कुंभमेळा: किन्नर आखाडा असा ठरतोय आकर्षण आणि वादाचं केंद्र

प्रयागराज अर्थातच अलाहाबादचा कुंभमेळा यंदा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यांतील एक कारण म्हणजे इथला किन्नर आखाडा.

कुंभमेळ्यात प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय हा आखाडा ठरला आहे. असं असलं तरी आखाड्यांना मान्यता देणारी परिषद या आखाड्याला अधिकृत आखाडा मानण्यास तयार नाही.

2019च्या कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू असताना ट्रान्सजेंडर आखाड्याचे पदाधिकारी शाही पेशवाई घेऊन शहरात दाखल झाले. शहरातून त्यांची पेशवाई निघाली तेव्हा लोक त्यांना पाहून दंग झाले होते.

2016 मध्ये उज्जैनच्या कुंभमेळ्यात सर्वप्रथम ट्रान्सजेंडर आखाडा चर्चेत आला. प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात या आखाड्यानं जूना आखाड्याशी हातमिळवणी केली.

असं असलं तरी यामुळे ट्रान्सजेंडर आखाडा जूना आखाड्यात विलीन करण्यात आलेला नाही, असं ट्रान्सजेंडर आखाडा प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी सांगतात.

Image copyright DEBALIN ROY/BBC

यावर जूना आखाड्याचे संरक्षक हरी गिरी सांगतात, "ट्रान्सजेंडर आखाड्याचं जूना आखाड्यात विलिनीकरण करण्यात आलं आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. ट्रान्सजेंडर आखाडा एक स्वतंत्र आहे, त्यांची ही ओळख पुढेही राहिलं."

वेगळा आखाड्याची गरज का?

"ट्रान्सजेंडर समाजाचं पतन सनातन धर्मामुळे झालं होतं आणि कुणीही या समाजाकडे लक्ष दिलं नाही. यामुळे किन्नर आखाडा सुरू करावा लागला. 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वतंत्र ओळख दिल्यानंतर समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी धर्माऐवजी चांगला दुसरा कोणताच रस्ता नाही, असं मला वाटलं. पण मला या पदाची लालसा अजिबात नाहीये. मी हे स्पष्ट करू इच्छिते की, या गादीवर मी स्वत:ला वॉचमन समजते," त्रिपाठी पुढे सांगतात.

Image copyright DEBALIN ROY/BBC

"ट्रान्सजेंडर व्यक्तींबद्दलचे जूना आखाड्याचे विचार सकारात्मक आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली ती आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. त्यांनी मोठ्या मनानं आम्हाला स्वीकारलं आहे," असं त्रिपाठी सांगतात.

किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर भवानी नाथ वाल्मिकी सांगतात, "मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आखाडा बनवावा लागला. समाजातील लोक आजही आमचा स्वीकार करत नाहीत. पण आपलं म्हणणं सांगणं आणि पटवून देण्यासाठी धर्म एक चांगला मार्ग आहे. सर्वांना पूजा आणि सन्मानाचा अधिकर आहे तर तो ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही असायलाच हवा."

ट्रान्सजेंडर आखाड्याला विरोध

ट्रान्सजेंडर आखाडा सुरू करण्याविषयी चर्चा सुरू झाली, तेव्हा ट्रान्सजेंडर समाजातील व्यक्तींनीच याचा विरोध केला. या विरोधामागे धर्म हेच कारण होतं. इतकंच नाही तर सनातन परंपरेनुसार बनलेल्या 13 आखाड्यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या स्वतंत्र आखाड्याला विरोध केला.

Image copyright DEBALIN ROY/BBC

"ट्रान्सजेंडर आखाड्याचं कोणतंही अस्तित्व सनातन परंपरेत नाही आणि पुढेही या आखाड्याला 14वा आखाडा म्हणून मान्यता मिळणार नाही," असं आखाड्यांना मान्यता देणारी संस्था अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचं म्हणणं आहे.

"किन्नर आखाड्याला मान्यता मिळणार नाही. 13 आखाडे आहेत आणि तेराच राहतील. तसंही हा आखाडा जूना आखाड्यात सामील झाला आहे. त्यामुळे त्याचं काही अस्तित्व उरलेलं नाही. लक्ष्मी त्रिपाठी आल्या आहेत, त्या थोडा आवाज करत आहेत, पण यामुळे काहीच साध्य होणार नाही.

"सध्या ते जूना आखाड्यात आहेत. पण पुढे चालून त्यांना तिथूनही बाहेर काढण्यात येईल, यात काही शंका नाही. संन्यास परंपरेत ट्रान्सजेंडर व्यक्तींना संन्यास घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी लालसेपोटी हे केलं तर हा ट्रान्सजेंडर समाजाचा अपमान असेल," गिरी सांगतात.

