राज ठाकरे आणि अहमद पटेल यांच्या 'त्या' भेटीचा राजकीय अर्थ काय?

राज ठाकरे आणि अहमद पटेल Image copyright AMIR KHAN
प्रतिमा मथळा राज ठाकरे आणि अहमद पटेल

रविवारचा दिवस. वेळ 12.39 वाजता. राज ठाकरेंचे पुत्र अमित यांचं मिताली बोरुडेंशी लग्न लागलं. यानंतर काहीच वेळात राज ठाकरे बाहेर पडले. 11 किलोमीटरवर असलेल्या ताज महाल पॅलेसमध्ये पोहोचले. त्यावेळी दीड वाजला होता. राज ठाकरे 10 मिनिटांनी पुन्हा बाहेर आले, आणि बॅक टू सेंट रेजिस.

पण दहा मिनिटांसाठी राज ताजमध्ये का आले होते? ते 10 मिनिटं कुणाला भेटले? याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर या व्यक्तीचं नाव आहे अहमद पटेल. गुजरात खासदार आणि काँग्रेसचे कोषाध्यक्ष.

ताज हॉटेलमधल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे, पण मनसेनं अशी भेट झाल्याचं ऑन रेकॉर्ड नाकारलं आहे.

एकेकाळी मोदींचे पाठीराखे, प्रशंसक असलेले राज 2014 नंतर मात्र मोदींवर नाराज झाले. वेळोवेळी राज यांनी मोदींवर गंभीर टीका केली. नोटाबंदी, GSTसकट इतर मुद्द्यांवर मोदींना त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. दररोज कुंचल्याचा आसूड मारून भाजपला घायाळ केलं.

मात्र त्याचवेळी राज यांनी काँग्रेसला मात्र सहानुभूती दाखवली. राहुल गांधींवर देशभरातून टीका होत असताना राज मात्र त्यांना सॉफ्ट कॉर्नर देत राहिले.

Image copyright Twitter / Raj Thackeray
प्रतिमा मथळा राज ठाकरे यांचं राहुल गांधी आणि मोदींवरचं हे कार्टून

शिवाय शरद पवार आणि राज यांची वाढती जवळीकही राज यांना आघाडीजवळ घेऊन जाणारी ठरली. त्यामुळेच राज निवडणुकीआधी आघाडीच्या गोटात दाखल होण्याची जास्त शक्यता असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

राज यांनी राहुल गांधी यांना अमितच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. प्रत्यक्षात गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असणारे आणि सोनियांचे विश्वासू असलेले अहमद पटेल स्वत: या सोहळ्याला उपस्थितही राहिले.

आता हे सगळं आघाडीच्या दिशेनं जाणारं आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात, "हे सर्व राजकीय आघाडीसाठी सुरू आहे, असा अर्थ काढण्याची गरज नाही. या सोहळ्याला मी, अशोक चव्हाण, जयंत पाटील, नारायण राणे यांच्यासह इतर पक्षाचे नेतेही हजर होते. हा एक सभ्यतेचा भाग आहे. महाराष्ट्राची परंपरा पाहता हे खूपच स्वाभाविक आहे. राजकारणात वैयक्तिक मैत्री आणि संबंधही असतात. त्यामुळेही अहमद पटेल आले असतील."

पण राजकीय पत्रकार आणि विश्लेषक संदीप प्रधान यांनी अहमद पटेल यांची अमित ठाकरेंच्या लग्नातली हजेरी अत्यंत महत्त्वाची घडामोड असल्याचं म्हटलं आहे. ते सांगतात की, "महाराष्ट्रात आघाडी करताना मनसेला सामील करून घ्यावं यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. पण त्याला काँग्रेसकडून विरोध होऊ शकतो. कारण राज यांची परप्रांतीयांविरोधातील भूमिका, वेळोवेळी मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतीयांना झालेली मारहाण पाहता, या जखमांची उत्तरं काँग्रेसला हिंदी पट्ट्यात द्यावी लागणार.

Image copyright Twitter / AhmedPatel
प्रतिमा मथळा अहमद पटेल हे सोनिया आणि राहुल गांधींच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

"पण अशा स्थितीतही राहुल गांधींचं पर्व सुरू झालेलं असताना अहमद पटेलांची उपस्थिती काँग्रेसची अनुकुलता दर्शवणारी आहे. शिवाय ज्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला मनसेला सोबत घेतल्याचं उत्तर द्यावं लागेल, असं म्हटलं जातंय, तिथं काँग्रेस मोठी स्टेकहोल्डर नाही आहे. तरीही काँग्रेसनं विरोध केला तर मनसेला राष्ट्रवादीशी जुळवून घेण्यासाठीही ही घडामोड महत्त्वाची आहे."

पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राज यांची गरज का आहे? किंवा राष्ट्रवादीला जर मनसेला सोबत घ्यायचं असेल तर त्यासाठी काँग्रेसची परवानगी का लागेल?

या प्रश्नांचं विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी मुंबई आणि शहरी पट्ट्यातील मतदारसंघांवर बोट ठेवलंय. ते सांगतात की, "मुंबईत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा बेस नाहीये. त्यात उत्तर भारतीय समाज काँग्रेसपासून दुरावला आहे. त्यामुळे राज यांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे.

"आता त्याला काँग्रेसमधील एका गटाचा विरोध आहे. त्यांना वाटतं, यामुळे काँग्रेसला युपी-बिहारमध्ये त्रास होईल. मग त्याच न्यायाने भाजपलाही शिवसेनेचा त्रास व्हायला पाहिजे. कारण सेनेचीही काही काळ परप्रांतीयविरोधी भूमिका राहिली आहे. तेलुगू देसम, तृणमूल काँग्रेस यांचंही तसंच आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हा न्याय आहे. आणि लग्न ही गोष्ट आता राजकारणात शक्तिप्रदर्शनासाठी वापरली जाते. त्यात नवीन काही नाही," असं खडस सांगतात.

