्यातलेही काही महत्त्वाचे प्रसंग आणि वाद दाखवले नाहीयेत. त्याविषयी तुम्ही इथं वाचू शकता.

व्हेनेझुएलाच्या आडून पुन्हा एकदा अमेरिका आणि रशिया आमनेसामने?

व्हेनेझुएलामध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता नवं वळण घेतलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि लॅटिन अमेरिकेमधील इतर अनेक राष्ट्रांनी व्हेनेझुएलाचे विरोधी पक्षनेते खुआन ग्वाइडो यांना हंगामी अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे.

या निर्णयानंतर व्हेनेझुएलाचे अध्यक्ष आणि सोशलिस्ट पक्षाचे नेते निकोलस मादुरो यांनी वॉशिंग्टनशी सर्व संबंध तोडले आहेत. तर दुसरीकडे मादुरो यांच्या टीकाकारांना बळ मिळां आहे. यामुळे व्हेनेझुएलामध्ये तणाव वाढला आहे.

Image copyright Getty Images

या सर्व घडामोडींचे व्हेनुझुएलामध्ये आणि देशाबाहेर कसे पडसाद उमटतील याचा आढावा घेतला आहे राजकीय विषयांचे जाणकार जोनाथन मारकस आणि लॅटिन अमेरिकेच्या ऑनलाईन एडिटर व्हॅनेसा बुश्लुटर यांनी

'ठाकरे मला माझ्या कामामुळे मिळाला, जातीधर्मामुळे नाही': नवाझुद्दीन सिद्दीकी

"बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी माझी निवड का केली गेली, असा प्रश्न विचारला जातो. निर्माते संजय राऊत यांनी एका कलाकाराची निवड केली आहे. हा कलाकार कोणत्या जातीधर्माचा आहे, हे लक्षात घेऊन निवड केली नाही. या कलाकाराची क्षमता आहे, तो भूमिकेला न्याय देऊ शकतो म्हणून निवड केली," असं बाळासाहेब ठाकरेंची भूमिका करणाऱ्या नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितलं. वाचा त्यांची संपूर्ण मुलाखत

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)