ईशा कोप्पीकर कार्याध्यक्ष झालेली भाजपची महिला ट्रान्सपोर्ट शाखा नेमकं काय करते?

ईशा कोप्पीकर Image copyright Getty Images

भारतीय जनता पक्षात प्रवेश करताच अभिनेत्री ईशा कोप्पीकरला भाजपच्या महिला वाहतूक संघटनेचं कार्याध्यक्षपद देण्यात आलं आहे. पण या पदाचा नेमका अर्थ काय, असा प्रश्न अनेकांना पडला. सोशल मीडियावरही 'आता अशी संघटना कधी अस्तित्वात आली? तिची महिला शाखा कधी निर्माण झाली?' अशा प्रकारचे प्रश्न उमटू लागले.

ईशाने रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी गडकरींबरोबर, हाजी अरफात शेख, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि खासदार अमर साबळे उपस्थित होते.

ईशाला त्या संघटनेच्या अध्यक्षपदी नेमण्याऐवजी कार्याध्यक्षपदी कसे नेमले, असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे.

तसंच पक्षप्रवेशाच्या दिवशीच अभिनेत्यांना पद दिल्याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कार्यक्रमात हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 'नवभारतीय शिववाहतूक संघटना' नावाने संघटना स्थापन केली आहे. भाजपमध्ये येण्यापूर्वी हाजी अरफात शेख शिवसेनेच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत होते.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला मिळालेल्या जबाबदारीबद्दल समाधान व्यक्त करून ईशाने पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

भाजपची महिला वाहतूक संघटना नक्की महिला प्रवाशासांठी काम करणार की वाहतूकदारांसाठी, याबाबत मात्र स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

विनोद तावडे यांनी फेसबुक आणि ट्विटरवर, "प्रभावी वाहतूक व्यवस्था मुंबईसारख्या सतत धावणाऱ्या शहराच्या हृदयाची स्पंदनं सुरळीत ठेवू शकते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'नवभारतीय शिववाहतूक संघटने'चे उद्घाटन झालं. चालक, वाहतूकदार आणि इतरांच्या तक्रारींची योग्य दखल घेऊन निराकरण करण्याचा मार्ग या संघटनेद्वारे खुला झाला आहे," असं लिहिलं आहे.

यातून ही संघटना वाहतूकदारांची असावी, असा तर्क लावला जाऊ शकतो.

मात्र ईशा कोप्पीकरचे पक्षामध्ये स्वागत करताना तावडे यांनी ईशा कोप्पीकर, "भाजप महिला वाहतूक शाखेच्या कार्यकारी अध्यक्षा या नात्याने त्या मुंबईतील प्रवाशांच्या सुव्यवस्थेची जबाबदारी त्या यशस्वीरीत्या सांभाळतील. विशेषतः महिलांच्या संदर्भातील प्रश्न खबरदारीने हाताळतील, याची खात्री आहे," असं लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

याचा अर्थ या संघटनेची महिला शाखा मात्र प्रवाशांसाठीच असावी असंही वाटतं.

ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांच्या मते, "मध्यंतरी ठाण्यामध्ये महिला रिक्षाचालकांना एकत्रित करण्याचा तसंच त्यांना सोयी देण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. काही वर्तमापत्रांनीही त्यांना ओळखपत्र देऊन त्यांच्यासाठी मोहीम सुरू केली होती."

त्याच महिला चालकांसाठी तसाच काहीसा प्रयत्न भाजपला करायचा असावा, असा अंदाज देशपांडे वर्तवतात.

याबाबत ईशा हिच्याकडून जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता, तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अभिनेत्यांचा कितपत उपयोग होतो?

ईशा कोप्पीकरला पक्षप्रवेशाच्या दिवशीच संघटनेची जबाबदारी देण्याच्या पार्श्वभूमीवर सेलेब्रिटींच्या राजकीय कारकिर्दीवर बीबीसी मराठीने 'लोकमत'चे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांचं मत जाणून घेतलं.

ते म्हणाले, "पक्ष कमजोर झाला की गाळलेल्या जागा भरण्यासाठी असे प्रवेश दिले जातात. आजवरच्या इतिहासाचा विचार करता अभिनेत्री शबाना आझमी आणि थोड्या प्रमाणात हेमा मालिनी तसंच अलीकडे राजकारणात आलेल्या किरण खेर यांच्याशिवाय कुणीही फारशी चांगली कामगिरी करू शकलेलं नाही."

सेलेब्रिटींना पक्षात प्रवेश देणं फारसं उपयुक्त ठरत नाही, असंही भटेवरा यांना वाटतं. ते सांगतात, "एखाद्या नेत्याला पाडण्यासाठी अशा सेलेब्रिटींचा उपयोग होऊ शकतो. पण दीर्घकाळ त्यांचा पक्षाला किंवा राजकारणाला फारसा उपयोग होत नाही."

Image copyright Getty Images

"पहिल्याच दिवशी एखादी जबाबदारी देणं, तिकीट देणं किंवा आधी तिकीट देऊन पक्षात घेणं, असे प्रकार याआधी अनेकदा झाले आहेत. पण ते यशस्वी झालेले नाहीत. अभिनय, क्रीडा अशा क्षेत्रांमध्ये जे यश मिळवलं, म्हणजे ते सगळीकडे उपयोगी ठरेल असं नाही."

ईशाने 2000 साली फिझा चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्याआधीही ती दाक्षिणात्य सिनेमात अभिनय केला होता.

2002 साली आलेल्या राम गोपाल वर्मांच्या 'कंपनी'मधल्या 'खल्लास' गाण्यासाठी ती ओळखली जाते. त्यानंतर तिने 'काँटे', 'कयामत', 'दिल का रिश्ता', 'क्या कूल हैं हम', 'एक विवाह ऐसा भी' आणि शाहरुख खानच्या 'डॉन'सारखे काही सिनेमे केले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)