सरोगसीद्वारे एकता कपूर झाली आई...

एकता कपूर Image copyright Twitter/Ekata Kapoor

टीव्हीवर सास-बहू मालिकांचा ट्रेंड रुजवून टीआरपीची गणितं बदलणारी निर्माती एकता कपूर आई झाली आहे. एकतानं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला आहे.

एकता कपूरला २७ जानेवारीला मुलगा झाल्याची माहिती मिळत आहे. एकताच्या बाळाची प्रकृती अतिशय चांगली असून ती लवकरच त्याला घरी घेऊन येईल.

एकता कपूर प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आणि अभिनेता तुषार कपूरची बहीण आहे. आई बनवण्याची प्रेरणा एकताला आपला भाऊ तुषार कपूरकडून मिळाली.

अनेक सेलिब्रिटींना सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती

तीन वर्षांपूर्वी एकताचा भाऊ तुषार कपूरनंही सरोगसीद्वारेच एका मुलाला जन्म दिला होता. केवळ तुषार आणि एकताच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यामातून पालक बनले आहेत.

Image copyright Getty Images

निर्माता-दिग्दशर्क करण जोहरनं सरोगसीचा पर्याय स्वीकारला आणि आज तो जुळ्या मुलांचा पिता आहे. विशेष म्हणजे एकता, तुषार, करण हे अविवाहित आहेत. तर शाहरूख खाननं दोन मुलं असताना तिसऱ्या मुलासाठी सरोगसीचा पर्याय अवलंबल्यानंतर त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. सनी लिओनी, आमीर खान यांनाही सरोगसीद्वारेच अपत्यप्राप्ती झाली आहे.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसीचा शब्दशः अर्थ म्हणजे गर्भाशय भाड्यानं घेणं. एखादी महिला गर्भधारणा करण्यासाठी असमर्थ असेल किंवा गर्भाशयात कोणत्याही पद्धतीचं संसर्ग झाल्यास दुसऱ्या महिलेच्या गर्भाशयात मूल वाढवले जाते. पतीचा शुक्राणू आणि पत्नीच्या बीजांड यांच्या मिलनातून तयार झालेला भ्रूण सरोगेट मदरच्या गर्भाशयात सोडला जातो. त्यानंतर नऊ महिने हा गर्भ सरोगेटच वाढवते.

म्हणजेच ही सरोगेट ही त्या अपत्याची जैविक माता नसते. गेल्या काही वर्षांत भारतातल्या अनेक शहरांत व्यावसायिक पद्धतीनं सरोगसी करणाऱ्या केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप आहे.

सरोगसीच्या कायदेशीर नियमनाचा आग्रह

पालकत्वाची आस ही नैसर्गिक गोष्ट असली, तरी सरोगसीचा पर्याय अवलंबण्यासाठी काही नियम असावेत अशी भूमिका वारंवार मांडण्यात येत होती. सरोगसीचं व्यापारीकरण थांबावं, या हेतूनं २०१६ मध्येच सरोगसी नियमन विधेयक मांडण्यात आलं होतं. चर्चा आणि वाद-विवादानंतर १९ डिसेंबर २०१८ ला लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

Image copyright Twitter

या विधेयकामध्ये सरोगसीसंदर्भात नेमके कोणते निर्बंध लादले आहेत हे थोडक्यात जाणून घेऊ-

1.या विधेयकानं व्यापारी तत्त्वावर सरोगसीला बंदी घातली आहे. केवळ विवाहित भारतीय जोडप्यांनाच सरोगसीनं मूल जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यातही वैद्यकीयदृष्ट्या मूल होण्याची शक्यता नसलेलं जोडपंच सरोगसीचा पर्याय अवलंबू शकतं.

2.अविवाहित, समलैंगिक व्यक्ती, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी किंवा एकल पालकांना सरोगसीचा वापर करून मुलांना जन्म द्यायला बंदी घातली आहे.

3.ज्या जोडप्यांना मूल आहे, अशी जोडपी सरोगसीच्या माध्यमातून दुसऱ्या मुलाला जन्म देऊ शकणार नाहीत. ते दुसरं मूल दत्तक मात्र घेऊ शकतात. सरोगसीचा पर्याय अवलंबणाऱ्या जोडप्यांना 'सरोगेट मदर' म्हणून अतिशय जवळच्या नातेवाईक महिलेचाच विचार करता येईल.

4.सरोगसीसाठी संबंधित महिलेला पैसे देण्यावर या विधेयकामध्ये बंदी घालण्यात आली आहे. गरोदरपाणाच्या काळातील तिचा सर्व खर्च तसंच विम्याचा खर्च सरोगसीचा वापर करणाऱ्या जोडप्यांनी करायचा आहे.

5.संबंधित जोडपं आणि सरोगेट मदर यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून पात्रतेचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील महिला आयुष्यात एकदाच सरोगेट मदर म्हणून गरोदर राहू शकते.

6.सरोगसीच्या प्रक्रियेचं नियमन करण्यासाठी केंद्रीय स्तरावर नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य स्तरावर स्टेट सरोगसी बोर्डची स्थापना केली जाईल.

सध्या हे विधेयक केवळ लोकसभेत मंजूर झालं आहे. त्यामुळे सरोगसी संदर्भात याघडीला भारतात कोणताही कायदा अस्तित्त्वात नाही. मात्र गेल्या काही वर्षांत भारतात ज्या प्रमाणावर सरोगसीचं व्यापारीकरण झालं आहे, ते पाहता नियमनाची मागणी जोर धरू लागली होती. सरोगेट मातांचं आरोग्य, जन्माला येणाऱ्या बाळाचं भविष्य याचा विचार करून हे विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकातही अनेक त्रुटी असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे, पण त्याची गरज कोणीच नाकारत नाहीये.

आज अनेक सेलिब्रिटी, परदेशी नागरिक सरोगसीद्वारे अपत्यसुख प्राप्त करून घेत असले तरी भविष्यात सरोगसी नियमन कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर ही गोष्ट इतकी सहजसाध्य राहणार नाही हे नक्की!

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)