नयनतारा सहगल म्हणतात, 'अशा काळात मौन बाळगणं धोक्याचं आहे' - बीबीसी मराठी राउंड अप

नयनतारा सहगल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नयनतारा सहगल

बीबीसी मराठीवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा राऊंडअप असा

फिल्म इंडस्ट्री स्वातंत्र्यावर येणाऱ्या बंधनांविषयी काही बोलत का नाही? असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांनी काल मुंबईत केलं.

सहगल यांच्या सन्मानार्थ मंगळवारी महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींनी दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात इथे 'चला, एकत्र येऊ या' या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी देशातल्या सध्याच्या परिस्थितीचं वर्णन करताना आपल्याला मुलांच्या भवितव्याविषयी चिंता वाटत असल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर शाह यांच्यावर टीका झाली, पण त्यांच्या बाजूनं कुणी उभं का राहिलं नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

"काही लोक जरूर बोलले असतील. पण पूर्ण इंडस्ट्रीनं भाष्य केलेलं नाही," असं सहगल यांनी नमूद केलं. "मी जेव्हा नसिरुद्दीन शाह यांचा आवाज ऐकला, तेव्हा मला वाटलं कोणी मोठा फिल्मस्टार यावर का बोलत नाही, त्यांनी हा आवाज ऐकला नाही का? ते याबाबतीत चूपचाप राहिले. पण इतरांच्या आवाजासाठी ते नाचगाणं करत होते," अशी टीका सहगल यांनी केली. सहगल यांनी

स्वातंत्र्यपूर्व काळातल्या दिवसांतली एक आठवणही सांगितलं. त्या काळात आझादी हा शब्द फिल्ममध्ये वापरण्यासही मनाई होती. तेव्हा लोक वेगवेगळ्या कल्पना लढवत आणि तो शब्द सेन्सॉरमधून पास होत असे अशी आठवण सांगताना 'नया संसार' चित्रपटातल्या गाण्याचा उल्लेख केला.

यवतमाळमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आलं होतं. पण आयोजकांनी ते आमंत्रण नंतर मागे घेतलं. आपण भाषणात हिंदुत्ववादींविरोधात भूमिका घेतल्यामुळंच असं झालं असा दावा सहगल यांनी केला होता.

त्यावेळी साहित्यप्रेमींनी सहगल यांचा अपमान झाल्याची खंत व्यक्त केली होती. या घटनेबाबत सहगल यांची माफी मागून मराठी मंचावर त्यांचं स्वागत करण्याच्या उद्देशानं काही साहित्यिक आणि कलाकार मुंबईत एकत्र आले, आणि त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

या कार्यक्रमाला पुष्पा भावे, डॉ गणेश देवी, जयंत पवार, प्रज्ञा दया पवार, अतुल पेठे, किशोर कदम, अमोल पालेकर, सुनील शानभाग, चंद्रकांत कुलकर्णी, येशू पाटील, टी.एम. कृष्णा, सिद्धार्थ वरदराजन, संध्या नरे पवार, समीना दलवाई, गणेश विसपुते, संजीव खांडेकर, सुबोध मोरे आदी लेखक, कवी, कलावंत, विचारवंत उपस्थित होते. सहगल यांनी आपल्याला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल महाराष्ट्रातील साहित्यिकांचे आभार मानले.

"मी ऐकलं आहे की माझ्या भाषणाचं मराठी रूपांतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावांत वाचलं गेलं आहे. मला खूप काही बोलायचं आहे पण एकच शब्द मनात येतो. खूप खूप आभार. हे आश्चर्य आहे कि असं दुसरीकडे कुठे झालेलं नाही. त्यामुळं मला म्हणावंसं वाटतं, जय महाराष्ट्र. "

"We are living in a very dangerous time. अशा काळात मौन बाळगणं धोक्याचं आहे. कारण आपण गप्प बसलो तर एक असं राज्य येईल जे आपल्याला हिंदू राष्ट्र बनवू इच्छितं. आपण अनादी काळापासून कधीच केवळ 'हिंदू राष्ट्र' नव्हतो." असा हल्ला सहगल यांनी चढवला आहे. "आपण सर्वजण हिंदू नाही, पण आपण सर्व हिंदूस्थानी आहोत, ती हिंदुस्थानियत आम्ही सोडणार नाही, काहीही झालं तरी."

शिवसेना-भाजप युतीची चर्चा: महाराष्ट्रात कोण मोठा भाऊ, कोण छोटा भाऊ?

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसं महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीचं काय होणार? याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याने युतीसमोरही एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.

Image copyright Getty Images

मात्र गेल्या 4 वर्षातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्या, कार्यकर्त्यांमधील संघर्ष, मानापमान आणि इगो यामुळे निवडणुकीआधीचं मनोमिलन ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. युती होणार का? झाल्यास मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण असेल? या प्रश्नांची सविस्तर उत्तरं शोधणारं विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

जॉर्ज फर्नांडिस: बाळासाहेब ठाकरेंच्या आधी 'मुंबई बंद' करू शकणारा नेता

Image copyright GEORGE FERNANDES/FACEBOOK

शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे जेव्हा मुंबई बंदचं आव्हान करत, तेव्हा मुंबई ठप्प होत असे. पण शिवसेनेच्या आधी एक नेता पूर्ण मुंबई बंद करू शकत होता. जॉर्ज फर्नांडिस. फर्नांडिस आणि बंद हे नातं इतकं अतूट होतं की त्यांना 'बंद सम्राट' असंच म्हटलं जायचं.

कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जॉर्ज यांनी १९७४ साली कामगारांचा सर्वांत मोठा बंद घडवून आणला होता. कामगार चळवळीतून पुढे येत देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंतचा जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रवास कसा होता हे इथे वाचा.

महाराष्ट्र दुष्काळ: निवडणुकीआधी केंद्राकडून 4 हजार 714 कोटी रुपयांची मदत

महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करुन तीन महिने उलटल्यानंतर केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 714 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण फंडातून हा पैसा देण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यावर आल्या असताना घेतलेल्या या निर्णयाला वेगळं राजकीय मत असल्याचं विश्लेषक सांगतात. दुष्काळनिधीमागची राजकीय गणितं समजावून सांगणारा रिपोर्ट सविस्तर वाचा.

प्रियंका गांधी यांच्या 'दारुच्या नशेतील' व्हीडिओमागचं सत्य काय?

सोशल मीडियावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा एक व्हीडिओ शेयर केला जात आहे. या व्हीडिओच्या आधारे लोक प्रियंका गांधी दारुच्या नशेत धुंद असल्याचा आरोप करत आहेत. 10 सेकंदाच्या या व्हीडिओत प्रियंका गांधी मीडियातल्या लोकांवर रागवताना दिसून येत आहेत.

Image copyright Getty Images

I am with Yogi Adityanath, राजपूत सेना आणि Modi Mission 2019 यांसारखे काही फेसबुक पेज आणि ग्रुप्सवर हा व्हीडिओ शंभरदा शेयर करण्यात आला आहे. "प्रियंका यांनी दारुच्या नशेत मीडिया प्रतिनिधींशी गैरवर्तणूक केली," असा दावा हा व्हीडिओ शेयर करताना लोकांनी केला आहे. या दाव्यामागंचं नेमकं सत्य काय आहे, याची पडताळणी करणारा रिपोर्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)