अर्थात मनसेचे नेते संदीप देशपांडे मात्र आघाडीच्या प्रश्नावर अतिशय सावधपणे उत्तर देतात. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय राज ठाकरे घेतील. आम्ही कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, तसंच आमच्याकडेही कुठला प्रस्ताव आल्याची माहिती नाही. अहमद पटेल यांची अमित ठाकरेंच्या लग्नाला असलेली उपस्थिती ही वैयक्तिक संबंधांमुळे होती. त्याचा संबंध राजकारणाशी जोडून चालणार नाही."

अहमद पटेलांची उपस्थिती महत्त्वाची का?

सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना अहमद पटेल त्यांचे राजकीय सल्लागार होते. त्यांचं 23, मदर तेरेसा क्रिसेंट, हे घर राजकीय घडामोडींचं मुख्य केंद्र होतं. देशभरातील काँग्रेसचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की नेमाने इथे हजेरी लावायचे. पटेलांच्या संमतीशिवाय काँग्रेसचं पान हलत नाही, असं राजकीय जाणकार सांगायचे.

त्यामुळेच गांधी कुटुंबाशी नजीक असलेल्या पटेलांची उपस्थिती डोळ्यात भरणारी आहे, असं मुंबई आणि महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहणारे पत्रकार सांगतात.

राज यांच्या उत्तर भारतीय विरोधाचं काय?

रेल्वे भरती आणि मराठी पाट्यांसाठी आंदोलन करताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली. त्याचे खटलेही मुंबई आणि महाराष्ट्रातील काही शहरांमधील कोर्टात चालू आहेत. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना पहिल्यांदा संधी मिळावी, ही मनसे आणि राज ठाकरेंची भूमिका आहे. तीच भूमिका कायम ठेवत त्यांनी आपला उत्तर भारतीय विरोध म्हणजे तिरस्कार नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला.

2 डिसेंबरला त्यांनी कांदिवलीतील भुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचायतीला हजेरी लावली. तिथे त्यांनी मुंबईत येणाऱ्या लोंढ्यांना उत्तर भारतातील नेत्यांची निष्क्रियता कारणीभूत असल्याचं म्हटलं.

या भाषणात राज यांनी "महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध होणार असतील तर तिथे भूमिपुत्रांना पहिली संधी मिळाली पाहिजे, यात काय चुकीचं आहे? बिहारमध्ये उद्योग सुरू झाला तर तिथेही बिहारींना रोजगार मिळाला पाहिजे. राजेंद्र प्रसाद म्हणाले होते की, स्थानिक लोकांना त्यांच्या भागात काम मिळायला हवं. स्थानिकांचे रोजगार हिसकावले जाऊ नयेत. दिवंगत इंदिरा गांधींनाही हेच वाटत होतं. तर मी काय वेगळं सांगत आहे?

"पूर्वी दक्षिणेतून लोक मुंबईत यायचे. तिथे रोजगार निर्माण झाले. दक्षिणेतले लोंढे थांबले. देशाचे 70-80 टक्के पंतप्रधान उत्तर प्रदेशातून निवडून आले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांना विचारा की जर निवडून येण्यासाठी आमचा प्रदेश चालतो तर उद्योगांसाठी का नाही?" असं राज त्या सभेत म्हणाले होते.

काँग्रेसनं आघाडी करायचं नाकारलं तर काय?

2019च्या निवडणुकीत काँग्रेस शक्य तितक्या समविचारी पक्षांना सोबत घेताना दिसत आहे. शिवाय चंद्राबाबूंसारखे नवे मित्रही जोडत आहे.

मात्र मनसेचा विषय निघाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, "गेली काही वर्षं ते भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन बोलत आहेत. पण आम्ही त्यांच्याशी आघाडी करणार नाही. पण राष्ट्रवादीने जर मनसेला सोबत घेतलं, त्यांच्या कोट्यातून जर मनसेला जागा दिली, तर आम्ही काही करू शकत नाही. जसं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना आघाडीची ऑफर दिली आहे. पण MIMला आम्ही सोबत घेतलेलं नाही. हे तसंच आहे."

राहुलना निमंत्रण, मोदी-शहांना दूर ठेवलं?

Image copyright Twitter / Raj Thackeray
प्रतिमा मथळा राज ठाकरे यांचं 26 जानेवारीचं कार्टून

अमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण राज यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना दिलं. त्याच्या जाहीर बातम्याही आल्या. मात्र नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांना लग्नाचं निमंत्रण दिल्याचं वृत्त कुठेही आलं नाही.

त्याचं विश्लेषण करताना संतोष प्रधान सांगतात, "सगळ्यांची लढाई मोदींशी आहे. आता राज ठाकरे रोज जर त्यांची कार्टूनमधली टिंगलटवाळी करतायत आणि लग्नात जर स्वागत करताना दिसले तर कुंचला बोथट दिसेल. एकीकडे आघाडीत घुसण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे हे मोदींशी जवळीक हे बघून तुम्ही दोन दगडांवर पाय का ठेवता, असा अर्थ निघू शकतो."

आता पुढे काय?

महाराष्ट्रात राष्ट्रवादी मनसेला सोबत घेण्याच्या बाजूने आहे, तर काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन समाज पक्षाला ऑफर दिली आहे. आता निवडणुका जाहीर होण्यास दीड-एक महिन्याचा अवधी उरला आहे.

त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारिप बहुजन महासंघाचं काय होणार, याचं उत्तर मिळायला महिना बाकी आहे. त्यामुळेच लग्नाच्या निमित्ताने होत असलेल्या भेटींकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)