Image copyright DEBALIN ROY/BBC
प्रतिमा मथळा अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी

"स्वत:च्या घरात कुणी स्वत:ला पंतप्रधान घोषित केलं तर प्रत्येक जण त्या व्यक्तीला पंतप्रधान समजणार का? शिवाय मान्यता फक्त 13 आखाड्यांना आहे आणि तेवढ्यांनाच राहील. ट्रान्सजेंडर व्यक्तींना संन्यास देणारे पापात भागीदार राहतील, कारण शास्त्रामध्ये तसा उल्लेख नाहीये," ते पुढे सांगतात.

इतकंच नाही तर किन्नर आखाड्यातील अनेक व्यक्तींनी ही बाब मान्य केली की हा आखाडा बनवण्यापूर्वी त्यांना त्यांच्याच समुदायातील काही लोकांनी विरोध केला होता. कारण या समुदायातील बहुतेक जण इस्लाम धर्म मानतात. त्यामुळे इस्लाम धर्म मानणारे ट्रान्सजेंडर आखाड्याच्या विरोधात होते, कारण त्यांना त्यांचा धर्म सोडून हिंदू परंपरा स्वीकारायच्या नव्हत्या.

विशेष म्हणजे किन्नर आखाड्याच्या उत्तर भारतातल्या महामंडलेश्वर भवानी यांनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. त्यांनी हज यात्रासुद्धा केली आहे. असं असलं तरी 2010मध्ये इस्लाम धर्म स्वीकारण्यापूर्वी त्या हिंदू होत्या.

त्या सांगतात, "आमच्यासोबत होणाऱ्या भेदभावाला कंटाळून मी इस्लाम धर्म स्वीकारला होता. इस्लाममध्ये मला नमाज पठणाचं स्वातंत्र्य होतं तर मला हजलाही जाऊ दिलं. पण जेव्हा मला असं वाटलं की सनातन परंपरेत परत जावं आणि समाजासाठी काहीतरी करावं, तेव्हा मी परत आले. 'घरवापसी'ची काही शिक्षा थोडीच असणार?"

किन्नर आखाड्यामध्ये समलैंगिकांना जागा?

समलैंगिकांना किन्नर आखाड्यामध्ये सामील करण्याच्या प्रश्नावर आखाड्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचं दिसून येतं.

समलैंगिकांना किन्नर आखाड्यामध्ये सामील करणं म्हणजे स्वत:च्या अधिकारांना मुकणं आहे, असं काही ट्रान्सजेंडर्सना वाटतं. पण आखाडा प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी प्रत्येक वर्गाला आखाड्याशी जोडण्याची आणि सोबत घेऊन जाण्याची भाषा करतात.

Image copyright DEBALIN ROY/BBC

"आमच्या आखाड्यात सगळ्यांचं स्वागत आहे. मग ती व्यक्ती गे, लेस्बियन अथवा कुणीही असो. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यावर आमचा विश्वास आहे. कुणाचं पाप-पुण्य बघून मी आशीर्वाद देत नाही. आमच्या आखाड्याची कवाडं सर्वांसाठी खुली आहेत," असं त्रिपाठी म्हणाल्या.

पण भवानी नाथ वाल्मिकी यांच्या मते, "समलैंगिकांनी ट्रान्सजेंडर समाजाचं नुकसान केलं आहे. त्यांच्यामुळे आम्हाला अनेक संकटांचा सामना कराला लागला आहे. माझ्या आखाड्यात फक्त ट्रान्सजेंडर राहतील आणि मी फक्त ट्रान्सजेंडरचाच विकास करणार आहे. मी त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही, पण त्यांची साथही देणार नाही. इतरांना माझ्या म्हणण्यावर विश्वास असो अथवा नसो पण आमची वाईट स्थिती समलैंगिकांमुळेच निर्माण झालीय. त्यांना स्वातंत्र्य हवं होतं, आम्हाला नव्हे."

इतर आखाड्यांपेक्षा भिन्न?

कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याचं नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे. इतर आखाड्यांविषयी कुणाला माहिती असेल अथवा नसेल, पण किन्नर आखाड्याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे.

Image copyright DEBALIN ROY/BBC

ट्रान्सजेंडर आखाड्याच्या मुख्य मंडपाशेजारी दिवसभर गर्दी जमते. इथे बसलेले काही ट्रान्सजेंडर लोकांना आशीर्वाद देत असतात. यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या तंबूबाहेर सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची गर्दी असते. या लोकांना त्रिपाठी यांची एक झलक पाहायची असते.

लक्ष्मी यांचा आशीर्वाद घेणाऱ्यांमध्ये सांधू-संत यांच्याखेरीज गरोदर महिलांचाही समावेश आहे. यात विशेष म्हणजे प्रत्येकाला सेल्फी काढण्याची संधी लक्ष्मी देतात, कधीकधी त्या स्वत:हून फोटो काढतात.

Image copyright DEBALIN ROY/BBC

लक्ष्मी यांचा तंबू वगळता इतर तंबूंमध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ दिसत नाही. इतर आखाड्यांप्रमाणे ना इथं संत मंडळी चिलम फुकताना दृष्टीस पडतात ना कोणत्याही प्रकारची हलचाल दिसते. लाऊडस्पीकरवर भजन तेवढे ऐकायला येतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)