अमित ठाकरे-मिताली बोरुडेच्या लग्नात राज ठाकरेंनी साधली 'वेडिंग डिप्लोमसी'?

अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडे Image copyright Swanand Kamat
प्रतिमा मथळा अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडे

लाखो... नाही कदाचित कोट्यवधी रुपयांची सजावट, स्टेजवर पंचविशी-तिशीतलं जोडपं, त्यांच्या आजूबाजूला नेतेमंडळी आणि फोटो फ्लॅशचा लखलखाट. हे साधारण आपल्याकडच्या राजकीय किंवा उद्योजकांच्या घरांमधील विवाह समारंभाचं चित्र असतं.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज मुंबईत एका शाही पण खासगी समारंभात विवाहबद्ध झाले. आता राजकारण्यांच्या घरची लग्न म्हटलं पाहुणे मंडळींमध्येही राजकारणी असतीलच. त्यातल्या त्यात ठाकरे कुटुंबातलं लग्न म्हटल्यावर क्रिकेट आणि सिनेक्षेत्रातल्या मोठ्या चेहऱ्यांनाही अगत्याचं निमंत्रण जातं.

पण देशात लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना, राज ठाकरेंनी या शुभमुहूर्तावर साधलेल्या 'वेडिंग डिप्लोमसी'कडेही सर्वांचं लक्ष लागून होतं.

राजकीय नेत्यांचे विवाह समारंभ वरवर कौटुंबिक, खासगी वाटत असले तरी त्यांच्या मुहूर्तापासून ते आमंत्रितांची नावं ठरण्यापर्यंत त्यामध्ये एक डिप्लोमसी असते, असं म्हटलं जातं.

Image copyright Amir Khan
प्रतिमा मथळा राज ठाकरे इतर पाहुण्यांसह

आज अमित आणि मिताली यांच्या लग्नासाठी महाराष्ट्रातील तसंच देशातील काही मोठ्या नेत्यांना निमंत्रण आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह आणि यांना बोलावण्यात आलं नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आवर्जून आमंत्रण देण्यात आलं. यावरूनच राज ठाकरे यांच्या पुढील काळातील राजकीय वाटचालीचा अर्थ लागतो, असं राजकीय विश्लेषक सांगतात.

राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 'मातोश्री'वर जाऊन निमंत्रण दिल्यावरही, त्यामागे काहीतरी दुसराही राजकीय हेतू असावा, अशी चर्चा त्यावेळी होती.

राजकीय घडामोडींचे अभ्यासक आणि पत्रकार संदीप प्रधान यांच्या मते, अशा प्रकारची लग्नं ठरवण्यापासूनच 'वेडिंग डिप्लोमसी' सुरू झालेली असते. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "उद्योजकांच्या घराण्यामध्ये जशी पुढची व्यावसायिक समीकरणं डोळ्यांसमोर ठेवून विवाहसंबंध जुळवले जातात, तसे राजकीय घराण्यांमध्ये राजकीय धोरणं लक्षात ठेवली जातात."

शक्तिप्रदर्शनाची संधी

राजकीय नेत्यांचे विवाहसोहळे बऱ्याचदा आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठीही वापरले जातात. याबाबत संदीप प्रधान म्हणतात, "नेत्यांच्या मुलांचे विवाहसोहळे हे मोठेपणा दाखवण्यासाठीही केले जातात. आपले सोशल कॉन्टॅक्ट्स किती आहेत, हे सुद्धा याद्वारे दाखवलं जातं. लग्नासाठी कोणकोण आलं होतं, याचीही चर्चा होत असल्यामुळं राजकीय नेते आमंत्रितांच्या नावांकडं व्यवस्थित लक्ष देतात.

Image copyright Twitter / @MNSAdhikrut
प्रतिमा मथळा 'मनसे शुभेच्छा'

"राज ठाकरे यांच्या घरातील विवाह सोहळ्याला अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण नसणं स्वाभाविकच" असल्याचं संदीप प्रधान सांगतात. "रोज कार्टून काढून ज्या नेत्यांची टिंगल करत आहोत, त्यांनाच समारंभाला राज ठाकरे नक्कीच बोलावणार नाहीत. तसंच निवडणुका अगदीच जवळ आल्यामुळे राजकीय नेत्यांच्या कोणत्याही कृतीचा अर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळेच या दोघांना आमंत्रण नसावे," असं ते म्हणाले.

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या घराण्यांच्या विवाह सोहळ्यांच्या खर्चावर तसंच त्यात होणाऱ्या संपत्तीच्या ओंगळवाण्या प्रदर्शनावरही चर्चा होते. यामध्ये कोणताही राजकीय पक्ष मागे नाही, असं ज्येष्ठ पत्रकार संजय निस्किन सांगतात.

