शिवसेनेला भाजपने सन्मानजनक प्रस्ताव दिला तर युतीचा विचार - संजय राऊत #5मोठ्याबातम्या

संजय राऊत Image copyright Getty Images/HT
प्रतिमा मथळा संजय राऊत

आजची दैनिकं आणि वेबसाइट्सवरील 5 महत्त्वाच्या बातम्या अशा :

1. सन्मानजनक प्रस्ताव आल्यास युतीचा विचार करू- संजय राऊत

महाराष्ट्रात शिवसेनाचा मोठा भाऊ राहील. भाजपकडून आम्हाला सन्मानजनक प्रस्ताव आला तर युतीचा विचार करू, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले, हे वृत्त झी न्यूजनं दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, आगामी निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, महाराष्ट्रात शिवसेना कायमच मोठा भाऊ राहील. हा मोठा भाऊ दिल्लीचे तख्त गदागदा हलवेल. मात्र, भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास शिवसेना युतीसंदर्भात नक्की विचार करेल.

2. सिद्धारामय्या महिलेवर चिडले, व्हीडियो व्हायरल

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आमदार मुलाविरुद्ध तक्रार घेऊन आलेल्या एका महिलेवर चिडले आणि ओरडले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सिद्धरामय्या

काही लोकांनी या घटनेचं चित्रण केलं. सिद्धरामय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. सिद्धारमय्या यांची काही चुकी नव्हती माझीच चुकी होती असं स्पष्टीकरण महिलेनं दिलं आहे. ही बातमी द हिंदूने दिली आहे.

3. विम्याची रक्कम मिळण्यासाठी RSS कार्यकर्त्यावर हत्येचा आरोप

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्याच्या कुमेड गावात 23 जानेवारीला झालेल्या कथित आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेशातलं राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. आरएसएस कार्यकर्त्यानेच विम्याची 20 लाखांची रक्कम मिळवण्यासाठी आपल्या मृत्यूचा बनाव केल्याचा संशय आहे. यासाठी त्याने आपल्याच कर्मचाऱ्याची हत्या केली आणि आपला मृत्यू झाला आहे हे दाखवण्यासाठी मृतदेहाला आपले कपडे घातले आणि सामान आजुबाजूला पसरवून ठेवलं.

आरोपीने मृतदेहाचे कपडे बदलले असले तरी त्याची अंतर्वस्त्रे बदलली नाही. यामुळेच त्याच्या पत्नीने मृतदेहाची ओळख पटवली. आरएसएस कार्यकर्त्याच्या हत्येनंतर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. भाजपाने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यभरात निदर्शनं केली होती. ही बातमी नवभारत टाइम्सनं दिली आहे.

4. योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाची बैठक प्रयागराजला घेणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज मंत्रिमंडळाची बैठक प्रयागराज येथे घेणार आहेत. योगी आदित्यनाथ हे बैठकीनंतर स्नान करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ही बातमी एनडीटीव्हीनं दिली आहे.

प्रतिमा मथळा फाइल फोटो

मंत्रिमंडळाची बैठक नेहमी लखनौला होते पण आज ही बैठक प्रयागराजला होणार आहे. या बैठकीसाठी सर्व मंत्री प्रयागराजलाच येतील.

5. सद्सद्विवेकबुद्धी असलेला कुणीही किमान वेतनाला विरोध करणार नाही - चिदंबरम

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ता आल्यास देशातील प्रत्येक गरीबाला किमान वेतन देऊ अशी घोषणा केली. भाजपने या घोषणेवर टीका केली आहे. पी चिंदबरम यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही एक ऐतिहासिक घोषणा असल्याचं म्हटलं आहे.

पी. चिदंबरम सध्या 2019 लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचं नेतृत्व करत आहेत. "देशातील गरीबाला किमान वेतन मिळालं पाहिजे आणि ती वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं," असं पी चिदंबरम यांनी सांगितलं आहे. सद्सद्विवेकबुद्धी असलेला कुणीही किमान वेतनाला विरोध करणार नाही असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)