बजेट 2019 : पियुष गोयल यांच्या 7 मोठ्या घोषणा, ज्यामुळे तुम्ही खूश व्हाल

आनंदी Image copyright Jonas Gratzer

प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये निवडणुकांवर डोळा ठेवून अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या. मध्यमवर्गापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना काही ना काही देण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये दिसतो.

1. करमुक्त उत्पन्न

करमुक्त उत्पन्नाची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवली जात आहे. तीन कोटी मध्यमवर्गीय करदात्यांना याचा फायदा होणार आहे. याचा अर्थ असा की, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवलेली नाही. ती अडीच लाखांपर्यंत कायम आहे. पण, कर बचतीसाठीची सर्व गुंतवणूक केल्यानंतर जर तुमचं उत्पन्न पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर रिबेटचा फायदा मिळून तुमचं करदायित्व शून्य येईल.

2. शेतकऱ्यांना थेट लाभ

दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला 6 हजार रुपये जमा करणार. यासाठी लागणारे 75 हजार कोटी रुपये सरकार देणार आहे. याचा 12 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ होणार.

यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला दरमहा 500 रुपये मिळणार आहेत. ही योजना डिसेंबर 2018 पासून लागू होईल, अशी घोषणा गोयल यांनी केली आहे. या योजनेला पीएम किसान सन्मान निधी असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय 60 वर्षे पूर्ण झालेल्या मजुरांना 3000 रुपयांची पेन्शन जाहीर करण्यात आलं आहे.

3. महिलांसाठी काय?

गरोदर महिलांसाठी 26 आठवड्यांची पगारी सुट्टी देण्याची घोषणा प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली. महिला सशक्तीकरणासाठी प्रधानमंत्री मातृत्व योजनेची सुरुवात केल्याचेही त्यांनी भाषणात सांगितले.

त्याचप्रमाणे 6 कोटी घरांमध्ये उज्ज्वला योजनेतर्फे स्वयंपाकाचा गॅस पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले. उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी कुटुंबात स्वयंपाकाचा गॅस पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी जाहीर केले.

4. 40 हजारापर्यंत व्याजावर TDS नाही

बँकेत तसेच पोस्टात ठेवलेल्या रकमेवरील 40 हजारांपर्यंतचे व्याजावर TDS आकारण्यात यणार नाही. Tax Deducted at Source म्हणजे उगम करकपात.

यापूर्वी 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावरती TDS आकारला जाई. या नव्या घोषणेमुळे अनेक मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला आहे. घरभाड्यातून मिळणाऱ्या 2.4 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर न आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

5. घरखरेदीवरचा GST कमी करणार

घर खरेदीवरचा GST कमी करण्याचा विचार सुरू असल्याचे गोयल यांनी सांगितले. घर खरेदीवरचा GST कमी करण्याचा विचार आम्ही करतो आहोत, असं गोयल यांनी म्हटलं आहे. मात्र त्याबद्दलची घोषणा करण्यात आली नाही. यासंदर्भातला निर्णय GST परिषद घेईल असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

6. कामगारांना बोनस

21 हजारापर्यंत पगार असलेल्यांना कामगारांना 7 हजार रुपये बोनस मिळणार, अशी घोषणा पीयूष गोयल यांनी केली. कामगारांसाठी मोदी सरकारतर्फे ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. तसेच ग्रॅच्युइटीची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाख करण्यात आल्याचंही गोयल यांनी स्पष्ट केलं.

असंघटित क्षेत्रातील 60 वर्षांवरील कामगारांना सरकार दरमहा 3000 रुपयांचे पेन्शन देण्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली. यामुळे 10 कोटी कामगारांना फायदा होईल आणि येत्या पाच वर्षांमध्ये जगातील सर्वात मोठी पेन्शन योजना होऊ शकेल असे गोयल यांनी सांगितले. या योजनेला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन असे नाव देण्यात आले आहे.

7. टॅक्स भरण्यामध्ये पारदर्शकता आणणार

24 तासात रिटर्न्सवर प्रक्रिया होईल, यासाठी तंत्रज्ञान विकसीत केलं जाईल. नोटबंदीनंतर टॅक्स भरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले. आयकर भरण्यासाठीची प्रक्रिया आधिकाधिक पारदर्शक करण्याासाठी येत्या वर्षात प्रयत्न करू, असे गोयल यांनी सांगितले.

Image copyright Getty Images

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)