'अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम 21 फेब्रुवारीपासून' #5मोठ्याबातम्या

बाबरी मशीद Image copyright Getty Images

आजची दैनिकं आणि वेबसाइट्सवरील 5 महत्त्वाच्या बातम्या अशा :

1. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम 21 फेब्रुवारीपासून

अयोध्यात राम मंदिराचे बांधकाम 21 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय अलाबाबादमधल्या कुंभमेळ्यात जाहीर करण्यात आला आहे.

कुंभमेळ्यात सुरू असलेल्या तीन दिवसीय धर्म संसदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हा निर्णय जाहीर केला.

या निर्णयाची अंमलबजावणी करताना गोळ्या झेलाव्या लागल्या तरी चालतील असंही ते म्हणाले आहेत.

सर्व साधू-संत 10 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनंतर अयोध्येच्या दिशेने कूच करतील आणि 21 फेब्रुवारी रोजी मंदिराच्या शिलान्यासासाठी भूमिपूजन केलं जाईल असं सागंण्यात आलं आहे. अर्थात ते कुठे करण्यात येईल याबाबत मात्र माहिती देण्यात आलेली आहे.

या विधिला इष्टिका न्यास असं संबोधण्यात आलं आहे.

भारतीय जनता पार्टीला लोकसभेत बहुमत असूनही राम मंदिर बांधण्यासाठी विधेयक न आणल्याबद्दल स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी भाजपावरही टीका केली. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. आगामी निवडणुकीत एनडीए बहुमतापासून दूर- सर्वेक्षण

यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मतांची टक्केवारी घसरण्याची शक्यता टाइम्स नाऊ-व्हीएमआरने व्यक्त केली आहे.

टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरच्या सर्वेक्षणात एनडीएला 252 तर युपीएला 144 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात रालोआला 27 जागा तर समजवादी-बहुजन समाजवादी पार्टीच्या आघाडीला 51 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये 26 पैकी 24 जागा, हिमाचल प्रदेशात 3, महाराष्ट्रात 43 तर ओडिशात 13 जागा एनडीएला मिळतील असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये 32 जागा तर एनडीएला 9 आणि युपीएला 1 जागा मिळेल असंही समोर आलं आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

3. अमित शाह यांच्या सभेवरून ममता- राजनाथ यांच्यात फोनवरून खडाजंगी

अमित शाह यांच्या पूर्व मिदनापूरमध्ये झालेल्या सभेनंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

Image copyright Getty Images

राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी यांचं लक्ष सभेला उपस्थित राहाणाऱ्या लोकांविरोधात हिंसाचार आणि जाळपोळ होण्याच्या घटनांकडे वेधून चिंता व्यक्त केली.

हिंसाचारात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे राजनाथ यांनी ममता यांना सांगितलं.

तर राजनाथ सिंह यांनी आपल्या पक्षातल्या नेत्यांना आवर घालावा, असं ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं.

भाजपा नेत्यांनींच या प्रकाराला चिथावणी दिली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं तृणमूलच्या एका मंत्र्यांनी सांगितलं. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. विमानतळ खासगीकरणाविरोधात कर्मचारी एकवटले

देशातल्या 6 विमानतळांच्या खासगीकरणाविरोधात एअरपोर्ट अथॉरिटी एम्प्लॉइज युनियनने संपाची तयारी सुरू केली आहे.

त्यासाठी देशभरात गुप्त मतदान आयोजित करण्यात आलं होतं.

Image copyright Reuters

मुंबईत झालेल्या मतदानात 96 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे.

देशभरातल्या लखनऊ, हैदराबाद, जयपूर, मंगळुरू, गुवाहाटी, तिरुवनंतपुरम या सहा विमानतळांचं खासगीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

त्याविरोधात मुंबईत झालेल्या मतदानात 853 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपैकी 771 मतदारांनी सहभाग घेतला.

त्यामध्ये 741 मतदारांनी संपाला पाठिंबा दिला आहे. लोकमतने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

5. शिर्डी संस्थानच्या खर्चावर बंधनं

दैनंदिन खर्च वगळता इतर कोणत्याही कामासाठी शिर्डी संस्थानने 4 फेब्रुवारीपर्यंत निधी वापरू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

शिर्डी संस्थाननं निळवंडे प्रकल्पासाठी 500 कोटींचा निधी कोणत्या तरतुदीनुसार जाहीर केला अशी विचारणा खंडपीठानं केली.

जर अशी तरतूद असल्यास केवळ निळवंडे धरणासाठीच निधी का दिला? राज्यातील इतर धरणांसाठी निधी का दिला नाही? असे प्रश्न खंडपीठाने संस्थानला विचारले आहेत.

साईबाबांचे भक्त देश-विदेशातून येतात त्यांच्यासाठी इतर धार्मिकस्थळांप्रमाणे स्वच्छता का ठेवली जात नाही? असंही न्यायालयानं विचारलं आहे.

शिर्डी संस्थानकडे येणारा पैसा भाविकांचा आहे. तो धार्मिक कार्यासाठीच खर्च केला गेला पाहिजे अशी बाजू याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. प्रज्ञा केळकर यांनी मांडली. महाराष्ट्र टाइम्सनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)