जॉर्ज फर्नांडिस : देशद्रोहाचा गुन्हा ते देशाचा संरक्षणमंत्री झालेला नेता

जॉर्ज फर्नांडिस Image copyright The India Today Group/getty

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज निधन झाले. त्यांचं वय 88 होतं.

फर्नांडिस काही महिने अल्झायमरने आजारी होते. राज्यसभेमध्ये 2009 ते 2010 या काळात त्यांनी शेवटचं सदस्यत्व भूषवलं होतं.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या NDA सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते.

त्यांच्या नातेवाईक डोना फर्नांडिस यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. "त्यांना फ्लुचा त्रास होत होता. त्यांची प्रकृती सुधारणाही झाली होती. पण पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला."

कामगार नेता म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. जॉर्ज फर्नांडिस यांचं वर्णन 'बंद सम्राट' असं लोकसत्ताचे पत्रकार अशोक पडबिद्री यांनी केलं होतं.

Image copyright WWW.GEORGEFERNANDES.ORG

आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस महत्त्वाचे नेते म्हणून पुढं आले होते. समजावादी विचारांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. आणीबाणीनंतर त्यांनी मी सतत विरोधात राहणार, अशी भूमिका मांडली होती. आणीबाणीच्या काळात बडोदा इथं एका स्फोटासंदर्भात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला होता.

जनता सरकारमध्ये उद्योगमंत्री म्हणून त्यांनी कोकाकोला आणि आयबीएम या कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

1994ला त्यांनी समता पक्षाची स्थापना केली होती. 1998मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये ते सहभागी झाले होते. त्याकाळात त्यांची भूमिका संकटमोचक म्हणून त्यांची भूमिका राहिली होती. भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांना त्यांनी तिलांजली दिली, अशी टीका ही त्यांच्यावर झाली होती. भारतात दोन प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे सर्वसामान्य आणि दुसरे म्हणजे धर्मनिरपेक्ष. मी सर्वसामान्य आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

'लोकशाहीचा खंदा समर्थक'

जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे लोकशाहीचा खंदा समर्थक हरपला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली आहे.

कामगार नेता हरपला - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. "जेव्हा आपण त्यांची आठवण काढतो तेव्हा तेव्हा आपल्याला कामगार नेत्याची आठवण येते. रेल्वे मंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं होत."

लोकशाहीसाठी समर्पित नेता - नितीन गडकरी

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, " जॉर्ज फर्नांडिस यांनी आपलं जीवन देशासाठी, लोकशाहीसाठी समर्पित केलं होतं. समाजवादी आंदोलनातून त्यांचं नेतृत्व उभं राहिलं होतं. ते प्रखर राष्ट्रभक्तही होते. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या जाण्यानं आपण एक मोठा नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याचं मलाही खूप दुःख आहे."

दूरदृष्टीचा नेता - देवेंद्र फडणवीस

फर्नांडिस यांच्या निधनाने दृष्टी असलेल्या आणि समर्पित जीवन जगणाऱ्या नेत्याला आपण मुकलो आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. कायमस्वरूपी लोकांच्या स्मृतीत राहतील, असे ते नेते आहेत, असं ते म्हणाले.

मुंबईतील कामगारांसाठी कष्ट - कपिल पाटील

आमदार कपिल पाटील म्हणाले, "जॉर्ज फर्नांडिस हे देशातील विशेषतः मुंबईतल्या कामगारांसाठी झिजले. त्यांच्या निधनानं समाजवादी चळवळीतला एक महत्त्वाचा नेता हरवला आहे. त्यांनी कामगारांसाठी केलेलं बहुतांश जणांना माहीत आहे. मात्र त्यांचं एक विशेष योगदान आहे. मुंबई महानगरपालिकेत मराठी भाषेतून कामकाज सुरू करण्याचं श्रेय जॉर्ज फर्नांडिस यांना जातं. फर्नांडिस यांचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा कामगारांशी थेट संबंध होता. ते कधीच थेट व्यासपीठावरून बोलले नाहीत. कितीही मोठी सभा असो ते गर्दीतून कामगारांशी बोलत बोलत व्यासपीठावर यायचे. जॉर्ज फर्नांडिस यांनी कामगारांना जे दिलं, ते मुंबईतले कामगार कधीच विसरणार नाहीत." 

कामगार विश्वाचं नुकसान - शशांक राव

"जॉर्ज फर्नांडिस यांच्या जाण्यानं कामगार विश्वाचं खूप मोठं नुकसान झालं आहे.  माझे वडील शरद राव यांच्यामुळं माझा त्यांच्याशी संबंध आला. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. दिल्लीला मी वडिलांसोबत मीटिंग्जना जायचो, तेव्हा त्यांची भेट व्हायची. त्यांची भाषणंही मी खूप ऐकली आहेत. जॉर्ज फर्नांडिस लोकांमध्ये-कामगारांमध्ये थेट मिसळायचे. तेच त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य होतं," कामगार नेते शशांक राव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं. 

बेडर नेता हरपला - संजय राऊत

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, "जॉर्ज फर्नांडिस हे असं व्यक्तिमत्त्व होतं की त्यांच्याविषयी राजकीय पक्ष असोत की सामान्य लोक सर्वांनाच एकप्रकारचं आकर्षण वाटायचं. जे आकर्षण बाळासाहेब ठाकरेंबद्दल होतं, अटलबिहारी वाजपेयींबद्दल होतं तसंच आकर्षण जॉर्ज यांच्याबद्दलही होतं. आज बाळासाहेब हयात नाहीत, वाजपेयीही नाहीत. जॉर्ज फर्नांडिस यांच्या जाण्यामुळं या पिढीतला हा दुवाही निसटला."

ठाकरे चित्रपट काढत असतानाच मी जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरही चित्रपट काढण्याची घोषणा केली होती. त्याचं कारण हेच होतं. ही व्यक्तिमत्त्वं देशात पुन्हा निर्माण होणार नाहीत. बाळासाहेब असतील किंवा जॉर्ज, त्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला पटत नसतील. पण देशातील अनेक भूमिकांना त्यांनी जे वळण दिलं, ते नक्कीच महत्त्वाचं होतं, असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)