'पूर्वी सरपंच होतो, आता दुष्काळामुळे सिक्युरिटी गार्डचं काम करतो'- बीबीसी मराठी राउंडअप

प्रतिमा मथळा बाबासाहेब साळवे

'पूर्वी गावाचा सरपंच होतो, दुष्काळामुळे आता शहरात सिक्युरिटी गार्डचं काम करतो'

"आमच्या बोंधलापुरी गावाचा मी पूर्वी सरपंच होतो. नंतर 5 वर्षं ग्रामपंचायत सदस्यही राहिलो. पण आता दुष्काळामुळे गाव सोडलं आहे. सध्या मुंबईच्या उपनगरातल्या उल्हासनगरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो," हे सांगताना मूळचे जालन्याचे असलेले बाबासाहेब साळवे यांचं उर भरून आलं होतं.

पावसाअभावी मराठवाड्यातल्या ग्रामीण भागाला दुष्काळी अवकळा आली आहे. राज्य सरकारनंही काही दिवसांपूर्वी राज्यातल्या 151 हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला.

पण शेतीच नव्हे तर रोजच्या वापरासाठी पाणी नसल्याने या भागतल्या लोकांनी महानगरांची वाट धरली आहे. त्यांचं हे स्थलांतर मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद या शहरांकडे सुरू आहे.

बाबासाहेब साळवे यांच्या या संघर्षाची कहाणी सविस्तर वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

अमित ठाकरे-मिताली बोरुडेच्या लग्नात राज ठाकरेंनी साधली 'वेडिंग डिप्लोमसी'?

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे रविवारी मुंबईत विवाहबद्ध झाले. आता राजकारण्यांच्या घरची लग्न म्हटलं म्हणजे पाहुणे मंडळींमध्येही राजकारणी असतीलच. त्यातल्या त्यात ठाकरे कुटुंबातलं लग्न म्हटल्यावर क्रिकेट आणि सिनेक्षेत्रातल्या मोठ्या चेहऱ्यांनाही अगत्याचं निमंत्रण होतं.

पण देशात लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना, राज ठाकरेंनी या शुभमुहूर्तावर साधलेल्या 'वेडिंग डिप्लोमसी'कडेही सर्वांचं लक्ष लागून होतं. कशी होती राज ठाकरे यांची ही वेडिंग डिप्लोमसी. अधिक जाणून घेण्यासाठी इथं वाचा.

Image copyright SWANAND KAMAT

'हो, मी विधवा आहे आणि मी विधवांसाठी हळदीकुंकू सुरू केलं'

सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या आवळाई गावात काही दिवसांपूर्वी हळदीकुंकूचा कार्यक्रम झाला. पण हा कार्यक्रम वेगळा होता. विधवा असलेल्या लता बोराडे यांनी विधवा आणि सवाष्ण महिलांसाठी हा कार्यक्रम ठेवला होता.

लग्नानंतर 25व्या दिवशीचं नवरा अपघातात वारल्यानंतर लता बोराडे यांच्या नशिबी संघर्ष आला. पण त्यांनी हार मानली नाही.

Image copyright SWATI PATIL RAJGOLKAR

समाजात अजूनही विधवांना स्वीकारलं जात नाही, म्हणूनच हा कार्यक्रम वेगळी वाट घालून देणारा ठरला. लता बोराडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं. त्यांचा वेदनेच्या वाटेवरचा प्रवास त्यांच्याच शब्दात.

हवामान बदल : 2019मध्ये वातावरणात उच्चांकी कार्बन डायऑक्साईड

2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सर्वोच्च पातळी गाठेल, अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

मानवी कृतींतून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जंगलांत शोषला जातो. त्यामुळे जंगलांना नैसर्गिक 'कार्बन सिंक'ही म्हटलं जातं.

पण यावर्षी पॅसिफिक परिसरातील अधिक उष्ण हवामानामुळे वनस्पतींची वाढ कमी होईल आणि त्या कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषतील, असं संशोधकांना वाटतं.

Image copyright Getty Images

त्यामुळे 2018शी तुलना करता 2019मध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल, असं संशोधकांनी म्हटलं आहे. याचा आपल्यावर काय परिणाम होईल? याविषयी इथं जाणून घ्या.

तालिबानचा वाढता जोर : साडेचार वर्षांत 45 हजार अफगाणी सैनिकांचा बळी

अफगाणिस्तानमध्ये 2014पासून आतापर्यंत 45 हजारहून अधिक सुरक्षा रक्षक मारले गेले असल्याचं राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी सांगितलं. हा आकडा अशरफ घनींनी अफगाणिस्तानची सूत्रं स्वीकारल्यानंतरच्या काळातला आहे.

तालिबानचा वाढता जोर आणि कट्टरपंथीयांच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांच्या मृत्यूंची वाढती संख्या अफगाणिस्तानच्या दृष्टीनं चिंतेचा विषय ठरत आहे.

या 45 हजार सुरक्षा रक्षकांपैकी 28 हजार सैनिक हे 2015 ते 2018 या तीन वर्षांत झालेल्या चकमकींमध्ये ठार झाल्याचं घनी यांनी सांगितलं.

Image copyright EPA

अफगाणिस्तानमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय फौजांचे केवळ 72 सैनिक मारले गेले आहेत. मृत सैनिकांचा हा आकडा पाहिल्यानंतर खरंच कोण लढत आहे, हे स्पष्ट होत असल्याचं घनी यांनी म्हटलं. अमेरिका आणि तालिबानच्या प्रतिनिधींमधील द्विपक्षीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर घनी यांची ही टिप्पणी महत्त्वाची आहे.

अफगाणिस्तानातली एकूणच परिस्थिती तुम्ही इथं वाचू शकता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)