जॉर्ज फर्नांडिस: बाळासाहेब ठाकरेंच्या आधी 'मुंबई बंद' करू शकणारा नेता

जॉर्ज फ़र्नांडिस Image copyright ARKO DATTA/AFP/Getty Images

शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे जेव्हा मुंबई बंदचं आव्हान करत, तेव्हा मुंबई ठप्प होत असे. पण शिवसेनेच्या आधी एक नेता पूर्ण मुंबई बंद करू शकत होता. जॉर्ज फर्नांडिस.

फर्नांडिस आणि बंद हे नातं इतकं अतूट होतं की त्यांना 'बंद सम्राट' असंच म्हटलं जायचं.

राष्ट्रीय स्तरावर जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते स. का. पाटील यांचा 1967साली लोकसभा निवडणुकीत पराभव केला. तेव्हापासून त्यांची ओळख 'जायंट किलर' अशी बनली.

स. का. पाटील हे तेव्हाचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जात. 'देव सुद्धा मला हरवू शकणार नाही' हे त्यांचे तेव्हाचे उद्गार प्रसिद्ध आहेत. जॉर्ज फर्नांडिसचे निकटवर्तीय आणि ज्येष्ठ पत्रकार विक्रम राव याबाबतची एक आठवण सांगतात, "मी स. का. पाटील यांना विचारलं की तुम्ही तर मुंबईचे अनिभिषिक्त सम्राट आहात. पण असं ऐकलं आहे की कोणी नगरसेवक तुमच्या विरोधात निवडणूक लढत आहे. त्याचं नाव जॉर्ज फर्नांडिस आहे."

"त्यावेळी चिडून स. का. पाटील यांनी म्हटलं की कोण जॉर्ज फर्नांडिस. तो मला कसं हरवू शकणार? देव जरी आला तरी मला कुणी हरवू शकणार नाही."

विक्रम राव सांगतात, "दुसऱ्या दिवशीच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांची हेडलाईन हीच होती. पाटील म्हणतात देव आला तरी मला हरवू शकणार नाही. त्यांच्या या हेडलाइनला फर्नांडिस यांनी पोस्टर लावून उत्तर दिलं. फर्नांडिस यांचं पोस्टर असं होतं की, पाटील म्हणतात मला देव सुद्धा हरवू शकणार नाही, पण तुम्ही (जनता) त्यांना हरवू शकता."

Image copyright www.georgefernandes.org

ही मात्रा जनतेला योग्यरीत्या लागू झाली. जॉर्ज फर्नांडिस हे 42 हजार मताधिक्याने निवडून आले. पाटील यांचा अस्त हा जॉर्ज फर्नांडिस यांचा उदय ठरला.

बंद सम्राट जॉर्ज फर्नांडिस

कर्नाटकात धार्मिक कॅथॉलिक कुटुंबात त्यांचा जन्म 1930 साली झाला. त्यांनी धर्मोपदेशक बनावं, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती, असं त्यांनी ईटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. पण ते न पटल्यामुळे ते 1949 साली नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेव्हा ते 19 वर्षांचे होते.

मुंबईत काम करता करता ते युनियन लीडर्सच्या संपर्कात आले. त्यांच्यातल्या वक्तृत्व आणि नेतृत्व गुणांमुळे ते अल्पावधीत कामगारांचे नेते झाले.

"जॉर्ज फर्नांडिस यांचं 'बंद सम्राट' अलं लोकसत्ताचे पत्रकार अशोक पडबिद्री यांनी वर्णन केलं होतं. मुंबई महापालिका, बेस्ट, हॉटेल वर्कर्स, फेरीवाले यांच्या संघटनेचा ते नेता बनले. त्यांच्या मागण्यांसाठी ते बंद पुकारत, म्हणून त्यांना बंद सम्राट अशी पदवी देण्यात आली होती," असं ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

रेल्वेच्या रुळांवर आडवे पडले...

फर्नांडिस हे ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांनी 1974ला रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला होता. त्यांच्या संपाबाबतची आठवण तांबे सांगतात, "देशव्यापी रेल्वे संपाचे ते नेते होते. त्यापूर्वी आणि त्यानंतर असा संप झाला नाही. संपाची सुरुवात मुंबईतून होती. दादर स्टेशनवर जॉर्ज रेल्वेगाडी पुढे सत्याग्रह करणार होते. दादर स्टेशनभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. जॉर्ज किंवा युनियनचा एकही कार्यकर्ता स्टेशनात शिरू शकत नव्हता. जॉर्ज व्हीटीहून रेल्वेगाडीतूनच दादर स्टेशनला आला आणि रुळांवर आडवा पडले. SRPने त्यांच्यावर लाठ्यांचा वर्षाव केला."

या संपात फक्त रेल्वेचेच कर्मचारी नाही, तर टॅक्सी ड्रायव्हर, इलेक्ट्रिसिटी युनियन आणि वाहतूक संघटनेचे कामगार सहभागी झाले. सरकारनं संपात सामील होणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. फर्नांडिस यांना अटक झाली. त्याचबरोबर अंदाजे 30,000 जणांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं, असं अॅम्नेस्टी इंटरनॅशनलनं म्हटलं होतं. इंदिरा गांधी यांच्या प्रशासनाने हे आंदोलन चिरडलं.

विक्रम राव त्यांची आणीबाणीच्या काळातील आठवण सांगतात. "1975 ला जेव्हा आणीबाणी घोषित झाली हे त्यांना भुवनेश्वरला असताना कळलं. तिथून ते कारने दिल्लीला थेट माझ्याकडे आले. तिथून ते बडोद्याला गेले. दीड महिन्यानंतर माझ्याकडे एक सरदारजी आले. जॉर्ज यांनी चोख वेषांतर केलं होतं, पण मी लगेच ओळखलं. मी त्यांना म्हटलं जॉर्ज तू छान दिसत आहेस. तेव्हा ते म्हणाले, माझ्याच देशात मीच शरणार्थी झालो आहे. नंतर ते कलकत्त्याला गेले. तिथंच त्यांना अटक झाली. तिथून त्यांना दिल्लीला आणलं."

आणीबाणी, उदय आणि अस्त

1977ला ते तुरुंगात होते. 1977 ला ते तुरुंगातच होते. त्याचवेळी निवडणुकांची घोषणा झाली. तुरुंगातूनच त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मुझफ्फरपूरहून ते निवडून आले. त्याच वेळी त्यांना हे कळलं की इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून पडल्या आहेत. त्यावेळी तुरुंगात दिवाळीसारखं वातावरण होतं, असं राव सांगतात. नंतर ते जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री बनले.

पूर्ण राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेसला विरोध केला. स्वतः डाव्या विचारांचे असूनही त्यांनी उजव्या विचारांच्या भाजपसोबत हातमिळवणी केली. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात पुढे ते संरक्षण मंत्री झाले.

तहलका या वेबसाईटने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे फर्नांडिस यांना राजीनामा द्यावा लागला होता. फर्नांडिस यांच्या समता पार्टीच्या अध्यक्ष जया जेटली या स्टिंग ऑपरेशनमध्ये कथित शस्त्रास्त्र दलालांशी बोलताना दिसल्या होत्या.

गेल्या दशकात फर्नांडिस अल्झायमर आणि पार्किन्सन्स या आजारांनी ग्रस्त असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांनी दिल्या होत्या. या काळात ते सार्वजनिक जीवनापासून दूर होते.

(बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी रेहान फजल यांच्या लेखातील काही अंश घेण्यात आला आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)