जॉर्ज फर्नांडिस आणि जया जेटलींमध्ये नक्की काय नातं होतं?

जॉर्ज फर्नांडिस आणि जया जेटली Image copyright Getty Images

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर अनेक वर्षं राहिलेल्या जया जेटली असोत की मग माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोर बराच काळ व्यतित केलेल्या राजकुमारी कौल असोत, अशा नातेसंबंधावर मौन का बाळगलं जातं?

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

"मी जया जेटली यांच्याबाबत विचार करतेय. आपण ज्या जगात राहतो तिथे फार अन्याय होतो. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो."

जया जेटली यांना हिंमत मिळो, जेव्हा संपूर्ण कुटुंब जॉर्जना सोडून गेलं तेव्हा जया यांनी जॉर्ज यांची काळजी घेतली, त्यांच्यावर प्रेम केलं."

"जॉर्ज फर्नांडिस यांच्या एका आवाहनावर पूर्ण भारतीय रेल्वेचं काम थांबत असे. ते आता आपल्यात नाहीत. त्यांच्याबरोबर दीर्घकाळ घालवलेल्या जया जेटलींचा मी विचार करतेय"

माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर जया जेटली यांच्यासाठी ट्विटरवर हे संदेश लिहिले जात आहेत. पत्रकारही जॉर्ज फर्नांडिस यांच्या अंत्यसंस्काराची माहिती जया जेटली यांनाच विचारत आहेत.

जया जेटली आणि जॉर्ज फर्नांडिस आपलं नातं मैत्रीचं असल्याचं सांगायचे. जया जेटली बराच काळ जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबर एकत्र राहिल्या. त्याला सामान्यपणे 'लिव्ह इन रिलेशनशिप' असं म्हटलं जातं.

मात्र 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये होते म्हणून जनतेने त्यांना नाकारलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे या नेत्यांनीही हे सत्य कधी लपवलं नाही.

Image copyright Twitter

बीबीसीशी बोलताना जया जेटली त्यांच्या नातेसंबंधांबद्दल बोलताना म्हणाल्या, "अनेक प्रकारचे मित्रमैत्रिणी असतात आणि मैत्रीचेही विविध स्तर असतात. महिलांना एक प्रकारच्या बौद्धिक सन्मानाची गरज असते. आपल्या पुरुषप्रधान समाजात अनेकांना असं वाटतं की, महिला डोक्याने आणि शरीराने कमकुवत असतात. जॉर्ज फक्त असे होते ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि महिलांनाही राजकीय विचार असू शकतात हे मान्य केलं."

राजकीय काम करता करता ही मैत्री आणखी दृढ होत गेली. जया जेटली त्यांचे पती अशोक जेटली यांच्यापासून विभक्त झाल्या. जॉर्ज फर्नांडिसही पत्नी लैला यांच्यापासून विभक्त झाले. 1980 च्या दशकात जॉर्ज आणि जया एकत्र राहू लागले.

जया यांच्या मते त्यांच्या आणि जॉर्ज यांच्या नात्यात प्रेमाचा भाग नव्हता. लोक काहीबाही बोलायचे. राजकारण म्हणजे फुलांचा बिछाना नाही. तुमचा बिछाना कोणीतरी येऊन व्यवस्थित करेल याची वाट पाहू नको, असं जॉर्ज सांगायचे.

जॉर्ज यांच्याबरोबर राहणं हा जया यांचा निर्णय होता. जास्त अवघड वाटू लागलं तर त्या सोडून जायला मोकळ्या आहेत असं जॉर्ज त्यांना नेहमी सांगायचे.

30 वर्षांआधी लिव्ह इन रिलेशनशिप या विषयावर खुली चर्चाही होत नव्हती. मोकळेपणाने विचारही होत नव्हता. सुप्रीम कोर्टाने या विषयावर घरगुती हिंसाचाराच्या कायद्याखाली मान्यताही दिली नव्हती.

आता कायद्याच्या नजरेने पाहिलं तर बराच काळ एकत्र राहिलेल्या स्त्री आणि पुरुषाला विवाहित मानण्यात येतं. या जोडप्याला जर मूल झालं तर कायदेशीर मानण्यात येतं. अशा नातेसंबंधांच्या आधारावर ती बाई घरगुती हिंसाचाराच्या विरोधात तक्रार करू शकते.