"पंकजा मुंडे, पूनम महाजन, निखिल गडकरी, धनंजय मुंडे या सर्वांचे विवाह सोहळे अशाच प्रकारे थाटामाटात झाले होते. अलीकडच्या काळात उदाहरण द्यायचे झाल्यास पतंगराव कदम यांच्या पुत्राचा उद्योजक अविनाश भोसले यांच्या कन्येशी झालेला विवाह. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च झालेला दिसून आला.

"राजकीय घराण्यांचा विचार केल्यास जिल्हा पातळीवर बहुतांश नेते एकमेकांचे नातलग असल्याचं दिसून येतं. एखाद्या पक्षात वडील आणि जावई दुसऱ्या पक्षात अशी उदाहरणंही असतातच," असं मिस्कीन सांगतात.

'लक्षभोजना'ची आठवण

आजकाल राजकीय नेत्यांच्या मुला-नातवंडांचं लग्न म्हटलं की तिथे भरपूर खर्च केला जातो, हे आताशा सर्वांच्या सवयीचं झालं आहे. हजारो लोकांची जेवणं आणि महागडी सजावट असतेच.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विवाहसोहळ्याने राज्यभरात चर्चेची आणि टीकेची एकच झोड उठली होती. या विवाहसोहळ्यात विहिरीत बर्फ टाकल्याचा आणि हजारो लोकांना भोजन दिल्याची चर्चा त्यापुढे अनेक महिने टिकली. त्याला 'लक्षभोजन' अशी संज्ञाही मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात त्या घटनेला विशेष स्थान मिळालं होतं.

सोलापूरस्थित ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्या विवाहाच्या वेळेस महाराष्ट्रात असणारी परिस्थिती सांगितली. ते सांगतात, "त्यावेळेस राज्यात धान्याची टंचाई होती. काही प्रमाणात धान्य लेव्हीच्या नियमामुळं सरकार सांगेल त्या दरानुसार जमा करावं लागायचं. धान्यटंचाईमुळं जेवणावळींवर बंदी होती. 50 पेक्षा जास्त लोकांना जेवण वाढायचं नाही, असा नियमच होता. मात्र तरीही मोहिते पाटील यांच्या घरात हा जंगी सोहळा झाला होता. साहजिकच त्याकडे सर्वांचे लक्ष वेधलं गेलं."

धान्यटंचाईच्या तीव्रतेबद्दल अरविंद जोशी सांगतात, "मोहिते- पाटील यांच्या विवाहात लग्नात विहिरीत बर्फ टाकल्याचं आणि टँकरनं खीर वाटल्याचं सांगण्यात येतं. त्यानंतर या विवाहातील खर्चाबाबत अनेक खऱ्या-खोट्या चर्चा होत राहिल्या. त्या काळात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात धान्य न्यायलाही बंदी होती. आमच्याकडची ज्वारी संपल्यावर एकदा मी माझ्या बहिणीकडून ज्वारी आणली होती. तेव्हा ते धान्य बहिणीच्या घरचं असलं तरी मला रात्रीच्या वेळेस लपवून आणावं लागलं होतं, इतकी वाईट परिस्थिती होती. पण आता मोहिते-पाटिल यांच्या लग्नातील खर्चाचे विक्रम कधीच मोडले गेले आहेत. त्याहून कित्येक पटीने खर्च होणारी लग्न आपल्याकडे होतात."

विवाह आणि राजकारण वेगवेगळं

ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांच्या मते, अमितच्या विवाहाच्या निमित्तानं राजकीय हालचाली करण्याचा राज ठाकरे यांचा कोणताही हेतू नसावा.

बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात, "राज ठाकरे यांना सर्वच गोष्टी भव्यदिव्य केलेल्या आवडतात. तेच याबाबतीत असावं. पत्रिकेसाठी ते पहिल्यांदा सिद्धीविनायकाला गेले त्यानंतर रतन टाटा यांच्याकडे आणि मग उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आहेत. याचाच अर्थ कौटुंबिक सोहळा आणि राजकारण दोन्ही वेगळं ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे."

अमितच्या राजकारण प्रवेशाबाबत सांगताना संदीप आचार्य म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून अमित कार्यकर्त्यांच्या भेटी घेतच आहेत. शाखांमध्ये जाणं, ज्यांना राज ठाकरेंपर्यंत पोहोचणं शक्य नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेणं सुरूच आहे. फक्त समारंभ करून राजकीय प्रवेश करायचा की नाही हे राज ठाकरेच ठरवतील. अन्यथा आता अमित राजकारणात आहेच असं म्हणावं लागेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)