संजय राऊत यांनी घेतली चंद्राबाबू नायडू यांची भेट; दबावतंत्र की पर्यायांची चाचपणी?

नायडू Image copyright Getty Images

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीवरून तणाव असताना राऊत यांनी दिलेल्या या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महाराष्ट्रात पूर्ण शक्तीने 48 जागा लढवेल अशी घोषणा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांतच संजय राऊत यांनी विरोधी आघाडीच्या नेत्यांना पाठिंबा देणं राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घटना ठरली आहे. संजय राऊत यांनी मात्र ही भेट राजकीय नाही, अशी प्रतिक्रिया बीबीसी मराठीला दिली आहे. तर भाजप नेत्यांची यावर प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

ज्या आंदोलनात विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत होते, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेने आपले प्रतिनिधी खासदार संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी पाठवलं, ही दुर्मिळ घटना आहे, असा अल्लेख News18नं केला आहे. "पंतप्रधानांच्या खुर्चीत बसलेल्या लोकांनी राजधर्म पाळायला हवा," असा हल्ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत मोदींवर केला.

या आंदोलनात काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेजारी राऊत बसल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

दबाव आणि पर्यायांची चाचपणी

युती होणार की नाही या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना दबावतंत्राचा वापर करत आहे, असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

"विधानसभेसाठी पक्षाला निम्म्या जागा मिळाव्यात, अशी शिवसेनेची मागणी आहे. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्या तरी जागावाटप आताच ठरावं याबद्दलही शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे शिवसेना भाजपवर शक्य तितक्या पद्धतीनं दबाव आणण्याचा प्रयत्न करणार हेच चंद्राबाबू नायडूंच्या व्यासपीठावर संजय राऊतांनी लावलेल्या उपस्थितीवरून स्पष्ट होत आहे."

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भाजपला आमच्यासमोर अन्य पर्याय खुले आहेत हेदेखील दाखवून देत आहे, असं निरीक्षण अभय देशपांडे यांनी नोंदवलं. "याचं अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे प्रशांत किशोर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट. प्रशांत किशोर हे स्ट्रॅटेजिस्ट आहेतच. पण ते नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्षही आहेत. त्यामुळेच एनडीमधील आताच्या तसंच आधीच्या घटकपक्षांशी शिवसेना संधान बांधून राहत आहे," असं अभय देशपांडेंनी सांगितलं.

अभय देशपांडे यांनी म्हटलं, "केवळ एनडीएमधील घटकपक्षच नाही, तर शिवसेनेनं गेल्या दोन वर्षांत अन्य पक्षांच्या भूमिकेलाही वेळोवेळी समर्थन दिलं आहे. नोटाबंदीनंतर विरोधकांनी काढलेल्या मोर्चात शिवसेनाही सहभागी झाली होती. काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या कारवाईवरून ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारमध्ये जो संघर्ष झाला, त्यामध्येही शिवसेनेनं ममता बॅनर्जींची बाजू उचलून धरली होती. आणि आता संजय राऊत यांनी चंद्राबाबू नायडू यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. शिवसेना स्वतःसाठी अन्य पर्याय चाचपून पाहताना भाजपवर दबाव टाकू पाहत आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे."

राजकीय अर्थ काढला जाऊ नये : राऊत

"मी चंद्राबाबू नायडूंची भेट केवळ सदिच्छेपोटी घेतली. या भेटीचा कोणताही विशेष राजकीय अर्थ लावण्याची आवश्यकता नाही," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली. "चंद्राबाबू नायडू हे कालपर्यंत एनडीएचे घटक होते, आमचे सहकारी होते. भाजप आणि मोदींनाही ते प्रिय होते. आज काही कारणास्तव ते एनडीएमध्ये नाहीयेत. मात्र राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळेच नाती तोडणं, संवाद न साधणं यावर शिवसेनेचा विश्वास नाही," असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांत शिवसेना अन्य प्रादेशिक पक्षांची बाजू घेताना दिसत आहे. सीबीआयवरून ममता बॅनर्जी आणि केंद्रामध्ये उद्भवलेल्या संघर्षात शिवसेनेनं ममतांना पाठिंबा दिला होता. त्यामुळं शिवसेना दबावतंत्राचा वापर करत अन्य पर्यायांची चाचपणी करत आहे का, या प्रश्नाचं उत्तर राऊत यांनी नकारार्थी दिलं. "शिवसेना कोणावरही दबाव टाकण्यासाठी अशी भूमिका घेणार नाही. त्या त्या प्रांतातील प्रश्नांवर शिवसेनेनं नेहमीच प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मुळात शिवसेना हादेखील प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळे आम्हाला प्रादेशिक पक्षांच्या व्यथा, समस्या माहीत आहेत. यामध्ये विशेष राजकारण किंवा दबावतंत्र नाहीये," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क साधण्यात आला. पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

