'भारतीय म्हणून कसं वाटतं,' याबद्दल बीबीसीशी बोलली म्हणून महिला कर्मचारी निलंबित

कौशल्या Image copyright NATHAN G

तामिळनाडूत सामाजिक कार्यकर्त्या कौशल्या यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आलं आहे. त्यांनी बीबीसीच्या एका बातमीत बोलताना भारताच्या सार्वभौमत्त्वाविरोधात भाष्य केलं, असा त्यांच्यावर आरोप आहे.

तामीळनाडूतल्या वेलिंग्टन कॅन्टोनमेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश वर्मा यांनी कौशल्या यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आल्याचं बीबीसीला सांगितलं आहे.

कौशल्या त्या ठिकाणी ज्युनिअर असिस्टंट म्हणून काम करायच्या. त्यांनी बीबीसी तामीळला 'आम्ही भारताचे लोक' या कार्यक्रमात देश आणि समाजाविषयी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. भारताचा अनादर केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

'आम्ही भारताचे लोक' ही मालिका बीबीसीनं 26 जानेवारीपासून सुरू केली आहे.

भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशाविषयी काय वाटतं, हे बीबीसी या मालिकेद्वारे समजून घेण्याचा आणि लोकांपर्यंत वेगवेगळे दृष्टिकोन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये कौशल्या यांनी भारताविषयी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. ही मालिका दररोज सहा भारतीय भाषातून प्रसारित केली जात आहे.

नेमका काय वाद आहे?

भारताचे नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, याविषयी कौशल्या यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, "आंबेडकर यांनी भारताला एक संघराज्य म्हणून पाहिलं होतं. राज्यघटनेने भारताला राज्यांचा संघ असं नमूद केलं आहे. भारतात कोणतीही राष्ट्रभाषा नाहीये. सांस्कृतिक आधारावर लोक एकमेकांपासून विभागलेले आहेत. असं असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की, तुम्ही या देशाला कशाप्रकारे पाहता?"

"भारत तामिळनाडूला एखाद्या गुलामासारखी वागणूक देत आहे. 'स्टरलाइट' सारख्या कंपन्या राज्यावर थोपवल्या जातात. लोकांनी त्याचा विरोध केला होता. शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पण केंद्र सरकारने त्याकडं लक्ष दिलं नाही," असंही त्या म्हणाल्या होत्या.

निलंबनाची वैधता?

तामिळनाडूत या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मद्रास हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती के. चंद्रू सांगतात, "सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, सरकारी नोकरदारांनी मीडियाशी बोलण्याआधी, पुस्तक किंवा लेख लिहिण्याआधी त्यांच्या विभाग प्रमुखांकडून परवानगी मिळवणं बंधनकारक आहे. त्यांना राज्याविरोधात बोलण्यास मनाई आहे. कौशल्या यांच्या प्रकरणात या बाबींचं उल्लंघन झालं आहे."

Image copyright NATHAN G

चंद्रू पुढे सांगतात, "नोकरीत रुजू होण्याआधी ती व्यक्ती कोणताही विचार मांडू शकते, असं 1983मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे. पण नोकरीत रुजू झाल्यानंतर त्यांचं मत महत्त्वाचं ठरतं. पण तुमच्या आधीच्या विचारांमुळे तुम्हाला नोकरी मिळायला काही फरक पडायला नको. पण एक सरकारी कर्मचाऱ्यानं त्याच्या कामाप्रति निष्ठावान राहिलं पाहिजे."

दरम्यान, कौशल्याबाबत सरकारने खूप कडक कारवाई केली, असं काही जणांचं म्हणणं आहे. नोकरी निलंबनाऐवजी सरकारनं दुसरे पर्याय निवडायला पाहिजे होते, असं काहींना वाटतं.

महिला हक्क कार्यकर्त्या कविता कृष्णन यांच्या मते कौशल्या यांनी जे काही म्हटलं आहे, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा वेगळं काही नाहीये. राज्यावर टीका करण्याचा सगळ्यांना हक्क आहे.

"कौशल्या यांनी ऑनर किलिंगविरोधात मोठी लढाई लढली आहे. तशी हिंमत सगळ्यांकडेच नसते. अशा धैर्यवान महिलेवर अशी कारवाई ही लोकशाहीच्या मूल्यांचं उल्लंघन करताना दिसतं," असं कविता यांनी बीबीसीला सांगितलं.

Image copyright THE NEWS MINUTE
प्रतिमा मथळा ऑनर किलिंगच्या आरोपावरून कौशल्याच्या वडिलांना फाशीची शिक्षा सुनावली आहे तर आईची सुटका करण्यात आली आहे

मानवी हक्क कार्यकर्ता प्रा. ए. मार्क्स यांच्या मते, "प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. त्यांना तो व्यक्त करण्यापासून त्यांना कुणीही रोखायला नाही पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये तर सरकारी नोकरदारांना पक्षाचे सदस्य होण्यास परवानगी देण्यात आली आहे."

कौशल्या कोण आहेत?

कौशल्या या तामिळनाडूमधल्या जाती व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी दुसऱ्या जातीच्या व्यक्तीशी लग्न केल्यानंतर त्यांचे पती शंकर यांची हत्या झाली होती.

कौशल्या यांनी या ऑनर किलिंगवरून त्यांच्या आईवडिलांवरोधात मोठी कायदेशीर लढाई लढल्या आणि त्यांना तुरंगात पाठवलं.

कौशल्या यांनी परत एकदा लग्न केलं आहे. त्यांचे दुसरे पतीसुद्धा दुसऱ्या जातीचे आहेत. पण आता त्यांना त्याच्या समुदायाकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

प्रतिमा मथळा कौशल्या त्यांच्या दुसऱ्या पतीसोबत

21 वर्षांच्या कौशल्या बीबीसीशी बोलताना सांगतात, "काही लोकांकडून आम्हाला शुभेच्छा मिळत आहेत तर काही जणांच्या धमक्यांचाही आम्हाला सामना करावा लागत आहे. माझ्या पतीचे आईवडील आणि मित्रांना आमची काळजी वाटत आहे. सोशल मीडियावरून आलेल्या धमक्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण काही लोक आम्हाला फोन करून धमक्या देतात. परदेशी फोन नंबरहूनही शिवीगाळ केली जाते."

या प्रकारानंतर कौशल्या यांना पोलीस संरक्षण घेण्यापासून दुसरा पर्याय नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत एक निशस्त्र महिला पोलीस तैनात केली होती. पण कौशल्या यांनी दुसरं लग्न केल्यानंतर ही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

त्यांच्यावर सगळीकडून दबाव टाकला जात आहे, असं त्या सांगतात.

दरम्यान, कौशल्या यांचं संरक्षण काढून घेतलं नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना पोलिसांचं सरंक्षण मिळावं, यासाठी कायदा करण्याची मागणी उचलून धरत कौशल्या या एक अभियान चालवत आहेत.

"माझी भाषणं ऐकल्यानंतर आंतरजातीय विवाहाबद्दल मत बदलल्याचं काही लोक मला सांगतात," असं त्यांनी डिसेंबर 2018मध्ये बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)