'मणिकर्णिका' सिनेमांतले 5 मुद्दे, जेव्हा कल्पना वास्तविक तथ्यांपासून फारकत घेते

मणिकर्णिका चित्रपट Image copyright TWITTER

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर बेतलेला बहुचर्चित 'मणिकर्णिका' सिनेमा प्रदर्शित झाला आणि ऐतिहासिक घटना, पात्रांवर आधारित सिनेमा तयार करण्यात आपण आजही पुरे पडत नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.

ऐतिहासिक सिनेमांमध्ये सिनेमाचा कॅनव्हास जुन्या काळातील असला तरी त्यातील घटना मांडताना वास्तवाचं भान ठेवणं गरजेचं असतं. कलाकारांना असणाऱ्या स्वातंत्र्याचा वापर करताना मूळ इतिहासातील किमान ज्ञात, लिखित घटनांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेणं अपेक्षित आहे.

पण दिग्दर्शक कंगना रणौतने कथानक आणि एकूणच कथेतील तथ्यांवर अशी कात्री चालवली आहे, जशी मुख्य भूमिकेत ती शत्रूंवर तलवार फिरवताना दिसतेय.

एक नजर अशाच काही दृश्यांवर, जिथे अशी क्रिएटीव्ह लिबर्टी घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मनकर्णिका हे लक्ष्मीबाईंचं मूळ नावच 'मणिकर्णिका' करण्यात आलं आहे. असेच काही मुद्दे खाली पाहूयात. (जर तुम्ही सिनेमा पाहिला नसेल तर स्पॉइलर अलर्ट.)


1) झाशीच्या राणी लक्ष्मीबाई धाडशी, धडाडीचे निर्णय घेऊन स्वतः हातात तलवार घेऊन लढणाऱ्या असल्या तरी त्यांनी तत्कालीन सामाजिक, राजकीय अनेक मर्यादांचे पालन केले होते.

विवाह झाल्यावर असो वा पती गंगाधररावांच्या मृत्यूनंतर, प्रत्येक वेळेस राणी लक्ष्मीबाई पडद्याआड बसूनच बोलणी किंवा इतर चर्चा करायच्या. विशेषतः ब्रिटिश अधिकाऱ्यांशी, वकिलांशी चर्चा कधीही समोरासमोर होत नव्हती. 1857च्या उठावावर 'माझा प्रवास' या पुस्तकात गोडसे भटजींनी लिहून ठेवलं आहे. त्यानुसार, मुख्य महालाच्या कचेरीत एका 'पडतपोशी'सारखी जागा होती. त्यामध्ये बसून राणी कारभार पाहात, असं लिहिलं आहे.

भेटीच्या वेळी राणी पडद्याआड बसायच्या, असं ब्रिटिश वकील जॉन लँगनेही 'In the Court of the Rani of Jhansi' या पुस्तकात लिहून ठेवलं आहे.

चित्रपटात मात्र राणी लक्ष्मीबाईंना सर्वांच्या डोळ्यात डोळे घालून बोलताना दाखवलं आहे. इतकंच नव्हे तर इंग्रज अधिकाऱ्यांशी अगदी जवळ उभं राहून 'मी तुमच्या नजरेस नजर भिडवूनच बोलणार,' असं त्या ठणकावतात. सिनेमामध्ये ऐतिहासिक सत्यापासून दूर जाण्याचा हा मोठा प्रयत्न वाटतो. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या 16 दशकांपूर्वीच्या काळाबद्दल अधिक विचार करून सिनेमाचं लेखन करण्याची गरज होती असं वाटतं.


2) 'मणिकर्णिका' चित्रपटामध्ये सदाशिवरावभाऊ या पात्रावर विशेष भर देण्यात आला आहे.

