ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश; वाहतूक संघटनेची जबाबदारी #5मोठ्याबातम्या

ईशा कोप्पीकर Image copyright Twitter @iyashveerraghav

आजची दैनिकं आणि वेबसाइट्सवरील 5 महत्त्वाच्या बातम्या अशा :

1. ईशा कोप्पीकरचा भाजपमध्ये प्रवेश; वाहतूक संघटनेची जबाबदारी

अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने रविवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

ईशा कोप्पीकरकडे भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी बातमी Zee 24 Taasने दिली आहे.

शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या हाजी अराफत शेख यांच्या पुढाकाराने या संघटनेची सुरुवात करण्यात आली आहे. या संघटनेचा स्थापना सोहळा रविवारी झाला.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते, असं बातमीत म्हटलं आहे.

2. अयोध्या सुनावणी पुन्हा स्थगित

न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुढं ढकलली आहे.

ही सुनावणी 29 जानेवारीला होणार होती. पण न्यायमूर्ती एस. ए. बोबडे उपलब्ध नसल्याने या घटनापीठाचं काम होणार नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या अतिरिक्त सचिवांनी म्हटलं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

3. हिंदू महिलांना स्पर्श करणारे हात शिल्लक ठेऊ नका : अनंत हेगडे

हिंदू महिलांना स्पर्श करणारे हात शिल्लक ठेऊ नका, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांनी केलं आहे. कोडुगा जिल्ह्यातील हिंदू जागरण वेदिके या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होतं. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

तसंच ताजमहल हे तेजोमहालय आहे, असंही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. देशात 700 ते 800 वर्षांपूर्वी जातीच्या विषाने प्रवेश केला असंही ते या कार्यक्रमात म्हणाले.

अनंत हेगडे यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते दिनेश गुंडू राव यांनी केली आहे. "कोणत्याही जातीच्या महिलेला जर त्रास झाला तर कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. ही कशा प्रकारची भाषा आहे? हेगडे हिंसेला चिथावणी देत आहेत," असं राव यांनी म्हटल्याचा उल्लेख बातमीत आहे.

4. हाऊज द जोश? - पर्रिकरांचा गोवेकरांशी संवाद

गोव्यातील पणजीमध्ये मांडवी नदीवरील नवीन पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते झालं. यावेळ पर्रिकर यांनी नागरिकांशी संवाद साधला. हाऊज द जोश? हा उरी सिनेमातला डायलॉग उच्चारत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

नागरिकांनीही त्यांना 'हाय सर' म्हणत प्रतिसाद दिला. माझ्यात असलेला जोश मी तुम्हाला देतो, आणि तुमच्याशी बोलतो, असं पर्रिकर म्हणाले. ही बातमी NDTVने दिली आहे.

5. चिपळूणमध्ये गोहत्येच्या संशयावरून जाळपोळ

चिपणूळमधील लोटे परिसरात्या पीरलोटे या जंगलभागात गोहत्या झाल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी पहाटे मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला.

यावेळी जमावाने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करून पोलीस व्हॅन पेटवून दिली. जादा कुमक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तब्बल पाच तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. ही बातमी दैनिक पुढारीने दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)