Image copyright Twitter

आधी ही परिस्थिती नव्हती. तेव्हा हे दोन्ही नेते उच्चपदावर होते. जॉर्ज फर्नांडिस संरक्षण मंत्री होते आणि जया जेटली समता पार्टीत होत्या.

लेखिका आणि स्तंभलेखिका शोभा डे म्हणतात की, "जया जेटली आणि जॉर्ज फर्नांडिस हे केवळ समता पार्टीत एकत्र काम करणारे सहकाही नव्हते. त्यांच्यामधील नातं हे समाजवादी विचारसरणीवर आधारित नव्हतं. त्यांचे ऋणानुबंध सलोख्याचे होते. ते जगजाहीर होते. त्यांनी ते कधी लपवण्याचा प्रयत्नही केला नाही."

राजकारणासारख्या जनहितासारख्या कामाशी निगडीत लोक अशा बाबतीत स्वच्छ प्रतिमा ठेवू इच्छितात.

अमेरिकेच्या राजकारणात नवरा बायको आणि मुलांबरोबर संपूर्ण परिवार असणं एखाद्या नेत्यासाठी फायदेशीर मानलं जातं. आपल्या प्रचारातही ते या बाबीचा वापर करतात.

Image copyright Twitte

भारतीय समाजात कुटुंब व्यवस्थेचं मोठं महत्त्व आहे. म्हणूनच 'लिव्ह इन रिलेशनशिप'ला दुय्यम समजलं जातं. पण राजकारणी दोन्ही आघाड्यांवर वाटचाल करतात. आणि अशा नेत्यांना जनतेनंही नाकारलेलं नाही.

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि अभिनेत्री राधिका कुमारस्वामी यांच्यातील कथित नातेसंबंध चर्चेत आहेत. व्हॉट्सअपवरील विनोद, कोपरखळ्यांमध्ये हाच विषय असतो.

एच.डी. कुमारस्वामी यांनी सार्वजनिक पातळीवर कधीही राधिका कुमारस्वामी यांची ओळख पत्नी म्हणून करून दिलेली नाही. परंतु त्यांनी हे नातं नाकारलेलं नाही.

आजीवन अविवाहित राहणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी आणि राजकुमारी कौल यांच्यातील नातेसंबंध कायम चर्चेत होते. मात्र वाजपेयी यांनी कधीही या नात्याबद्दल जाहीरपणे काही सांगितलं नाही.

दोघेही ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध व्हिक्टोरिया महाविद्यालयाचे (राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय) विद्यार्थी होते. त्यानंतर राजकुमारी कौल आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे ऋणानुबंध अधिक गहिरे होत गेले.

वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले, त्यावेळी श्रीमती कौल त्यांच्याच घरी म्हणजेच पंतप्रधानांच्या 7 रेसकोर्स या निवासस्थानी राहू लागल्या. श्रीमती कौल यांना दोन मुली आहेत. त्यापैकी नमिताला अटलजींनी दत्तक घेतलं होतं.

"मला किंवा अटल बिहारी वाजपेयी यांना आमच्या नात्याविषयी कोणाला स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं नाही" असं सैवी पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत कौल यांनी सांगितलं.

सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत राजकारण्यांच्या खाजगी आयुष्यासाठी मापदंड वेगळे असतात का? त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणताही प्रश्न न विचारणं हे त्या नेत्याचा सन्मान करण्यासारखं आहे का? स्वत:च्याच समस्या-अडचणी आणि व्यथांमध्ये गुरफटलेल्या सामान्य माणसाला राजकारण्यांच्या खाजगी आयुष्याशी काही देणंघेणं नाही का? हे प्रश्न असतात.

2010 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्या पत्नी लैला कबीर यांनी जया जेटलींना जॉर्ज यांच्याशी भेटण्यास मनाई केली होती हे फार कमी लोकांना ठाऊक असेल.

2008 मध्येच जॉर्ज यांना स्मृतीभ्रंशाचा आजार झाला होता. ते माणसांना जेमतेमच ओळखू शकत.

प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर 2014 मध्ये जया जेटली यांना दर पंधरा दिवसांनंतर 15 मिनिटांसाठी जॉर्ज यांना भेटण्याची परवानगी मिळाली.

जीवन वळणवाटांनी भरलेलं असतं. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जया जेटली म्हणाल्या, "जॉर्ज यांच्या निधनाची बातमी लैला यांनीच सांगितली आणि त्यांनीच मला घरी बोलावून घेतलं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)