गंगाधररावांच्या मृत्यूनंतर सदाशिवरावभाऊंनी गादीवर दावा सांगितला होता. मात्र इंग्रजांनी त्याची दखलही घेतली नव्हती. चित्रपटात मात्र ही व्यक्ती फार महत्त्वाची असल्यासारखं दाखवण्यात आलं आहे.

इतकेच नव्हे तर सदाशिवरावभाऊंचा मुलगा गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई दत्तक घ्यायल्या निघाल्या, असं दाखवलं आहे. तसंच संस्थानाच्या आशेने इंग्रजांना मदत करत होता, असंही दाखवण्यात आलं होतं.

Image copyright PIB.NIC.IN

खरंतर झाशी संस्थानामध्ये दुलाजीसिंग परदेशी हा सरदार इंग्रजांना फितूर झाला होता. परंतु चित्रपटामध्ये त्याचा कोठेही उल्लेख नाही. दुलाजी आणि सदाशिवराव ही दोन वेगळी पात्रं एकत्र केल्यासारखे वाटते.


3) वास्तविक सदाशिवरावभाऊने झाशी संस्थानातील एका किल्ल्यावर कब्जा करून संस्थानच्या शत्रूंना एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी हे बंड तात्काळ मोडून काढलं होतं आणि त्यांना तुरुंगात टाकलं होतं. पुढे 1860 साली त्यांची रवानगी अंदमानला करण्यात आली होती.

चित्रपटामध्ये गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांना झालेल्या पुत्राचा मृत्यूही सदाशिवरावामुळे झाला, असं भासवण्यात आलं आहे. खरंतर सदाशिवरावास झाशी संस्थानात वावर करण्यास इतकी संधी देण्यातच आली नव्हती.

'झाशीची राणी लक्ष्मीबाई' या प्रतिभा रानडे यांनी लिहिलेल्या पुस्तकात याबाबत सविस्तर वर्णन केले आहे.


4) गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई राणीसाहेब यांच्या वयातही मोठं अंतर होतं. दामोदर नावाचा नात्यातीलच मुलगा दत्तक घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आजारी गंगाधररावांचं निधन झालं होतं.

Image copyright WIKIPEDIA

चित्रपटामध्ये राणी लक्ष्मीबाई आणि गंगाधरराव दत्तकविधानाच्या रात्री चक्क तलवारबाजी करत असल्याचं दाखवलं आहे. रुग्णशय्येला खिळलेला राजा हातात तलवार कसा धरेल आणि त्यांची महाराणी, संस्थानाची भावी कर्ती नायिका त्याच्याविरोधात कशी तलवार उपसेल, याचाही विचार करण्यात आलेला नाही. गंगाधरराव मृत्यूपुर्वी बराच काळ आजारी होते हे सर्वच इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे.


5) ब्रिटिशांशी लढताना राणी लक्ष्मीबाईंना आधी काल्पीला जावं लागलं. त्यानंतर पेशवे आणि तात्या टोपेंबरोबर सर्वजण ग्वाल्हेरला चालून गेले.

ग्वाल्हेरला संस्थानिक जयाजीराव शिंदे आणि त्यांचा दिवाणजी दिनकरराव यांचा पेशवे, राणी लक्ष्मीबाईंबरोबर झालेल्या लढाईत पराभव झाला. त्यानंतर शिंदे आणि दिवाणजी दोघेही आग्र्याला इंग्रजांच्या आश्रयाला गेले.

'मणिकर्णिका' चित्रपटामध्ये राणी स्वतः एकट्या जयाजीराव शिंदेंच्या समोर जाऊन त्यांना सिंहासन रिकामं करायला सांगून स्वतः तिथे बसतात, असं चित्र रंगवलं आहे.

कदाचित सिनेमाचा परिणाम साधण्यासाठी हे बदल करण्यात आले असावेत.

संदर्भ -

  • 'In the Court of the Rani of Jhansi' - जॉन लँग
  • 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' - प्रतिभा रानडे
  • 'माझा प्रवास' - विष्णूभट गोडसे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)