राज्यात शिवसेनेचं दबावतंत्र?

शिवसेनेने राज्यातही दबावतंत्राला सुरुवात केली असल्याचं वृत्त आहे. त्यासाठी भाजपचे खासदार असलेल्या मतदार संघातून शिवसेना निर्धार मेळावे घेत आहे, असे वृत्त दैनिक सकाळने दिले आहे. पूनम महाजन खासदार असलेल्या दक्षिण-मध्य मुंबईत रविवारी युवा निर्धार मेळावा शिवसेनेने घेतला होता. तर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. तर दुसरीकडे ईशान्य मुंबई या किरीट सोमैय्या यांच्या मतदार संघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमैय्या यांना विरोधाची भूमिका घेतल्याचं वृत्त दिव्य मराठीनं दिलं आहे.

नायडू यांचं आंदोलन कशासाठी?

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा आणि राज्य पुनर्गठन अधिनियम, 2014 अन्वये देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्तता व्हावी, याकरिता सोमवारी चंद्राबाबू नायडू एक दिवस उपोषण सुरू केलं. त्यांच्या या आंदोलनाला सकाळपासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शरद पवार, फारूख अब्दुल्ला, मुलायमसिंग यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदी नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी मंगळवारी नायडू यांची भेट घेणार आहेत.

तेव्हा बोलताना ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध होणारी निदर्शनं ही वाईट प्रशासकीय कौशल्याचं उदाहरण आहे. याआधी कोणत्याच पंतप्रधानांना निदर्शनांना तोंड द्यावं लागलं नाही. तुम्ही जिथे जाता तिथे लोक निदर्शनं करतात. याचाच अर्थ तुमचं प्रशासकीय कौशल्य चांगलं नाही. राजधर्म गुजरातमध्येही (2002 साली) पाळण्यात आला नव्हता आणि तो आजही आंध्र प्रदेशच्या बाबतीत पाळला नाही," असं नायडू यांनी बोलून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दाची आठवण करून दिली.

रविवारी पंतप्रधान मोदी यांनी नायडू यांना 'लोकेशचे वडील' असं संबोधून टिप्पणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देत चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांचा उल्लेख केला आहे. "मला मुलाचा अभिमान आहे. मी कौटुंबिक मूल्यं मानतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:चं कुटुंब नसल्याने ते समजू शकणार नाहीत," अशी टीका त्यांनी केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. नोटाबंदीचा निर्णय वेडेपणाचा होता, असंही ते म्हणाले. शिवाय गुंटूरमध्ये YSR काँग्रेसने मोदींसाठी गर्दी जमवली, अशी टीका त्यांनी केली.

" पंतप्रधान स्वत:ला चहावाला म्हणवून घेतात मात्र त्यांची देहबोली आणि आचरण चहावाल्यासारखं नाही," असं नायडू म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जसोदाबेन

"पंतप्रधानांनी वैयक्तिक पातळीवर टीका केली तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येईल. मी शक्यतो कोणाच्याही खासगी आयुष्याबाबत शक्यतो बोलत नाही मात्र मोदींनी मला असं बोलायला भाग पाडलं आहे. ट्रिपल तलाक विधेयक संमत करून मुस्लीम महिलांना मदत करू इच्छितात. मात्र स्वत:च्या पत्नीबद्दल विचारलं तर मोदी उत्तर देऊ शकत नाहीत," अशी टीकाही त्यांनी केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)