प्रकाश आंबेडकरांची साथ काँग्रेस-राष्ट्रवादीला तारणार का?

वंचित आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस Image copyright Getty Images

गांधीजयंती अर्थात 2 ऑक्टोबर 2018. राज्याच्या राजकारणातलं धगधगतं केंद्र असलेल्या औरंगाबादच्या जबिंदा लॉन्सवर हजारोंची गर्दी जमलेली. भर दुपारच्या टळटळीत उन्हातल्या या सभेला झालेली गर्दी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांना धोक्याची सूचना देणारी होती.

सभेचं निमित्त होतं- भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अर्थात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन या पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी युतीची घोषणा केली.

या दोघांच्या निमित्ताने दलित आणि मुस्लिम प्रवाह एकत्र पाहायला मिळाले. पण आता भाजप-शिवसेना यांना काटशह देण्यासाठी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीने भारिपबरोबर जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

निळा झेंडा काँग्रेस-राष्ट्रवादीला पूरक

"प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने लढल्यास त्यांना निळा झेंडा प्राप्त होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तूर्तास निळ्या झेंड्याचं प्रतिनिधित्व नाही. रा. सु. गवई आणि जोगेंदर कवाडे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाचा बाज वेगळा आहे. त्यांनी स्वत:च्या पक्षाची ओळख दलित संकल्पनेपुरती मर्यादित ठेवलेली नाही. बहुजन समाज, दलित, मुस्लिम तसंच मारवाडी समाजाला त्यांनी सामील करून घेतलं आहे," असं ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांनी सांगितलं.

जर हे पक्ष एकत्र आले तर काय होऊ शकतं याबाबत ते सांगतात,

"अकोला नगरपरिषदेत त्यांनी निवडणूक जिंकत पहिल्यांदा ठसा उमटवला. मात्र हे प्रारुप अन्यत्र प्रभावी ठरलं नाही. यवतमाळ, नांदेड, अकोला आणि बुलडाणा हे प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव असलेलं क्षेत्र आहे. त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होईल.

दलित आणि मुस्लिम ही काँग्रेसची पारंपरिक व्होटबँक आहे. भारिप-एमआयएम यांनीही याच व्होटबँकेला लक्ष्य केलं आहे. या मतांची विभागणी झाली तर भाजप-शिवसेनेला फायदा होईल हे स्पष्ट असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडीला बरोबर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे."

Image copyright Shashi

भारिपसाठी किती जागा सोडण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी तयार होईल याबाबत साशंकता आहे.

अकोल्यातही भारिप स्वबळावर निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताकदीची गरज आहे.

सहा जागा सोडण्यास ते तयार होतील अशी चर्चा आहे. मात्र सध्या हे सगळं चर्चेपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे कयास बांधण्यास अर्थ नाही असं जोशी यांना वाटतं.

विरोधकांची एकजूट महत्त्वाची

वंचित आघाडीला बरोबर घेऊन जाण्याच्या विचारामागची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितली.

ते म्हणतात, "भारिप आणि पर्यायाने प्रकाश आंबेडकर यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मतदारांना कोणाची किती ताकद आहे याची कल्पना आहे. सत्य काय, असत्य कोण याचा फैसला जनता करेलच.

भाजप आणि शिवसेनेला सत्तेतून बाजूला करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. त्यासाठीच चर्चा सुरू आहे. कोणावरही एकत्र येण्याची बळजबरी नाही.

मात्र विरोधकांनी एकत्र आल्यास ताकद वाढू शकते हे सत्य आहे. भाजप आणि शिवसेना यांच्या विरोधी पक्षांची संख्या खूप आहे. त्या सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन आहे."

काँग्रेसला मताधिक्य वाढवायचं आहे

"वर्षानुवर्षें दलित, मुस्लीम, आदिवासी हा काँग्रेसचा मतदार आहे. मात्र गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा हा मतदार पक्षापासून दुरावला आहे.

2014चा अपवाद वगळला तर हा मतदार भाजपकडे गेला असं म्हणता येणार नाही. काही मतदार शिवसेनेकडे तर काही राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्थलांतरित झाले. प्रादेशिक आणि नंतर सबरिजनल म्हणजेच स्थानिक पातळीवरील पक्षांनी काँग्रेसची व्होटबँक हळूहळू काबीज करण्यास सुरुवात केली. या दुरावलेल्या मतदाराला आपलंसं करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे," असं ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी सांगितलं.

त्यातूनच काँग्रेस वंचित आघाडीला बरोबर घेऊन जाण्यास उत्सुक आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची बैठक असलेला पक्ष अशी भारिपची ओळख आहे.

अकोला पॅटर्न अन्यत्र यशस्वी करून दाखवण्याचा त्यांचा मानस आहे. प्रकाश आंबेडकरांनी दलित, ओबीसी तसंच मुस्लिम अशी सर्वसमावेशक मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र त्याचवेळी या पक्षाला मर्यादा आहेत. आर्थिक ताकद कमी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर असेल तर या बाजू भक्कम होऊ शकतात.

Image copyright Shashi
प्रतिमा मथळा भारिप आणि एमआयएमने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.

"काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी एकमेकांची मतं खात आहेत. हे भाजपच्या पथ्यावर पडू शकतं. मतांचं विभाजन टाळण्यासाठी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू आहे. काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मजबूत होता आलेलं नाही. गड, बालेकिल्ला म्हणता येतील असे मतदारसंघही त्यांनी गमावले आहेत.

म्हणूनच जिथे शक्य आहे तिथे स्थानिक पक्षांचा, नेत्यांच्या वजनाचा फायदा करून घेण्याचा काँग्रेसचा विचार आहे. बहुजन समाज काँग्रेसला मत देऊ शकतो," असं सांगत हर्डीकर लोकसभा निवडणुकांमध्ये भरघोस मतं मिळालेल्या भाजप-शिवसेनेचं विधानसभेतलं मताधिक्य कमी झालं होतं याकडे लक्ष वेधतात.

"जेवढ्या अधिक स्थानिक पक्षांना सहभागी करून घेता येईल तेवढं करून घेण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा मनसुबा आहे. राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर, प्रकाश आंबेडकर असे नेते आणि पक्षांची त्यांना आवश्यकता आहे. हे निवडणुकीचं गणितशास्त्र आहे. ज्या ठिकाणी ताकद नाही तिथं ऊर्जा खर्च करून उपयोग नाही हे त्यांना उमगलं आहे," असं ते पुढे सांगतात.

काँग्रेसचा सर्वधर्मसमभाव विचार

प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा विचार आणि आमची भूमिका सारखी आहे. सर्वधर्मसमभाव हे काँग्रेसचं राष्ट्रीय पातळीवरचं धोरण नेहमीच राहिलं आहे. म्हणूनच एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, असं काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.

भाजप-शिवसेनासारख्या जातीयवादी शक्तींविरोधात जास्तीतजास्त विरोधी पक्षांनी एकजूट दाखवत एकत्र यायला हवं. मतांचं विभाजन होऊ नये हा विचार महत्त्वाचा आहे, असं ते सांगतात.

जागा किती सोडणार यासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत. मतदारसंघ, तिथली राजकीय समीकरणं, मतदार हे सगळं पाहून जागांचा निर्णय घेतला जाईल.

मुळात निवडून येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी योग्य आखणी करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी त्यांची ताकद असेल तिथं नक्कीच काँग्रेस पक्ष सहकार्य करेल. देशपातळीवर जे धोरण आम्ही अंगीकारलं आहे तेच राज्यातही लागू आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या