'भारत माता की जय' नाही 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणा- देवबंदचे मौलवी #5मोठ्याबातम्या

Image copyright SAM PANTHAKY/getty

आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :

1. 'भारत माता की जय' नाही 'हिंदुस्तान जिंदाबाद' म्हणा- देवबंदचे मौलवी

"आम्ही 100 टक्के देशभक्त आहोत आणि आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करू. मिठाई वाटू, तिरंगा फडकावू आणि हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देऊ. पण आम्ही वंदे मातरम् किंवा भारत माता की जय म्हणणार नाही," असं देवबंदचे मौलवी तारिक कासमी यांनी म्हटलं. फक्त वंदे मातरम् म्हणणे किंवा भारत माता की जयच्या घोषणा देणं, म्हणजे काही राष्ट्रभक्ती नव्हे असं ते म्हणाले.

देवबंदचे दुसरे एक मौलवी यांनी देखील कासमी यांच्याप्रमाणेच आपला हिंदुस्तान जिंदाबाद किंवा जय हिंद या घोषणांना विरोध नसल्याचं म्हटलं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे.

2. निवडणूक पूर्व आश्वासनांमुळे अर्थव्यवस्था घसरू शकते- मूडीजचा इशारा

निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आलेले निर्णय आणि नरेंद्र मोदी सरकारकडून देण्यात आलेल्या भरमसाठ आश्वासनांमुळे देशाच्या आर्थिक धोरणावर परिणाम होऊन अर्थव्यवस्था घसरू शकते असा इशारा मूडीज या पतमानांकन संस्थेनी दिला आहे.

येत्या आर्थिक वर्षात 3.4 टक्क्यांची वित्तीय तूट निर्माण होऊ शकते असा मूडीजनं आधी म्हटलं होतं. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आलेल्या निर्णयावर अंमलबजावणी केल्यास वित्तीय तूट आणखी वाढू शकते असं मूडीजनं म्हटलं आहे. हे वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

3.'काँग्रेस सत्तेत आल्यास कुठलाही चित्रपट बंद पाडू दिला जाणार नाही'

काँग्रेसला केंद्रात सत्तेवर परतण्याची संधी मिळाल्यास या देशात कोणतेही पुस्तक निषेध म्हणून जाळले जाणार नाही आणि कोणताही चित्रपट बंद पाडू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट हमी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी दिली असं वृत्त लोकमतनं दिलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काँग्रेस नेते आणि लेखक शशी थरूर

सत्ताधारी पक्षाला गैरसोयीचा वाटणारा प्रत्येक विचार सरसकट 'देशद्रोह' ठरवण्याचा उन्मत्तपणा कॉंग्रेसला अमान्य आहे. हिंसेला उघड उत्तेजन आणि देशाच्या सार्वभौमत्वाला हानी पोचेल असे वक्तव्य हे अपवाद वगळता मतस्वातंत्र्याचा, मुक्त अभिव्यक्तीचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. असं वक्तव्य शशी थरूर यांनी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केलं.

4. पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची शाळांवर सक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २९ जानेवारीला होणारा 'परीक्षा पे चर्चा-२' हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवण्याची सक्ती शाळांवर करण्यात आली आहे. दूरचित्रवाणी, इंटरनेट, रेडिओ यापैकी कोणत्याही माध्यमातून हा कार्यक्रम शाळांमध्ये करण्याचे शासनाच्या परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले असून, कार्यक्रम केल्याचा छायाचित्रांसह अहवाल न दिल्यास कारवाईचा सूचक इशाराही देण्यात आला आहे, असं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी या बाबतचे परिपत्रक शिक्षण उपसंचालक, मुख्याध्यापकांना पाठवले आहे. परीक्षा पे चर्चा-२ हा कार्यक्रम दूरचित्रवाणी वाहिन्यांसह फेसबुक लाइव्हद्वारे प्रसारित केला जाणार आहे.

5. राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. राज्यावर स्वाईन फ्लूचे पुन्हा एकदा संकट आले आहे. गेल्या २२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे समोर आले आहे असं वृत्त झी 24 तासनं दिलं.

दरम्यान, आरोग्य विभागाकडून रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. स्वाईन फ्लूने देशात आतापर्यंत ७७ बळी घेतले आहेत. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरांमध्येही स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)