राहुल गांधींचं गरिबांना किमान वेतन देण्याचं आश्वासन प्रत्यक्षात येणार?-बीबीसी मराठी राउंडअप

Image copyright AFP

महत्त्वाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बीबीसी मराठी राउंडअप :

राहुल गांधींचं गरिबांना किमान वेतन देण्याचं आश्वासन प्रत्यक्षात येणार?

"2019 मध्ये काँग्रेसचा विजय झाला तर काँग्रेस सरकार मिनिमम इन्कम गॅरंटी म्हणजे किमान उत्त्पन्नाची हमी देईल. याचा अर्थ असा की भारतातल्या प्रत्येक गरीब व्यक्तीच्या बँक खात्यात एक निश्चित रक्कम किमान उत्त्पन्नाच्या रूपात सरकार देईल," अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रायपूर येथे झालेल्या किसान आभार संमेलनात केली.

राहुल गांधींची ही घोषणा प्रत्यक्षात येणं शक्य आहे की केवळ पोकळ आश्वासन हे अर्थतज्ज्ञ आणि विश्लेषकांकडून समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. गरीबांना खरंच किमान वेतन मिळू शकतं का हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वृत्त वाचा.

राज ठाकरे आणि अहमद पटेल यांच्या 'त्या' भेटीचा राजकीय अर्थ काय?

Image copyright AMIR KHAN

रविवारी राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचा विवाह मिताली बोरुडेसोबत झाला. लग्नाच्या धामधुमीतही राज ठाकरे विवाहस्थळापासून 11 किलोमीटरवर असलेल्या ताज महाल पॅलेसमध्ये पोहोचले. राज ठाकरे 10 मिनिटांनी बाहेर आले आणि पुन्हा सेंट रेजिसमध्ये लग्नकार्यात गुंतून गेले. पण दहा मिनिटांसाठी राज ताजमध्ये का आले होते? ते 10 मिनिटं कुणाला भेटले? याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल.

या व्यक्तीचं नाव आहे अहमद पटेल. खासदार आणि काँग्रेसचे कोषाध्यक्ष. राज यांनी राहुल गांधी यांना अमितच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. प्रत्यक्षात गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असणारे आणि सोनियांचे विश्वासू असलेले अहमद पटेल स्वत: या सोहळ्याला उपस्थितही राहिले.

या लग्नाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी काँग्रेसशी आघाडीचे संकेत दिले आहेत का? ही वेडिंग डिप्लोमसी नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार का? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी हे वृत्त वाचा.

हार्दिक पंड्या टीम इंडियासाठी इतका महत्त्वाचा का?

Image copyright Getty Images

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत अष्टपैलू हार्दिक पंड्याने पुनरागमन केलं. एका टीव्ही शो दरम्यान महिलांसंदर्भात आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी हार्दिकवर बीसीसीआयने बंदी घातली होती. मात्र प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत बीसीसीआयने ही बंदी उठवली आणि तो हार्दिक न्यूझीलंडला रवाना झाला.

जेटलॅगची तक्रार न करता हार्दिक तिसऱ्या वनडेत संघाचा भाग झाला. केन विल्यमसनचा अफलातून झेल टिपत हार्दिकने आपली छाप उमटवली. विवाद होऊनही भारतीय संघाला हार्दिकचीच गरज का भासली हे जाणून घेण्यासाठी सविस्तर रिपोर्ट वाचा.

थिमक्कांना पद्म पुरस्कार : झाडं लावत सुटलेल्या 'वृक्षमाते'ची भेट

Image copyright FACEBOOK/UMESH VANASIRI

'थिमक्का या तुमकूर जिल्ह्यातल्या मुळच्या हुलिकल गावच्या. 106 वर्षांच्या आजीबाई. हुलिकलजवळ त्यांनी साधारण 70 वर्षांपूर्वी वडाची 384 झाडं लावली आहेत. त्यानंतर या बाई गेली अनेक वर्षं अक्षरशः झाडं लावत सुटल्या आहेत म्हणून मुंबईवरून बंगळुरू नामसंद्रा अशी मजल मारत मी त्यांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो होतो.'

थिमक्कांना परवा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. थिमक्कांचं काम प्रत्यक्ष पाहताना आलेले अनुभव बीबीसी मराठीचे प्रतिनिधी ओंकार करंबळेकर यांनी मांडले आहेत. त्यांचा सविस्तर रिपोर्ट.

व्हेनेझुएलामध्ये पेटलेल्या संघर्षामागे आहेत ही 7 महत्त्वाची कारणं

Image copyright Reuters

मोठ्या प्रमाणावर झालेली चलनवाढ, वीज कपात, अन्न आणि औषधांचा तुटवडा याचीच परिणती व्हेनेझुएलामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यामध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनामध्ये 26 लोक मारले गेले. संयुक्त राष्ट्रांनी ही परिस्थिती अजूनच चिघळेल असा इशाराही दिला आहे.

व्हेनेझुएलातील 30 लाखांहून अधिक लोक गेल्या काही वर्षांत आपला देश सोडून निघून गेले आहेत. उपासमार, आरोग्यसुविधांचा अभाव, वाढती बेरोजगारी आणि गुन्हेगारी यांमुळे या लोकांनी आपला देश सोडण्याचा निर्णय घेतला.

व्हेनेझुएलामध्ये ही परिस्थिती नेमकी कशी ओढावली, सध्या तिथं काय सुरू आहे यापेक्षाही ते कसं सुरू झालं यामागची सात कारणं सविस्तर वाचा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)